Wednesday, April 24, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुका काँग्रेस पदाधिकारी निवडीचा वाद आ. थोरातांच्या कोर्टात

श्रीरामपूर तालुका काँग्रेस पदाधिकारी निवडीचा वाद आ. थोरातांच्या कोर्टात

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुका काँग्रेस पदाधिकारी निवडी आ. कानडे-ससाणे गटाच्या वादात अडकल्या आहेत. शहराध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. समीन बागवान यांच्या नावाचा आग्रह आ. कानडे यांनी धरला आहे, तर ससाणे गटाने विद्यमान शहराध्यक्ष संजय छल्लारे यांचे नाव सूचवून मतदान घेण्याची मागणी केली आहे. आता हा निर्णय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या कोर्टात दाखल झाला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरु आहे. बहुतांश तालुक्यातील पदाधिकारी निवडी झाल्या आहेत. मात्र श्रीरामपूर तालुक्यातील निवडी वादात अडकल्याने लांबणीवर पडल्या आहेत. गेल्या महिन्यात या निवडीसाठी नियुक्त केलेले पक्षनिरीक्षक गणपतराव सांगळे यांनी या निवडीसाठी श्रीरामपुरात आ. कानडे व ससाणे गट काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दोन स्वतंत्र बैठका घेतल्या. त्यात आ. लहू कानडे गटाच्या बैठकीत तालुकाध्यक्ष पदासाठी विद्यमान तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक तर शहराध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. समीन बागवान यांची नावे सूचवून त्यांचे अर्ज दाखल केले.

तर जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या गटाच्या वतीने तालुकाध्यक्ष पदासाठी राजेंद्र पाऊलबुध्दे तर शहराध्यक्ष पदासाठी विद्यमान शहराध्यक्ष संजय छल्लारे यांचे नाव सूचवून त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे या निवडी होवू शकल्या नाही. श्री. सांगळे यांनी याबाबत अंतीम निर्णय माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे घेतील असे सांगितले होते. मात्र राज्यातील राजकीय घडामोडींमुळे मुंबईत व्यस्त असलेल्या आ. बाळासाहेब थोरात यांना वेळ मिळाला नाही. परिणामी या निवडी लांबणीवर पडल्या.

चार दिवसांपूर्वी आ. थोरात यांनी आ. कानडे व ससाणे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची संगमनेर येथे बैठक घेऊन हा वाद मिटविण्याचा सल्ला दिला. दोन्ही गटाला एक-एक पद देण्याचा पर्याय पुढे आला. ससाणे गटाने तालुकाध्यक्षपद आ. कानडे गटाचे अरुण पाटील नाईक यांना सोडण्यास संमती दर्शवून शहराध्यक्षपदी संजय छल्लारे यांची फेरनिवड करण्याची मागणी केली असता आ. कानडे यांनी श्री. छल्लारे यांच्या नावास तीव्र विरोध करुन अ‍ॅड. समीन बागवान यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यासाठी आग्रह धरला.

आ. कानडे यांच्या भूमिकेनंतर ससाणे गटाने शहराध्यक्षपदासाठी मतदान घेण्याची मागणी आ. थोरात यांच्याकडे केली. श्री. थोरात यांनी हा वाद आपापसात मिटविण्याचा सल्ला दिला. मात्र शहराध्यक्ष पदासाठी दोन्ही गट आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने या निवडी लांबणीवर पडल्या आहेत.

आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर श्रीरामपुरातील काँग्रेस अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर होवू शकतो, त्यामुळे निवडणुकीपूर्वी लवकरात लवकर आ. थोरात यांना या वादावर तोडगा काढावा लागणार आहे. त्यामुळे ते कधी व काय निर्णय घेतात याकडे श्रीरामपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या