Thursday, April 25, 2024
Homeनगरपालिकेसमोरील श्राध्द, इमारतींच्या बांधकामावरून आरोप-प्रत्यारोप

पालिकेसमोरील श्राध्द, इमारतींच्या बांधकामावरून आरोप-प्रत्यारोप

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

पालिकेसमोर विरोधी गटाच्या नगरसेवकांनी केलेले विकासाचे श्राध्द आंदोलनावरून श्रीरामपूर नगरपालिकेच्या सभेच्या सुरुवातीलाच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

- Advertisement -

या मुद्यावरून विषय शहरातील बेकायदा इमारतींच्या बांधकामावर गेल्याने सभेत नगराध्यक्षा अनुराधा आदिक व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा घणाघात झाला.

श्रीरामपूर नगरपरिषदेची वार्षिक सर्वसाधारण काल झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अनुराधा आदिक होत्या. यावेळी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे व पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीलाच ससाणे गटाने मध्यंतरी पालिकेसमोर घातलेल्या श्राद्धासंदर्भात आपल्याला बोलायचे असल्याचे सांगत नगराध्यक्षा अनुराधा आदिक म्हणाल्या, मध्यंतरी पालिकेसमोर जो श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम विरोधकांनी केला. केवळ स्वतःची बांधकामे पाडावी लागली. स्वतःच्या धंद्यांना पायबंद बसला. चार वर्षात स्वतःचा व्यक्तीगत विकास थांबल्याने श्रीरामपूरचा विकास मेला असे रडगाणे विरोधक लावत आहेत.

माझे वडील स्व. गोविंदराव आदिक यांनी श्रीरामपूरमध्ये केलेला विकास ते गेले तरी विकास मेला नाही तो अजूनही जिवंत आहे. मात्र विरोधकांचा व्यक्तीगत विकास गेल्या चार वर्षांत मेल्याने लहान मुलांसारखा खेळ आता त्यांनी बंद करावा, असे सांगत अनुराधा आदिक यांनी साईसुपर मार्केट, पाटणी कंपाऊंड, टांगा स्टॅण्ड, बळवंत भुवन यासह अनेक बांधकामाची यादीच वाचून दाखविली.

शिवाय हे जे लोक आहेत ते पूर्वी कुठे राहायचे ?कोणत्या घरात राहायचे? आज कोणत्या घरात रहातात ? जिजामाता चौकात मुतारी पाडून कोणी गाळे बांधले? आदी सवाल उपस्थित करत असताना श्रीनिवास बिहाणी म्हणाले, आम्ही डेव्हलपर आहोत, थोडेफार साईड मार्जिन कमी राहिले असेल, परंतु त्यात आमचे पैसे गुंतलेले असल्याने आम्हीच ते बांधकाम पाडले.

आम्ही कोणतेही बेकायदेशीर काम केलेले नाही स्व, गोविंदगव आदिकांच्या कामाचा आम्ही आदरच करतो. परंतु प्रत्येक राजाचा मुलगा त्याच्यासारखाच हूशार असतो, असे नाही. सुरुवातीला प्रत्येकजण गरीबच असतो. 30 वर्षापूर्वी मी हमाली करत होतो. प्रत्येकजण आपल्या कष्टाने नंतर मोठा होत असतो, असे बिहाणी म्हणाले.

त्यावर आदिक यांनी मी व्यक्तीगत तुम्हाला बोलले नाही तुम्ही का स्वत:वर ओढवून घेता, असे त्या म्हणाल्या. यावेळी दिलीप नागरे म्हणाले, ऊठसूठ कोणी बळवंत भुवन, पाटणी कंपाऊंड यावरच बोलता, असे म्हणताच ती बांधकामे चुकीचे असल्यानेच बांधकाम पाडावे लागले. आणखी एका प्लॉटची फाईल माझ्याकडे आहे, ती मी आता काढते, असा इशारा यावेळी आदिक यांनी दिला.

शहरातील बेकायदा बांधकामाबाबत 132 जणांची यादी आपण पालिकेला दिली आहे मात्र कारवाई झाली नाही, असा आरोप बिहाणी यांनी केला. त्यावर आठ दिवसात सर्व्हे करू, असे मुख्याधिकार्‍यांनी सांगितले.

शहरातील डेली मार्केटचा ठेका लवकरात लवकर नवीन ठेकेदाराला देण्याचा निर्णय यावेळी झाला. मार्च 20 पर्यंतचे ठेकेदाराकडून पैसे घेवून करोना काळातील रक्कम त्याला माफ करण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली.

श्रीरामपूर शहरातील नेहरु भाजी मंडईचे विद्युतीकरणासह तेथे सीसीटीव्ही बसवण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. या सभेमध्ये नगरसेवक किरण लुणिया, सौ. शेळके आदींनीही समस्या मांडल्या, शहरात काही ठिकाणी कुणी रहात नसताना घरपट्टी आकारली जाते ती बंद करावी अशी मागणी राजेश अलघ यांनी केली तर ओपन थिएटर येथे बहुतांशी मुस्लीम समाजाचे लग्न होत असल्याने ते दुरुस्त करावे, अशी मागणी मुजफ्फर शेख यांनी केली.

सध्या बांधकाम विभागाकडील बांधकाम परवानगी प्रकरणे, बिगर शेती विषयक प्रकरणे व त्या अनुषंगीक रेकॉर्ड हे पुरेशा जागे अभावी व्यवस्थितपणे ठेवण्यात आलेले नाही. जुनी बांधकाम परवानगी प्रकरणे व काही नकाशे हे जीर्ण झालेले असून त्याचे तुकडे. पडत आहेत. सदर रेकॉर्ड हे विस्कळीत झालेले आहे.

बांधकाम विभागाकडील प्रॉपर्टी विषयक रेकॉर्ड हे अतिशय महत्वाचे असून सदरचे रेकॉर्ड हे स्कॅनिंग करुन डिजीटल फाईलमध्ये कायमस्वरुपी सुस्थितीत जतन करुन ठेवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने येत्या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये पुरेशी तरतूद करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका हेमा गुलाटी यांनी केली.

पुरस्कार प्राप्त ‘त्या’ नावावर आक्षेप

करोना काळात चांगले काम करणार्‍या व्यक्तींना यंदा श्रीरामपूर भूषण पुरस्कार जाहीर करत असल्याचे नगराध्यक्षा अनुशधा आदिक यांनी यावेळी स्पष्ट केले. पुरस्कार देण्यात आलेल्या एका डॉक्टरांबाबत नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी आक्षेप घेतला, डॉक्टरांनी सेवाभावी काम केले नाही त्यांनी पैसे कमविले. तो त्यांचा घंदा आहे, असे आक्षेप शेख यांनी एका डॉक्टरांबद्दल घेतला. मात्र करोनाच्या गंभीर काळात कुणीही पुढे आलेले नसताना त्या डॉक्टरांनी रात्रंदिवस सेवा दिली. शेवटी मेडिकल आणि इतर सेवेसाठी पैसे लागतातच. त्यामुळे त्यांची सेवा ही नाकारता येणार नाही. त्यावर राजेश अलघ यांनीही स्थानिक डॉक्टरांवर असा आक्षेप घेतल्यास उद्या कोणी पुढे येणार नाही, असा मुद्दा मांडला तर नगराध्यक्षा आदिकांनी बिहाणी यांचा हवाला देत ‘त्या’ डॉक्टरांनी चांगले काम केले की नाही तुम्ही सांगा, असे म्हणताच बिहाणी यांनी त्यास दुजोरा दिला. शेवटी पालिकेने ठरविलेली सर्व नावे फायनल झाली.

‘तो’ नगरसेवक कोण ?

शहरातील स्वच्छतेचा ठेका ज्या ठेकेदाराने सोडला त्याने धक्कादायक माहिती सांगितली, असे नगसेवक श्रीनिवास बिहाणी म्हणाले, माझे ट्रॅक्टर लावा, ट्रिपा झाल्या किंवा नाही तरी मला पैसे द्या, असे म्हणत एक नगरसेवक मागे लागतो, असे या ठेकेदाराने आपल्याला सांगितल्याचे बिहाणी यांनी सांगताच नगरसेवकाचे नाव जाहीर करा, अशी मागणी राजेंद्र पवार, संतोष कांबळे, किरण लुणिया, मुक्तार शहा आदींनी केली. त्यावर चेंबरमध्ये चला नाव सांगतो, असे बिहाणी म्हणताच सभागृहात आरोप झाला तर उत्तरही सभागृहात द्या, सार्‍या गावाला कळू द्या तो नगरसेवक कोण आहे? असे दीपक चव्हाण यांनी म्हटले. परंतु मिटींगच्या शेवटपर्यंत त्या नगरसेवकाचे नाव काही पुढे आले नाही.

आधी हरेगावचा बंगला खाली करा – कांबळे

श्रीरामपूर नगरपरिषदेच्या सर्वसाधण सभा वैयक्तिक मुद्यांवर गाजली. पालिका श्राध्द प्रकरणावरुन चालू असलेल्या वादात बोलत असताना नगराध्यक्षा व भारती कांबळे यांचे नेहमीपमाणे आरोप-प्रत्यारेप झाले. त्यामध्ये नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी नगरसेविका भारती कांबळे यांना आमचे घर खाली करा असे सांगताच भारती कांबळे यांचा पारा चढला. त्यावर तुम्ही हरेगावं बंगला खाली करा मग स्वाभिमानाच्या गोष्टी करा असा उपरोधिक टोला नगराध्यक्षा आदिकांना लगावला. त्यावर नगराध्यक्षाही संतापल्या. तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. त्यावर मला जनतेने निवडून दिले आहे मला अधिकार आहे. त्यावर तुम्ही केवळ एका भागातून निवडून आल्या परंतु मी संपूर्ण शहरातून निवडून आले आहे मला शिकवायचे नाही असे नगराध्यक्षा म्हणाल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या