Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीरामपूर शहरात आठ दिवस लॉकडाऊन !

श्रीरामपूर शहरात आठ दिवस लॉकडाऊन !

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात करोना बाधित रुग्णांची संख्या हजारापार जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे काल श्रीरामपुरात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत

- Advertisement -

पहिल्या टप्प्यात तीन दिवस व्यवसायिकांची वेळ 9 ते 4 अशी ठेवावी व त्यानंतर रविवार दि. 13 ते 20 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण श्रीरामपूर शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र प्रत्येकाने व्यक्त केलेल्या मतात जर तरची भाषा दिसून आल्याने या बंदबाबत अजूनही साशंकता व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांत करोना बाधितांची संख्या प्रचंड वाढल्याने अखेर श्रीरामपूर शहरात लॉकडाऊन झाले पाहिजे हा विषय पुढे आला. नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन सर्वानुमते लॉकडाऊनचा निर्णय घेण्याचे ठरविले. त्यानुसार काल नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, नगरसेवक संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, राजेंद्र पवार, किरण लुणिया, जितेंद्र छाजेड, मुख्तार शहा, दिलीप नागरे, राजेश अलघ, रवी पाटील, दिपक चव्हाण, प्रकाश ढोकणे, रविंद्र गुलाटी, रितेश रोटे, काँगे्रेस शहराध्यक्ष संजय छल्लारे, शिवसेनेचे डॉ. महेश क्षीरसागर, अशोक थोरे, सचिन बडधे, राजेंद्र देवकर, भाऊसाहेब डोळस, दिपक चव्हाण, बाळासाहेब गांगड, अशोक उपाध्ये, राजेंद्र सोनवणे, आपचे तिलक डुंगरवारल,

मर्चंटचे अध्यक्ष विशाल फोफळे, राष्ट्रवादीचे लकी सेठी, अहमदभाई जहागिरदार, प्रविण गुलाटी, अ‍ॅड. समीन बागवान, आरपीआयचे सुभाष त्रिभूवन, भारत तुपे, प्रविण गुलाटी, संजय जोशी, भाजपाचे दिपक दुग्गड, सतिश सौदागर, विशाल अंभोरे, ऋषिकेश डावखर, कुणाल करंडे, सुधीर वायखिंडे, मुन्ना पठाण, राजेंद्र पाटणी, साजिद मिर्झा, राजेश कुंदे, आदी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक म्हणाल्या, करोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर चालली आहे. ही साखळी तोडण्यासाठी आठ दिवस श्रीरामपूर बंद कारावे, यासाठी आग्रह होता. बंदचा निर्णय सर्वांच्या सहमतीने व्हावा म्हणून सर्वपक्षीय सदस्यांना बोलावण्यात आले.

बंदची टप्प्या टप्प्याने अंमलबजावणी झाली पाहिजे. सुरुवातीचे गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे तीन दिवस दुकानांची वेळ स. 9 ते सायं. 4 वाजेपर्यंत करुन रविवार दि. रविवार 13 सप्टेंबर ते रविवार दि. 20 सप्टेंबर या कालावधीत श्रीरामपूर शहर बंद करण्याचे जाहीर केले.

उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले, या काळात लॉकडाऊन करणे खूपच गरजेचे आहे. श्रीरामपूर शहर बंद करताना पोलीस प्रशासनाची मदत घेतली तर हा बंद यशस्वी होवू शकेल. या बंदचा निर्णय घेताना छोट्या छोट्या व्यावसायिकांना विश्वासात घेण्यात यावे. श्रीरामपूर शहर बंदला काँग्रेेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय फंड म्हणाले, रुग्णांसाठी नगरपालिकेने तसेच डॉक्टरांची समिती नेमून कक्ष उभारावा व त्याठिकाणी त्यांची तपासणी करुन रुग्णांची व्यवस्था करावी. याकाळात गोरगरिंबाची मोठी फरफट होत असून पॉझिटीव्ह रुग्णांसाठी सुविधा करावी, अशी मागणी केली.

श्रीनिवास बिहाणी म्हणाले, श्रीरामपूर लॉकडाऊन करणे अधिक गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनीच यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. किरण लुणिया म्हणाले, या बंदचा निर्णय घेण्याअगोदर नगरसेवक व अधिकारी व पदाधिकार्‍यांची समिती नियुक्त करुन विविध भागात जावून सर्व्हे करुन नागरिकांचे मत जाणून घ्यावे.

रविंद्र गुलाटी म्हणाले, करोना रुग्णांची साखळी तोडायची असेल तर त्यासाठी पालिकेच्या फंडातून करोना रुग्णांची व्यवस्था करावी, त्यासाठी काही खर्च पालिकेने घ्यावा. तसेच पैसा नसेल तर पालिकेच्या काही जागा असतील त्या विक्री करुन पैसा उपलब्ध करावा.

संजय छल्लारे म्हणाले, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. बंदमध्ये सहभागी होवून हा बंद यशस्वी कसा होईल यासाठी प्रयत्न करावा. असेही त्यांनी सांगितले.

भैरवनाथनगरचे सरपंच भारत तुपे म्हणाले, शहरालगतच्या गावांचा शहराशी मोठा संपर्क येत असल्यामुळे शहरात कडकडीत बंद ठेवल्यास अटकाव लागू शकेल.

यावेळी भाऊसाहेब डोळस, राजेंद्र पवार, रवी पाटील, दिपक चव्हाण, ऋषीकेश डावखर, मुख्तार शहा, दिलीप नागरे, साजिद मिर्झा, देवा अग्रवाल, सुभाष त्रिभूवन, श्री. जमादार, प्रविण गुलाटी, अ‍ॅड. सुभाष जंगले, कुणाल करंडे, भारत तुपे, अ‍ॅड. समिन बागवान, रमेश कोठारी, लकी सेठी, सचिन बडधे, दिपक दुग्गड, राजेंद्र सोनवणे, पत्रकार रमेश कोठारी, करण नवले, डॉ. महेश क्षीरसागर, विशाल फोफळे, आदींची भाषणे झाली.

सर्वसामान्यांचा विचार करुन बंदला विरोध

करोनाच्या संकटात मार्च ते जून या लॉकडाऊनच्या काळात मोठी आर्थिक फरफट या सर्वसामान्य छोट्या व्यावसायिकांची झाली. आता कुठे त्यांचे व्यवसाय रुळावर येत असताना पुन्हा श्रीरामपूर बंद ही कल्पना मुळातच चुकीची आहे. एवढीच काळजी असेल तर पालिकेने शहरात कोविड सेंटर उघडावेत त्यात रुग्णांवर काळजी घेवून उपचार केले तर रुग्ण संख्या वाढणार नाही, असे नगरसेविका भारती कांबळे यांनी सांगितले.

बंद अगोदर गोरगरिबांच्या पोटाचे बघा

या बंदच्या मागणीसाठी इथे असलेले सर्वजण सधन आहेत. मात्र जे हातावर पोट भरत असतात तसेच जे छोटे व्यावसायिक आहे यांचे मत कोण घेणार? या गोरगरिबांचा कुणी विचार केला का? आज कमवणे व संध्याकाळी खाणे अशा लोकांचे विचार कोण करणार? मागील काळात अनेक दात्यांकडून मदत मिळाली. आता जो बंद ठेवणार आहोत त्यात त्यांची व्यवस्था केली का? असा प्रश्न अहमदभाई जहागिरदार यांनी केला.

बंद हा कडकडीतच असावा अन्यथा..

श्रीरामपूर बंद हा कडकडीतच झाला पाहिजे. कोणतेही दुकान उघडे राहाता कामा नये. रस्त्यावर एकही माणूस दिसता कामा नये. कोणाचेही दुकान उघडे दिसल्यास दुसर्‍या दिवसापासून दुकान उघडण्याचे आवाहन करुन बंदमधून बाहेर पडू असा इशारा दिला. त्यामुळे शहरातील कोणत्याही अत्यावश्यक सेवांना परवानगी देवू नये किंवा कोणत्याही प्रकारचे पास दिले जावू नये, असा इशारा अशोक उपाध्ये यांनी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या