Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखबदलत्या मानसिकतेच्या खुणा!

बदलत्या मानसिकतेच्या खुणा!

सध्या सगळीकडे नवरात्रीचा जागर सुरु आहे. देवीची विविध रुपे पुजली जात आहेत. त्याचवेळी दुसर्‍या बाजूला विधवा, घटस्फोटित आणि एकल महिलांना मात्र वेगळी वागणूक दिली जात असल्याचे आढळते. समाजात विधवा महिलांच्या बाबतीत आजही अनेक प्रथा आणि परंपरा पाळल्या जातात. विधवा, घटस्फोटित आणि एकल महिलांकडे एकतर काहीशा हेटाळणीच्या नजरेने पाहिले जाते किंवा त्यांच्याविषयी दयाभावना व्यक्त केली जाते.  विधवा किंवा घटस्फोटित महिलांना हळदीकुंकू किंवा पुजापाठाच्या कार्यक्रमात अभावानेच आमंत्रण दिले जाते. सार्वजनिक सणसमारंभातही त्यांनी कायमच दुय्यमत्व स्वीकारावे अशीच समाजाची अपेक्षा असते. आयुष्याचा जोडीदार अकाली गेल्याचे आणि वाट्याला आलेल्या एकटेपणाचे त्यांचे दु:ख तर मोठे असतेच पण समाजाकडून मिळणारी वागणूकही त्यांना निरंतर अस्वस्थ करणारी असते. वास्तविक माणसाचा मृत्यू अटळ आहे. जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी हे जग सोडून जाणारच असते. तेच त्याचे विधिलिखित मानले जाते. मृत्यू कधीही आमंत्रण देऊन येत नाही. तो आकस्मिकच येत असतो. तथापि एखाद्या महिलेच्या पतीचे निधन होते तेव्हा मात्र तिच्याबाबतीत ते तितक्याच सहजपणे स्वीकारले जाताना आढळत नाही. पतीचे निधन झालेल्या महिलांना विधवा संबोधण्याची आणि विधवा प्रथा पाळण्याची परंपरा चालत आली आहे. पण बदल हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे काळानुसार प्रथा परंपरांमध्ये आणि त्याकडे बघण्याच्या सामाजिक दृष्टीकोनातही बदल होणे स्वाभाविक आहे. तसे बदल होत आहेत. ज्येष्ठ खासदार सुप्रिया सुळे या उस्मानाबाद दौर्‍यावर असताना घडलेला प्रसंग आहे. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे यांच्या मुलाचे नुकतेच निधन झाले आहे. सुप्रिया सुळेंनी त्यांच्या घरी सात्वंनपर भेट दिली. त्यावेळी वसंतरावांनी मुलगा गमावल्याचे दु:ख बाजूला ठेऊन त्याच्या पत्नीच्या म्हणजेच सुनेच्या हातून सुप्रियाताईंचे स्वागत करवले. त्यांना हळदीकुंकू लावायला लावले. हळदीकुंकू लावताना सुनबाईंचे हात थरथरले तेव्हा सासर्‍यांनीच सुनबाईंना लेकीच्या मायेने धीर दिला. सुप्रियाताईंनी सुनबाईंनाही हळदीकुंकू लावले. या भावूक प्रसंगांचा व्हिडियो समाजमाध्यमांवर आहे. पती निधनानंतर पाळली जाणारी विधवा प्रथा बंद करण्यासाठी राज्यातील अनेक गावे पुढाकार घेत आहेत. याची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने केली. विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला. त्याचीच री नंतर अनेक गावांनी ओढली. अशीच एक प्रथा संपुष्टात आणण्यासाठी पुण्यातील वंचित विकास संस्थेने पुढाकार घेतला आहे. एकल, घटस्फोटित आण विधवा महिलांचा उल्लेख समाजाने सन्मानाने करावा अशी मोहिम हाती घेतली आहे. त्यांचा उल्लेख ‘अभया’ म्हणून करावा अशी स्वाक्षरी मोहिम सुरु केली आहे. पतीच्या जाण्यानंतर जगण्याचा संघर्ष वाट्याला आलेल्या महिलांची भावनिक कुचंबणा होते. भावना कोणाकडे व्यक्त कराव्यात किंवा कराव्यात की नाही असा प्रश्न अनेकींना पडतो. त्यांच्यासाठी याच संस्थेने एक हेल्पलाईन सुरु केली आहे. हे उचित बदल आहेत. कोणत्याही व्यक्तीला एखाद्या विशिष्ट चौकटीत बंदिस्त करण्यापेक्षा त्यांच्याकडे माणूस म्हणून बघा असा संदेश देणारे आहेत. कोणत्याही प्रथांपेक्षा माणूसपणच जास्त महत्वाचे आहे हे अधोरेखित करणारे आहेत. समाजानेही असे बदल आता सहज स्वीकारायला हवेत. समाज तसे ते स्वीकारतोही आहे. त्याची व्याप्तीही वाढायला हवी. 

- Advertisment -

ताज्या बातम्या