Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीरामपूर आगाराची नाऊर-रामपूर बस अडकली महावितरणच्या तारेत

श्रीरामपूर आगाराची नाऊर-रामपूर बस अडकली महावितरणच्या तारेत

नाऊर |वार्ताहर| Naur

श्रीरामपूर आगारातून (Shrirampur Depo) सुटणार्‍या नाऊर-रामपूर बसला (Naur-Rampur Bus) नाऊर चौफुलीच्या पुढे विद्युत तारा (Electric Wire) अडकल्या. ही बाब चालकाच्या त्वरित लक्षात आल्याने त्याने तातडीने गाडी थांबून पाहिले असता विद्युत तारांचे (Electric Wire) घर्षण होऊन जाळ झाला होता. त्याने मागे बसलेल्या वाहकाला कल्पना दिली असता वाहक खाली उतरत असताना त्याला दरवाज्याचा शॉक (Shock) बसला. या बसमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी ये-जा करतात. सुदैवाने बसमध्ये एक प्रवासी वगळता कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

- Advertisement -

श्रीरामपूर-नाऊर-रामपूर ही बस (क्र. एमएच 07 सी 9258) दुपारी 1 वा. सुटून नाऊरला साधारणतः दुपारी 1.30 च्या आसपास आली. नाऊर चौफुली येथे प्रवाशी उतरून रामपूरकडे जात असताना थोड्याशा अंतरावर असलेल्या कृषी पंपाची विद्युत वाहिनीच्या तारा बसमध्ये अडकल्याने घर्षण होऊन जाळ झाला. वेळीच ही बाब बस चालकाच्या लक्षात आल्याने त्याने बसला जागेवरच थांबविले, चालकाने वाहकाला बसच्या वरील माल वाहतूक ब्रॅकेटला विजेच्या तारा चिकटल्या असल्याचे सांगून खाली उतरताना काळजी घेण्यास सांगितले. मात्र दरवाजा उघडत असताना वाहकाला विजेचा शॉक बसला. त्याचवेळी दरवाजा उघडल्याने काही दुर्घटना घडली नाही. चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबविल्याने विद्युत वाहिनीच्या पोलचे देखील नुकसान टळले.

या भागात अनेक ठिकाणी महावितरणच्या विद्युत वाहिनीच्या तारा खाली लोंबकळत असुन या तारांचा कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. उंदिरगाव-नाऊर रस्त्यालगत असलेले रस्ता डांबरीकरणाचे कामही विद्युत वाहिनीमुळे रेंगाळले आहे. ही विद्युत वाहिनीदेखील रस्त्याला अडचण निर्माण करणारी ठरली आहे. या भागातील खाली लोंबकळणार्‍या तारा वरती न घेतल्यास रामपूर जाणारी बस नाऊर येथूनच परत फिरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रश्नी महावितरणने लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत शेतकर्‍यांसह प्रवाशांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, महावितरणचे कर्मचारी सागर देसाई यांनी त्वरीत विद्युत पुरवठा खंडित करून बसला गुंतलेल्या तारा मोकळ्या करून दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या