श्रीरामपूर बाजार समितीमार्फत शेतमाल तारण कर्ज योजना सुरू – सभापती शिंदे

jalgaon-digital
1 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात शेतकर्‍यांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यवा, असे आवाहन सभापती संगीताताई सुनील शिंदे यांनी केले आहे.

श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांसाठी सोयाबीन, तूर, मूग, हरभरा, ज्वारी, बाजरी, मका, गहू व हळद या शेतमालावर शेतमाल तारण कर्ज योजने अंतर्गत कर्जपुरवठा सुरुवात करण्यात आला आहे. शेतकर्‍यांना आपल्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळण्यासाठी व तात्पुरती गरज भागविण्यासाठी शेतकर्‍यांनी वेअर हाउसमध्ये आपला शेतमाल ठेवून वखार पावतीवर त्यांना बाजार समितीकडून 180 दिवसांकरिता 6 टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सदर शेतमाल उत्पादक शेतकर्‍यांना कमी बाजारभावाने शेतमालाची विक्री करून त्यांना आर्थिक नुकसान होत असल्याने शेतमाल कर्ज योजना अल्प व्याजदरात शेतकर्‍यांना उपलब्ध असल्याने शेतकर्‍यांना बाजारभाव वाढल्यावर त्यांना सदरचा शेतमाल विक्री करणे सोईस्कर होणार आहे.श्रीरामपूर बाजार समिती सन 2012-13 पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित असल्याने याचा शेतकर्‍यांना भविष्यात वाढणार्‍या बाजारभावाचा लाभ मिळाला आहे.

तसेच सोयाबीनची शेतमाल तारण योजनेत ठेवताना सोयाबीनची आर्द्रता 12 टक्के पेक्षा कमी असावी व शेतमाल स्वच्छ चांगल्या प्रतीचा शेतमाल तारण कर्ज योजनेत ठेवून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीच्या सभापती संगीताताई शिंदे, उपसभापती नितीन भागडे, सचिव किशोर काळे यांनी केले.

Share This Article