Thursday, April 25, 2024
Homeनगरबसस्थानक परिसरात दोन तरुणांना बेदम मारहाण

बसस्थानक परिसरात दोन तरुणांना बेदम मारहाण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील बसस्थानक परिसरामध्ये दोन जणांना मारहाण करण्यात आली. त्यातील एकाची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला लोणी येथील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

तालुक्यातील दत्तनगर येथे राहणारे अंकुश कर्पे हे त्यांचा मेव्हणा सतिष धात्रक (रा. शिरसगाव ता. वैजापुर) हे दोघे जेवण करण्यासाठी शहरातील बस स्टॅण्ड समोरील लोकसेवा हॉटेल येथे आले होते. हॉटेलसमोर मोटारसायकल लावून बाथरुमसाठी पायी बस स्टॅण्ड मागील सार्वजनिक शौचालय येथे जात असतांना, शौचालयाच्या अलीकडे अंकुशच्या ओळखीचा कमलेश पवार याने अंकुशच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यास अंकुशने विरोध केला असता त्याने घाणघाण शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच तुम्ही येथेच थांबा, मी कोण आहे, तुम्हाला दाखवतो असे म्हणून त्याने फोन करुन काही मुलांना बोलावून घेतले. लगेचच अकुंश जेधे, गोरख जेधे, दिपक जाधव, कमलेश पवार व त्यांच्यासोबत 4 ते 5 अनोळखी इसम बसस्थानक परिसरामध्ये आले.

अंकुश जेधे याने त्याच्या हातातील लोखंडी पाईपने अंकुशच्या डोक्यावर मारुन दुखापत केली. गोरख जेधे याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने अंकुशच्या मेव्हुण्यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर मारुन गंभीर दुखापत केली. त्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होवू लागल्याने तो खाली पडला. तेव्हा अंकुशने आरडा-ओरड केला. दिपक बबन जाधव याने चाकू सारख्या हत्याराने अंकुशच्या हातावर वार केला व जखमी केले. त्याच्या सोबत असलेल्या इतरांनी लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने अंकुशला व मेव्हणा सतिश धात्रक यास मारहाण केली. तेथे गर्दी जमल्याने ते सर्व निघून गेले. त्यानंतर मित्र अविनाश गायकवाड याने जखमींना रिक्षामध्ये टाकून उपचारासाठी साखर कामगार हॉस्पीटल येथे दाखल केले.

तसेच अंकुशच्या मेव्हण्यास जास्त मार लागल्याने त्यास पुढील उपचारासाठी लोणी येथील हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकुंश जेधे, गोरख जेधे, दिपक जाधव, कमलेश पवार व त्यांच्यासोबत 4 ते 5 अनोळखी इसम यांच्याविरुध्द भा. दं. वि. कलम 307, 393, 324, 323, 343, 347, 348, 149, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या