Saturday, April 27, 2024
Homeनगरसहा महिन्यानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश

सहा महिन्यानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सहा महिन्यानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले असून याप्रकरणी परराज्यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

याबाबतची हकिगत अशी की, दि. 18 जानेवारी 23 रोजी श्रीरामपूर ते वाकडी रोडवरील खंडाळा गावच्या शिवारात यशवंत बाबा चौकीजवळ कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी अनोळखी पुरुषाच्या डोक्यात काहीतरी वस्तुने मारहाण करुन, चेहरा विद्रुप करुन खून केला व रोडचे बाजुला असलेल्या खड्ड्यात टाकून पुरावा नष्ट केला. याबाबत पोलीस नाईक मच्छिंद्र किसन शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं 57/2023 भादंवि कलम 302, 201 प्रमाणे अनोळखी इसमाविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. श्री. आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषणाव्दारे सखोल तपास करताना संशयीत मयत इसम मध्यप्रदेश राज्यातील असल्याचे दिसून येत असल्याने खात्री करणे कामी श्री. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, संतोष लोंढे, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे, किशोर शिरसाठ, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे व चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी कोतकर अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तसेच पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी त्यांचेकडील पोलीस नाईक बिराप्पा करमल यांची मदत घेवुन मध्यप्रदेश येथे पुढील तपासकामी रवाना केले.

सदरचे पथक मध्यप्रदेश राज्यात जाऊन संशयीत मयत इसमाच्या मोबाईल क्रमांकाच्या पत्त्यावर जावून खात्री करताना पथकास सदरचा मोबाईल क्रमांक हा सोनू समरालाल चौधरी हा वापरत होता. परंतु सोनू चौधरी हे हरवले असल्याबाबत अमरपाटण पोलीस स्टेशन (मध्यप्रदेश) येथे तक्रार नोंद केली असल्याची सोनू चौधरीच्या नातेवाईकांकडुन माहिती मिळाली. सोनू चौधरी याच्या नातेवाईकांना मयताचा फोटो दाखविला असता त्यांनी मयत हा सोनू समरालाल चौधरी (वय 25, रा. खरवाही, ता. अमरपाटण, जिल्हा सतना, राज्य मध्यप्रदेश) हा असल्याचे सांगून अंगातील कपडे व पायातील कडे पाहुण ओळखले.

सोनु चौधरी यांच्याबाबत नातेवाईकांकडे अधिक माहिती घेता, तो त्याचा मित्र भुपेंद्र शिवप्रसाद रबि (वय 23, रा. सुनौरा, ता. अमरपाटण, जिल्हा सतना, राज्य मध्यप्रदेश, सध्या रा. संजयनगर, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) याचेकडे जातो, असे सांगुन गेला असल्याची माहिती पथकास मिळाली. भुपेंद्र रबि याचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन त्याचा शोध घेताना तो श्रीरामपूर येथे असल्याचे तांत्रिक विश्लेषणावरुन दिसून आल्याने पथकाने मयत सोनू चौधरी हा हरवल्याबाबतची अमरपाटण पोलीस स्टेशन येथून माहिती घेतली.

त्यानंतर पथकाने भुपेंद्र शिवप्रसाद रबि याचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार सुरज रामनाथ रावत (रा. सुनौरा, ता. अमरपाटण, जि. सतना, राज्य मध्यप्रदेश सध्या रा. संजयनगर, श्रीरामपूर, जि. अहमदनगर याचे मदतीने केल्याचे सांगितले. त्यानंतर सुरज रावत यास ताब्यात घेवुन दोघांकडे सोनु चौधरी यास का मारले याबाबत विचारपूस करता आरोपी भुपेंद्र याने सांगितले की, त्याचे गांवातील एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. सदर महिला ही तिच्या पतीसोबत वाद झाल्याने तिचे राहते घरून पळुन भुपेंद्र याच्याकडे मध्यप्रदेश येथुन श्रीरामपूर येथे आलेली होती. भुपेंद्र याने तिला लोणी येथे एक खोली घेवुन राहण्यासाठी दिलेली होती व तोदेखील तिच्यासोबत राहत होता. त्यावेळेस त्याला समजले की, सदर महिलेचे सोनू चौधरी याचेसोबत देखील प्रेमसंबध आहेत.

याबाबत त्याने सदर महिलेस विचारणा करता, तिने ती सोनू चौधरी याचेसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले व तू माझा फक्त मित्र बनुन रहा, असे म्हणाली. याचा भुपेंद्र याला राग आल्याने व त्याच्या प्रेमात सोनू चौधरी अडथळा बनल्याने त्याने सोनू याला तुझे सदर महिलेशी लग्न लावुन देतो, तू श्रीरामपूर या ठिकाणी ये, असे म्हणून त्यास बोलावून घेतले. सोनू हा रेल्वेने मनमाड येथे आल्यावर भुपेंद्र व त्याचा साथीदार सुरज रावत यांनी मनमाड येथे जावून सदर महिला ही श्रीरामपूर येथे असल्याचे सोनू यास सांगुन त्याला मोटारसायकलवर बसवुन श्रीरामपूर येथे एमआयडीसी परिसरात आणून दारु पाजली व सोनू चौधरी हा दारुच्या नशेत असताना त्याचे डोक्यावर व तोंडावर लाकडी दांडक्याने मारुन त्यास जिवे ठार मारले तसेच त्याची ओळख पटू नये म्हणुन त्याचा चेहरा विद्रुप केला असल्याची हकिगत सांगितली.

ताब्यातील दोघांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे. पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या