श्रीरामपूर पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडून वर्षभरातील बाराहून अधिक गुन्ह्यांची कबुली

jalgaon-digital
2 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत माळवाडगाव, भामाठाण येथील तिघा आरोपींवर 12 महिन्यांत बारा गुन्हे दाखल असून तिघांपैकी दोन जणांच्या मुसक्या आवळण्यात तालुका पोलिसांना यश आले असले तरी एका अट्टल गुन्हेगाराचा पोलिसांना अद्याप छडा लागलेला नाही. बारा महिन्यांत बाराहून अधिक गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे.

श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वडाळा महादेव, हरेगाव, मुठेवाडगाव, माळवाडगांव, माळेवाडी या गावांत गेल्या एक वर्षापासून या तिघा आरोपींनी अन्य गुन्हेगारी प्रवृत्तीच्या महिला, पुरुष यांच्या मदतीने अगोदर भुरट्या व नंतर घरफोडी, जबरी चोर्‍या करण्यास सुरुवात केली. श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे, श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे, विरगाव (वैजापूर) पोलीस ठाणे, शिलेगाव (गंगापूर) येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तालुका पोलीस ठाण्यात सर्वाधिक भादंवि कलम 379, 34 चे आठ, एक दरोडा व खुनी हल्ल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत.

रात्री चोर्‍या करून दिवसा राजरोसपणे गावात येऊन बसत असे. पोलिसांनी एखाद्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर जामिनावर बाहेर येताच पुन्हा चोरी करत. माळवाडगाव, मुठेवाडगाव, भामाठाण परिसरात सोयाबीन कट्टे, गायी, बकर्‍या, मोटार पंप, मोटारसायकल अशा एक ना अनेक गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे. या गुन्ह्यातून त्या गुन्ह्यांमध्ये पोलीस त्यांना टाकत असले तरी यातील अट्टल सुशिल वाकेकर (रा. भामाठाण) हा फरार आहे.

तेजस मोरे व एका महिलेस मुठेवाडगाव गायीच्या चोरी प्रकरणात गावकर्‍यांनी मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात दिले. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांनी आपल्या सहकार्‍यांसह सापळा रचून सुजित आसने यास माळवाडगाव येथे पळून जाताना शिताफीने पकडले. या तरुणांवर बारा महिन्यांत बाराहून अधिक गुन्हे दाखल आहेत तर मुद्देमाल मूळ मालकास परत मिळाल्याने कित्येक गुन्हे दाखल झालेले नाहीत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *