Friday, April 26, 2024
Homeनगरविषय समित्या विना श्रीरामपूर पालिकेची चार वर्षे

विषय समित्या विना श्रीरामपूर पालिकेची चार वर्षे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नगरपालिकेची निवडणूक होऊन चार वर्षे झाली आणि पालिकेची निवडणूक आता एक वर्षावर आली तरी देखील

- Advertisement -

श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये विषय समित्या स्थापन होऊ शकल्या नाहीत. राज्यातील नगरपालिकांच्या इतिहासामध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी असताना देखील विषय समित्या स्थापन न झालेली श्रीरामपूर नगरपालिका एकमेव आहे.

चार वर्षांपूर्वी पालिकेची निवडणूक होऊन माजी आमदार स्व.जयंतराव ससाणे यांची पंचवीस वर्षांची एकहाती सत्ता संपुष्टात येऊन अनुराधा आदिक या जनतेमधून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. त्यांच्याबरोबर त्यांच्या गटाचे दहा नगरसेवक तर ससाणे गटाचे 22 नगरसेवक निवडून आले. सुरुवातीला ससाणे गटाला पालिकेत बहुमत असताना पक्षांतर्गत गटबाजीतून अंजुम शेख व त्यांच्या सहकार्‍यांनी दहा नगरसेवकांचा वेगळा गट निर्माण केला.

तसे पत्र त्यांनी तत्कालीन पीठासन अधिकार्‍यांना दिले आणि नगराध्यक्ष आदिक यांच्या गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे पालिकेत आदिक गटाचे बहुमत झाले. मात्र त्याचवेळी गटनेते पदावरून काँग्रेस पक्षांतर्गत वाद होऊन एका गटाने अंजुम शेख तर दुसर्‍या गटाने संजय फंड यांना गटनेता करण्याचे पत्र दिले.

आदिक गटाने राजेंद्र पवार यांना गटनेता केले. ससाणे गटाचे गटनेता पदाचे प्रकरण जिल्हाधिकार्‍यांकडे न्यायप्रविष्ठ झाले. त्यामुळे नगरपालिकेत कोणालाही गटनेता म्हणून मान्यता मिळू शकली नाही. त्यातूनच विषय समित्या निवडीसाठी बोलावलेली बैठक अनेक वेळा तहकूब करावी लागली . विषय समित्या नसल्यामुळे पालिकेचा सर्व कारभार नगराध्यक्ष आदिक या गेली चार वर्षे पाहत आहेत.

पालिकेमध्ये वेगवेगळ्या विषय समित्या असल्याने नगरसेवकांना त्याठिकाणी सभापती, उपसभापती म्हणून काम करण्याची संधी मिळत होती. त्यातून सत्तेचे विभाजन होऊन नागरिकांना विषय समितीच्या सभापतींना संपर्क करणे सोपे जात होते. त्यातून आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम अशा महत्त्वाच्या समित्यांमार्फत शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविल्या जात होत्या. शहराच्या विकासाला हातभार देखील लागत होता. मात्र आता चार वर्षे झाली तरी विषय समित्या नसल्याने कोणत्याही नगरसेवकाला सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळालेली नाही.

गटबाजीचा हा अनोखा खेळ फक्त श्रीरामपूर नगरपालिकेत दिसून येत आहे. याबाबत नगरसेवकांमध्ये सुद्धा निरुत्साह दिसून आला. जनतेने निवडून दिलेले नगरसेवक विषय समित्या स्थापन करण्यामध्ये देखील अपयशी ठरले. अनेक नगरसेवक हे दुसर्‍या प्रभागातून निवडून आलेले असल्यामुळे त्यांना शहराच्या विकासाची कोणतीही चाड दिसून येत नाही. चार वर्षांमध्ये अनेक जण आपल्या भागामध्ये सुद्धा गेलेले नाहीत.

त्यामुळे पालिकेच्या अशा नगरसेवकांबद्दल जनतेमध्ये नाराजी दिसून येत आहे. भविष्य काळामध्ये आपल्या भागातील स्थानिक माणूसच नगरसेवक म्हणून निवडून दिला पाहिजे, अशी चर्चा शहरांमध्ये सर्वत्र दिसून येत आहे. विषय समित्या नसल्याने विविध भागातील विकास कामांची मंजुरी तसेच निधीची उपलब्धता यांना सुद्धा मर्यादा आल्या आहेत.

पालिकेमध्ये ठराविक दोन-तीन नगरसेवक सोडले तर इतर नगरसेवकांचं ऐकलं जात नाही, अशी जाहीर चर्चा शहरांमध्ये सध्या होताना दिसत आहे. अनेक नगरसेवक देखील या गोष्टीला दुजोरा देताना आढळतात. चार वर्षांमध्ये जे विषय समित्या स्थापन करू शकले नाहीत असे नगरसेवक शहराचा विकास काय करणार? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. अनुराधा आदिक यांना कोणताही अनुभव नसताना त्या जनतेमधून थेट नगराध्यक्ष झाल्या.

त्यांना सहकार्य करण्याऐवजी बर्‍याच नगरसेवकांनी आडमुठेपणाची भूमिका स्वीकारल्याने शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. शेवटच्या वर्षात तरी विषय समित्या स्थापन होऊन नागरिकांच्या प्रश्नांना आणि शहराच्या विकासाला चालना मिळेल,अशी आशा शहरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या