Thursday, April 25, 2024
Homeनगरबेशिस्त वाहतुकीला शिस्त कोण लावणार ?

बेशिस्त वाहतुकीला शिस्त कोण लावणार ?

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील शिवाजी चौकातील वाहतूक सिग्नल म्हणजे असून ताप नसून संताप असा झाला असून बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावायची कुणी ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

- Advertisement -

सिग्नल बंद राहिल्यास व पोलीस नसल्यास वाहतूक सुरळीत राहते असा वाहनचालकांचा अनुभव आहे. गर्दीच्या वेळेला सिग्नलचे पालन करताना चारही बाजूंनी वाहन चालक संपूर्ण रस्ता व्यापून टाकतात. त्यामुळे डाव्या बाजूने जाणार्‍या वाहनांना जाता येत नाही.

रेल्वे पुलाखालून येणारी वाहने चौकामध्ये चढ असल्याने वाहने तेथेच थांबून राहतात. अशावेळी एखाद्या वाहनाचे ब्रेक फेल झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. म्हणून या ठिकाणी चार ही बाजूने डाव्या बाजूने जाण्यासाठी गाड्यांना रस्ता मोकळा ठेवण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची असताना पोलीस मात्र रस्त्याच्या कोपर्‍यात उभे राहून पावत्या फाडण्यात व्यस्त असतात. त्यामुळे वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे.

या ठिकाणी अनेकवेळा अपघात होता होता वाचला आहे. वाहतूक पोलीस आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाहन चालकांना दंड करण्याचा धडाका लावला आहे. किरकोळ कारणावरून फोटो घेऊन दंड केला जात आहे.

यावरून वाहतूक पोलिसांबद्दल मोठा असंतोष वाहनचालकांमध्ये निर्माण झाला आहे. वाहतूक सुरळीत सुरू राहील, याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. शहरांमध्ये अनेक ठिकाणी भर रस्त्यावर अतिक्रमणे वाढली असून त्यामुळे सुद्धा अपघात होण्याचा संभव आहे.

शिवाजी रोडवर पार्किंग नसल्याने अनेक व्यापारी संकुलात तसेच बँकांसमोर भर रस्त्यावर गाड्या लावल्या जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. तरी वाहतुकीच्या प्रश्नाकडे वाहतूक पोलीस शाखेने लक्ष देण्याची मागणी शहरातील नागरिक तसेच वाहन चालक यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या