Tuesday, April 23, 2024
Homeनगरनगरपालिकेच्या कचरा गाड्या गायब

नगरपालिकेच्या कचरा गाड्या गायब

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नगरपालिकेच्या आरोग्य खात्याचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून शहरातील कचरा उचलणार्‍या गाड्या अचानकपणे चार चार दिवस गायब होत असल्याने शहरांमध्ये कचरा साचत आहे. घरामध्ये लोकांनी चार दिवस कचरा सांभाळायचा कसा? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

- Advertisement -

नगरपालिकेचा कचर्‍याचा ठेका हा नेहमी वादाचा विषय आहे. ज्या ठेकेदाराला कचर्‍याचा ठेका दिला जातो. तो काही दिवसातच त्याला वैतागतो. शहराच्या अनेक भागात गेल्या आठवडाभरापासून कचरा गाड्या दिसलेल्या नाहीत. पूर्वी दिवसाआड येणार्‍या गाड्या आता चार चार दिवस येत नाहीत. त्यामुळे घरामध्ये चार दिवस कचरा सांभाळून ठेवणे शक्य नसल्याने लोकांनी आता रस्त्याच्या कडेला कचरा फेकण्यास सुरुवात केली आहे. त्यातून आरोग्याचे नवीन प्रश्न निर्माण होत आहेत.

सर्वात मोठा भाग असलेल्या वार्ड नंबर 2, अहिल्यादेवी नगर, फातेमा कॉलनी, मिल्लतनगर, रामनगर, संजय नगर, लक्ष्मीनारायणनगर अशा सर्वच भागात चार दिवसांपासून कचरा गाडीचे दर्शन झालेले नाही. पालिकेकडे नेमके किती गाड्या आहेत याची माहिती जनतेसाठी जाहीर करावी व प्रत्येक भागामध्ये कचरा उचलण्यासाठी कशाप्रकारे यंत्रणा कार्यरत आहे याची माहिती मुख्याधिकारी व आरोग्य अधिकारी यांनी नागरिकांच्या माहितीसाठी वर्तमानपत्रातून जाहीर करावी. किमान एक दिवसाआड कचरा गाड्या प्रत्येक भागात गेल्या पाहिजे. आणि तो कचरा उचलला गेला पाहिजे कचरा उचलणारे कामगार सुद्धा नीट काम करीत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.

नगराध्यक्ष, नगरसेवक व मुख्याधिकारी यांनी याबाबत दक्षता घेऊन आरोग्य खात्याचा कारभार सुधारावा आणि शहरवासियांची कचरा समस्यापासून मुक्तता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. येत्या दोन दिवसात शहरातील सर्व भागातील कचरा उचलला गेला नाही तर नगरपालिकेत मुख्याधिकारी व आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सदरचा कचरा आणून टाकण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या