Friday, April 26, 2024
Homeनगरगणपती विक्रीचे स्टॉल मेनरोडवर लावण्यास पोलिसांचा विरोध

गणपती विक्रीचे स्टॉल मेनरोडवर लावण्यास पोलिसांचा विरोध

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणपती विक्रीचे स्टॉल लावण्यासंदर्भात पालिकेत झालेल्या बैठकीत काही स्टॉल मेनरोड, शिवाजी रोड व अन्य ठिकाणी असे सोशल डिस्टन्सचे पालन करून लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पोलीस प्रशासनाने मेनरोड, शिवाजीरोडवर गर्दी होईल म्हणून परवानगी नाकारल्याने आता गणपती विक्रीचे सर्व स्टॉल हे थत्ते मैदानावर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

यासंदर्भात काल पुन्हा नगरपालिकेत बैठक घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस नगराध्यक्षा अनुराधा आदिक, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, अशोक उपाध्ये, राजेंद्र सोनवणे, मुख्तार शहा, नगरसेवक रवी पाटील, दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण तसेच विशाल अंभोरे, सुनील सुखदरे, कुणाल करंडे, भगवान धनगे आदी उपस्थित होते.

जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत गणपती स्टॉलधारकांच्या जागेबाबतचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार त्याचदिवशी संध्याकाळी नगराध्यक्षांनी बैठक घेऊन मेनरोड, शिवाजीरोड व अन्य ठिकाणी असे सोशल डिस्टन्स ठेवून गणपती स्टॉलधारकांना गाळे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मेनरोडवर स्टॉल लावले तर गर्दी होऊन सोशल डिस्टन्स पाळला जाणार नाही त्यामुळे सर्व स्टॉल हे थत्ते मैदानावरच लावण्यात यावे अशी सूचना मांडली. मेनरोडवर स्टॉल लावणे खूपच धोकादायक ठरू शकते. याबाबत कोणी जबाबदारी घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला असता सर्वांनी थत्ते मैदानावर स्टॉल लावण्याबाबत एकमत झाले.

गणपती विक्री करणार्‍या व्यावसायिकांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये म्हणून पालिकेने बैठक घेऊन मेनरोड, शिवाजीरोडवर स्टॉल लावण्याबाबतचा तोडगा काढून निर्णय घेण्यात आला होता. मात्र गर्दी झाल्यास धोका निर्माण होऊ शकतो म्हणून पोलीस प्रशासनाने मेनरोडवर स्टॉल लावण्यास विरोध केला व पुन्हा बैठक घेऊन थत्ते मैदानावर स्टॉल लावण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी या काळात सोशल डिस्टन्स ठेवून तोंडाला मास्क लावून करोनापासून बचाव करावा व करोनाला हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करावा व काळजी घ्यावी.

– अनुराधा आदिक , नगराध्यक्षा, श्रीरामपूर नगरपालिका.

गणपती विक्री करणार्‍यांचे स्टॉल मेनरोडवर लावणे योग्य ठरणार नाही. स्टॉल लावले गेले तर गर्दी होऊन पुन्हा करोनाचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आम्ही मेनरोडवर स्टॉल लावण्यास नकार दिला. त्यामुळे गणपती विक्रीचे स्टॉल बरोबरच अन्य स्टॉलही लावले गेले तर गर्दी होण्याची जास्त भीती आहे. त्यामुळे कोणताही धोका पत्करण्याअगोदरच सर्व स्टॉल हे थत्ते मैदानावर लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

– श्रीहरी बहिरट , पोलीस निरीक्षक श्रीरामपूर

- Advertisment -

ताज्या बातम्या