Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीरामपुरातील ‘मुल्ला कटर’ प्रकरण विधानसभेत गाजले

श्रीरामपुरातील ‘मुल्ला कटर’ प्रकरण विधानसभेत गाजले

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

भाजप आमदार नितेश राणे यांनी काल सभागृहात लक्षवेधीमध्ये धर्म परिवर्तनाचा मुद्दा मांडला. यावेळी श्रीरामपुरातील धर्मांतरावरून नितेश राणे यांनी विधानसभेत धर्म परिवर्तनाचे रेट कार्ड सादर केले. हिंदू मुलींना फसवून धर्मपरिवर्तन केले जाते. त्यामुळे धर्मांतर कायदा लागू करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली.

- Advertisement -

श्रीरामपुरातील मराठी मुलीचे धर्मपरिवर्तन झाल्याची घटना नुकतीच घडली. राज्यात धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली त्रास दिला जातो. अनेक अल्पवयीन मुलींना त्रास दिला जातो. त्यांना फसवण्यासाठी मुलांना आर्थिक ताकत दिली जाते. एक रेट कार्ड आहे की, शीख तरुणीला फसवले तर किती? हिंदी मुलीला फसवले तर किती? मराठा मुलीला फसवले तर किती? ब्राह्मण मुलीला फसवले तर किती? अशी रेट कार्ड तयार आहेत. एवढ्यावरच ते थांबत नाही, तर त्या मुलींना विकण्यापर्यंत गोष्टी जातात. याप्रकरणातील सानप नावाचे पोलीस अधिकारी आहेत, त्यांना बडतर्फ केले पाहिजे. अशा घटना घडत आहेत, यांच्यावर आळा बसण्यासाठी आपल्या राज्यात धर्मांतर विरोधी कायदा लागू करणार का?, असे म्हणत नितेश राणे यांनी सरकारला प्रश्न विचारला.

नितेश राणे यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्यावर प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नितेश राणे यांनी मांडलेला विषय गंभीर आहे. पीडिता अल्पवयीन असताना सातत्यानं तिच्यावर तीन वर्ष अत्याचार करण्यात आला. तक्रार दाखल होऊनही पोलीस अधिकारी सानप यांनी कारवाई केली नाही. हे उघडकीस आल्यानंतर पोलीस अधिकारी संजय सानप यांना निलंबित करण्यात आलं आहे. नितेश राणे यांनी मागणी केल्याप्रमाणे लगेच बडतर्फ करता येत नाही, पण त्यांना कडक शिक्षा केली जाईल.

जर आरोपीसोबत त्यांचे काही संबंध आहेत का? हेसुद्धा तपासलं जाईल. आणि तसं काही आढळलं तर पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल. आरोपीवरही मोठ्या प्रमाणात गुन्हे आहेत. त्याचे सर्व गुन्हे तपासून विशेष कायदा अंतर्गत कारवाई करता येईल का? हे लक्षात घेऊन कारवाई केली जाईल. पुढे बोलताना राज्यात धर्मांतर बंदी कायदा अस्तित्वात आहे. जबरदस्ती कोणी कुणाचं धर्मांतर करू शकत नाही. या तरतुदींमध्ये कमतरता असेल तर अभ्यास करून या तरतुदी टोकदार करू, कुठेही आमिष देऊन किंवा जबरदस्ती करून कोणाचे धर्मांतर करता येत नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, श्रीरामपुरात एका अल्पवयीन मुलीचे धर्मांतर करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आरोपीने 2019 मध्ये 13 वर्षांची असताना पीडितेला आरोपी मुल्ला कटर उर्फ इम्रान कुरेशी याने बळजबरीने शाळेतून उचलून नेले आणि तिचे धर्मांतर केले. त्यानंतर तिच्याशी निकाह करुन तीन वर्षांपासून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ केला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप दोषी आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा पोलिसप्रमुख मनोज पाटील यांनी सानप यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

निलंबित करण्याऐवजी सानप यांना बडतर्फ करणार का? – अजितदादा

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, या प्रकरणात सानप यांचं निलंबन केलं. त्यापाठोपाठ तक्रार मागे घेण्यासाठी धमकावल्यामुळे पोलीस नाईकालाही निलंबित केलं. आपल्या पोलीस खात्यात निलंबन झाल्यानंतरही पोलिसांना काही वाटत नाही. कारण त्यांचा अर्धा पगार त्यांना मिळत असतो. एवढंच नाहीतर ते पोलीस असल्यासारखेच वावरत असतात. त्यामुळे कायद्यात काही बदल करून निलंबित करण्याऐवजी संबंधित अधिकार्‍यांना बडतर्फ करणार का? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.

तीन महिन्यात चौकशी, गरज पडल्यास बडतर्फीची कारवाई करू – फडणवीस

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही संबंधित अधिकार्‍याला बडतर्फ करणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, आपल्याला पोलीस अधिकार्‍याला थेट बडतर्फ करायचा अधिकार आहे. याठिकाणी वापर करता येईल का बघू. गरज पडल्यास बडतर्फीची कारवाई करू. अन्यथा कोणत्याही परिस्थितीत तीन महिन्यांत चौकशी करण्याच्या सूचना विभागाला देऊ.

श्रीरामपूर येथील अशा प्रकारच्या एका घटनेत पीडितेची फिर्याद दाखल करून न घेता उलट तिच्या कुटुंबियांना तडीपारीची धमकी देत तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय सानप व त्यांचे सहकारी पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्ष व इतर संघटनांनी केला होता. त्यावर श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी तपास करून आरोपीस अटक केली. मिटके यांच्या तपासात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय सानप व पोलीस कर्मचारी पंकज गोसावी हे दोषी आढळल्याने या दोघांनाही चौकशीअंती निलंबित करण्यात आले आहे.

श्रीरामपुरात अठरा मुलींचे धर्मांतर आ. सुनील कांबळेंचा विधानसभेत आरोप

श्रीरामपूरमध्ये हिंदू मुलींच्या धर्मांतराच्या विषयावर पुणे येथील भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी बुधवारी आक्रमकपणे आवाज उठवित संबंधित अधिकार्‍यांवर व दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. तसेच हिंदू मुलींना पळवून नेऊन त्यांचे शारीरिक, मानसिक शोषण करीत त्यांचे धर्मांतर केल्याच्या श्रीरामपूर शहर व तालुक्यात अठरा घटना घडल्याचा आरोपही आ. कांबळे यांनी केला. श्रीरामपूरला मी स्वतः त्या कुटुंबाची भेट घेऊन त्या मुलीच्या नातेवाईकांना भेटून आलेलो आहे. गेल्या सहा महिन्यांत श्रीरामपूर परिसरात 18 मुलींचे धर्मांतर झालेले आहे. अशा मुलींचे धर्मांतर करून त्यांचे लग्न ज्याठिकाणी लावून देण्यात आले, तेथील धर्मगुरूंसह संबंधित धार्मिक स्थळांचे पदाधिकारी व दोषी पोलीस अधिकार्‍यांविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी आ. सुनील कांबळे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या