Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीरामपूर-वैजापूर महामार्ग 51 बनला मृत्युचा सापळा

श्रीरामपूर-वैजापूर महामार्ग 51 बनला मृत्युचा सापळा

नाऊर |वार्ताहर| Naur

श्रीरामपूर व वैजापूर या दोन तालुक्याला जवळून जोडणारा प्रमुख मार्ग असलेला (पूर्वीचा राजमार्ग 47) व नव्याने करण्यात आलेला महामार्ग 51 हा दोन तालुक्यांसह नगर-औरंगाबाद या दोन्ही जिल्ह्यांची सिमा जोडणार्‍या

- Advertisement -

मुख्य महामार्गाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांसह वाहन चालकाचे प्रचंड हाल होत आहेत.

याचा परिणाम परिसरातील शेतकर्‍यांसह इतर अर्थव्यवस्थेवर पडत आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे श्रीरामपूर-वैजापूर तालुक्याचा संपर्क कमी होऊन परिसरातील बाजारपेठेवर याचा मोठा आर्थिक परिणाम झाला आहे. शेतकर्‍यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी ने-आण करताना मोठी अडचण निर्माण होत आहे.

शेतकर्‍यांसह व्यापारी वर्गांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी सहा महिन्यांपासून निवेदन देत दुरूस्तीची मागणी केली आहे. मात्र बांधकाम विभागाला कुंभकर्ण झोप लागल्यामुळे रस्त्याचे घोडे अडकले असल्याचे दिसते.

या रस्त्यासाठी प्रामुख्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घंगाळे यांनी 8 दिवसांत या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासह छावा, प्रहार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आदी देखील या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करत आहेत.

तसेच सराला बेटाच्यावतीने व ग्रामस्थांनी देखील अनेकवेळा याबाबतचे निवेदन वरिष्ठ अधिकारी यांना दिले असूनही अद्यापही या रस्त्याची दुरूस्ती रखडली आहे. तरी या मार्गाची लवकरात लवकर कायमस्वरूपीची दुरूस्ती करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

हा मार्ग दोन जिल्ह्यांना जवळून जोडणारा प्रमुख महामार्ग असून पर्यायाने श्रीरामपूर-वैजापूर या दोन तालुक्याला अगदी जवळून जोडणारा रस्ता असून याच मार्गावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत सदगुरू गंगागिरी महाराज व ब्रम्हलिन नारायणगिरी महाराज यांचे समाधीस्थळ सराला बेट आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गुडघ्याच्या वर खड्डे पडलेले आहेत, श्रीरामपूरचे आ. लहु कानडे व वैजापूरचे आ. प्रा. रमेश बोरनारे हे दोन्ही सत्ताधारी पक्षात असून त्यांनी लक्ष घालून आपले वजन वापरावे. तसेच वैजापूर व श्रीरामपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत लक्ष न घातल्यास तीव्र स्वरूपाचे मोठे आंदोलन उभारले जाईल.

– नितीन पटारे, छावा जिल्हाध्यक्ष ,नगर

- Advertisment -

ताज्या बातम्या