Wednesday, April 24, 2024
Homeनगररोजंदारीवरील कामगारांचे प्रश्न अद्यापही अधांतरीच !

रोजंदारीवरील कामगारांचे प्रश्न अद्यापही अधांतरीच !

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर पालिकेच्या घनकचरा स्वच्छतेच्या ठेकेदाराने सहा महिन्यांच्या आतच परवडत नाही म्हणून काम सोडून पळ काढला.

- Advertisement -

त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या रोजंदारीवरील कामगारांचा प्रश्न कायम राहिला. शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडालेला असताना या कामगारांनी काम करण्याची तयारी दाखविली. एक तर याविषयी सफाईची नवीन निविदा काढली जात नाही. आणि या कामगारांचा रोजीरोटीचा प्रश्नही सोडविला जात नाही. त्यामुळे अधांतरी स्थितीत राहून उपाशीपोटी राहून रोजंदारीवरील कामगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधारी व विरोधी गटांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सध्या पालिकेच्या आरोग्य विभागात सोळा कचरा गाड्या व सहा ट्रॅक्टरच्या साह्याने सुमारे 237 कामगार दररोज शहरातील कचरा उचलणे, गटार सफाई व इतर साफसफाईची कामे करतात. रोजंदारीवरील कामगारांना मागील तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. पालिकेच्या भोंगा लावलेल्या 16 कचर्‍याच्या घंटागाड्या दररोज सकाळी सहा वाजता शहराच्या विविध भागात रवाना होतात.

शहरवासियांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये म्हणून रोजंदारीवरील कामगारांनी मोठे सहकार्य नगरपालिका प्रशासनाला देऊ केले आहे. दिवाळीआधीपासून त्यांना पगार मिळालेला नाही. ऑक्टोबरमध्ये ठेकेदार अचानकपणे काम सोडून पळून गेला. तेरा नोव्हेंबरला त्याने काम बंद केले. आठवडाभर काम बंद राहिलं; परंतु 20 नोव्हेंबरपासून आजपर्यंत रोजंदारीवरील कामगार आरोग्य सेवेमध्ये काम करत आहेत.

पुढील काळामध्ये नगरपालिकेने कचर्‍याचा ठेका देण्याच्या भानगडीत न पडता आपल्या आरोग्य खात्याच्या कर्मचार्‍यांमार्फतच शहरातील साफसफाईचे काम करावे. मदतीला रोजंदारीवरील कामगार घ्यावेत. शहरवासियांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

तीन महिने झाले पगार नाही. पण पगार मिळेल या अपेक्षेने आम्ही दररोज सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत हे काम करीत असतो. यामध्ये नागरिकही सहकार्य करतात. काही ठिकाणी नागरिक असहकार्य करतात. अशा भावना कचरा गाडीवरील चालक व महिलांनी बोलून दाखविल्या.

घंटागाड्यांमुळे शहरातील सर्व भागातील साफसफाई दररोज होत आहे. काही ठिकाणी जादा कचरा ट्रॅक्टर उचलून नेतात. सोळा घंटा गाड्या, सहा ट्रॅक्टर त्यांच्या जोडीला आरोग्याच्या वेगवेगळ्या विभागातील 247 रोजंदारीवरील कामगार हे दररोज आरोग्य सेवेचे कार्य चांगल्या प्रकारे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या