Wednesday, April 24, 2024
Homeनगरश्रीरामपूरात कडक जनता कर्फ्यू सक्तीने राबवा

श्रीरामपूरात कडक जनता कर्फ्यू सक्तीने राबवा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर आपण गेली तीन चार महिने गाफील राहिलो. बेजबाबदारपणे वागल्यामुळेच करोनाची दुसरी लाट घातक ठरत आहे. ही साखळी तोडायची असल्यास स्थानिक पातळीवर कडक लॉकडाऊन पाळणे गरजेचे आहे.

- Advertisement -

पालिकेने जनता कर्फ्यु सक्तीने राबवावा. आताच आपण जबाबदारीने वागलो तर जुलै ऑगस्टमध्ये येणारी करोनाची तिसरी लाट घातक ठरणार नाही. त्यामुळे नागरिकांनीच गर्दी टाळून घरीच थांबाही साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करा, असे आवाहन नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. श्रीरामपुरात लवकरच ऑक्सीजन प्लँट उभा राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ काल श्रीरामपूर दौर्‍यावर आले असता विश्रामगृहावर अधिकारी, पदाधिकार्‍यांबरोबर करोबाबतचा आढावा घेतला. यावेळी खा. सदाशिव लोखंडे, आ. लहू कानडे, नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अविनाश आदिक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ना. मुश्रीफ म्हणाले, खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर बिल आकारले जात असून त्यांच्या बिलाचे ऑडीट झाले पाहिजे. अशा रुग्णालयांवर अंकुश ठेवले पाहिजे. या करोनाच्या काळात ऑक्सीजन व रेमडीसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असून जिल्ह्यात नगर, संगमनेर आणि श्रीरामपूर येथे ऑक्सिजन प्लँटची उभारणी केली जाणार आहे. श्रीरामपूर येथे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन प्लॅट उभारला जाणार आहे. तसेच शिर्डी येथे लवकरच 2000 बेडचे जम्बो कोविड रुग्णालय सुरु होणार आहे.

यात 200 बेड, व्हेंटीलेटर आयसीयु सुविधा, 1000 बेड ऑक्सिजन सुविधा असणार आहे. या रुग्णालयामुळे सहा तालुक्यातील रुग्णांची मोठी व्यवस्था होणार आहे. त्यामुळे नगरला उपचारासाठी जाणारे कमी होवून शिर्डी उपचार घेवू शकतील. तसेच श्रीरामपूर येथील म्हाडामध्ये करोना रुग्णाच्या उपचारासाठी कोविड रुग्णालय उभारणार असेल तर त्याला लगेच परवानगी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार म्हाडामध्ये 32 बेड ऑक्सीजन, 2 व्हेंटीलेटर आणि 68 साधे बेड असलेले हनुमान मंदिर ट्रस्टचे कोविड रुग्णालय उभे राहणार असल्यामुळे श्रीरामपूरकरांची मोठी गैरसोय दूर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आ. लहु कानडे म्हणाले, सध्या रेमडीसीवीर इंजेक्शन व ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत आहेत. ऑक्सीजनचा प्लँट लवकरच ग्रामीण रुग्णालयात उभा राहत आहेत. तर अँटीजन चाचणीसाठी अँटीजन किट उपलब्ध करुन देण्यात यावे, शहरातील किराणा दुकान, भाजीपाला, रुग्णालये व लॅबच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते, त्यांच्यावरही निर्बंध आणावेत, अशी मागणी त्यांनी केली.

खा. सदाशिव लोखंडे म्हणाले, करोना रुग्णांची संख्या मोठी वाढत असून त्या अनुषंगाने म्हाडा येथे 32 बेड ऑक्सीजन, 2 व्हेंटीलेटर आणि 68 साधे बेड असलेले हनुमान ट्रस्टचे कोविड रुग्णालय उभे राहणार असल्यामुळे श्रीरामपूरकरांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. तसेच शिर्डीतही 2000 बेडचे जम्बो कोविड रुग्णालय सुरु होणार आहे. यामुळे बहुतांश रुग्णांची सोय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले की, श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 8935 जण करोना बाधित झाले असून पैकी 7982 रुग्ण बरे होवून घरी गेले आहे. त्यामुळे बरे होणार्‍यांचे प्रमाण तालुक्यात 88 टक्के इतके आहे. सध्या रेमडीसीवीर इंजेक्शन व ऑक्सीजन व रॅपीड टेस्ट किटचा तुटवडा आहे. ऑक्सीजन प्लॅट उभे राहिल्यानंतर ऑक्सीजन मिळू शकेल. रेमडीसीवीरचा तुटवडा असून डॉक्टरांनी शक्यतो त्याचा वापर न करता औषध गोळ्यांचा वापर करुनच रुग्ण बरा करावा. रेमडीसीवीरचा आग्रह कुणाला करु नका. रॅपीड टेस्टचे किट सध्या बाजारात उपलब्ध नाहीत. तर ज्यांना अशी लक्षणे आढळली तर त्यांनी दवाखान्यात उपचारासाठी तातडीने दाखल होवून उपचार करावेत, असेही त्यांनी सांगितले.

नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी करोना पेशंटसाठी आवश्यक असलेले ऑक्सीजन, रेमडेसीवीर इंजेक्शन तातडीने मिळावे. तसेच श्रीरामपूर नगरपरिषदेला एक कार्डियाक रुग्णवाहिका मिळावी. श्रीरामपूरसाठी रॅपीड टेस्टचे किट वाढवून मिळावेत. तसेच श्रीरामपुरातील आशा स्वयंसेविकांची पदे वाढवून द्यावीत अशा मागण्या केल्या.

राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अविनाश आदिक यांनी, पत्रकार अशोक तुपे यांचे करोनामुळे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अविनाश आदिक, नगरसेवक किरण लुणिया, सभापती संगिता शिंदे, पंचायत समिती सदस्या डॉ. सौ. वंदना मुरकुटे, लकी सेठी, सचिन बडधे आदिंनी आपल्या मागण्या मांडल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या