Friday, May 10, 2024
Homeनगरमळीच्या पाण्यामुळे पुणतांबा ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

मळीच्या पाण्यामुळे पुणतांबा ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

राहाता तालुक्यातील चितळी येथील जॉन डिस्टलरीच्या आसवनी प्रकल्पातून मळी मिश्रित दूषित पाणी गेल्या काही दिवसांपासून येथील डेरा नाल्यातून वाहत आहे.

- Advertisement -

हे पाणी परिसरातीत शेतकर्‍यांच्या विहिरीत पाझरत असल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मळीयुक्त पाणी सोडणे तातडीने बंद न केल्यास शिवसेनेच्यावतीने धडक आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे तालुका उपप्रमुख भास्कर मोटकर यांनी एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

श्री. मोटकर व त्यांच्या सहकारी शिवसैनिकांनी काल तहसीलदार राहाता यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. मळीयुक्त रासायनिक पाण्यामुळे डेरा नाला व परिसरातील विहिरीत लालसर रंगाचे पाणी दिसत आहे.

हे पाणी ग्रामस्थ व जनावरांना सुध्दा पिण्यासाठी योग्य नाही. पाणी प्रश्नाबाबत जळगाव ग्रामस्थांनी नुकसान भरपाई तसेच पाणी बंद करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देऊनही सध्या पाणी सुरूच आहे. चितळी येथून जळगाव ओढ्यामार्फत पुणतांबा परिसरातील चरांमध्ये पाणी वाहत असून ते शेवटी गोदावरी नदीला मिळत आहे.

त्यामुळे नदीपात्रातील पाणीही दूषित होत आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम नदीकाठच्या ग्रामस्थ तसेच नदीतील जीवसृष्टीवर होणार असल्याचे श्री. मोटकर यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या