श्रीक्षेत्र ताहाराबादला समाधी सोहळ्यात भाविकांची मांदियाळी

jalgaon-digital
3 Min Read

ताहाराबाद |वार्ताहर| Taharabad

श्री संतकवी महिपती महाराज यांचा 232 वा पुण्यतिथी समाधी सोहळा मोठ्या हर्षोल्हासात संपन्न होत आहे. महिपतींच्या नामघोषाने प्रतिपंढरीत भक्तीचे तरंग उठले आहेत. श्रावणाच्या पर्वणीत नयनरम्य सोहळ्याने भाविकांचे नेत्र सुखावले आहेत.

संत महिपतींच्या समाधी सोहळ्याचा आज 7 वा दिवस आहे. काल एकादशीनिमित्त सकाळच्या सत्रात श्रीराम महाराज झिंजुर्के, शेवगाव यांची कीर्तन सेवा झाली. तर रात्री संजय महाराज वेळुकर, सातारा यांनी समाधी सोहळ्यातील कीर्तन मालिकेचे 6 वे पुष्प गुंफले.

झिंजुर्के महाराजांनी संत महिपतींचा व एकादशीचा महिमा सांगून भाविकांना मंत्रमुग्ध केले. जैसा संग तैसा मानवाला रंग चढतो. दृष्टांत म्हणून भीष्माचार्यांचे उदाहरण दिले. कौरव संगतीने भीष्माचार्यांचा अंत झाला तर आपण कोण? म्हणून सहवास हा महत्त्वाचा आहे. आहार, विहार, आचार, विचार व उच्चार यावर मानवाची जडणघडण अवलंबून असते.आयुष्यभर दुर्योधनाने धनासाठी आस धरली. परंतु धनासाठी निधन झालं. संग चुकला की, बेरंग होतो. त्यासाठी नाम चिंतन करावे.

सदैव कंठात नाम पाहिजे, नामाशिवाय भगवंत प्राप्ती नाही. मरणापर्यंत भगवंताचे स्मरण करा. भक्तीचे डोळे, ज्ञानाचे पंख असेल तेव्हाच वैष्णवांच्या दारात भरारी माराल. रामायणात भक्ताने देवासाठी शिष्टाई केली, तर महाभारतात देवाने भक्तासाठी शिष्टाई केली. उभं आयुष्य जगताना नियमावली पाहिजे. परमार्थ शुद्ध अंत:करणाने करावा, तेव्हाच भगवंताची प्राप्ती होईल. त्यासाठी वारकरी संप्रदायाचा सहवास पाहिजे. साधक व्हायचे असेल तर एकांतात साधना करावी लागेल. साधनेची आराधना लोकांतात करा. हीच शिकवण महिपतींनी दिली, असे महाराजांनी सांगितले.

महिपतींचे संत चरित्र साक्षात पांडुरंगाने तपासले, ही केवढी मोठी लीला! संत महिपतींच्या समाधी सोहळ्यात ज्ञानदान व अन्नदानाने उच्चांक गाठला आहे. दैनंदिन मिष्ठान्नाच्या पंगतींनी मंदिर परिसर फुलून जात आहे. महिलांचा प्रतिसाद उस्फूर्त आहे. 7 ते 9 कीर्तन नंतर जेवण असा उपक्रम चालू आहे. भजन व भोजनाने ताहाराबाद क्षेत्राचा महिमा वाढत आहे. भाविकांची शक्तीप्रमाणे भक्ती ओसंडून वाहत आहे. भाग्यवंत भाविक त्याचा आनंद घेत आहेत.

संत महिपतींच्या समाधी सोहळ्यातून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडते. परिसरातील विविध जाती – धर्माचे भाविक तन-मन धनाने सहकार्य करतात. त्यामुळे आर्थिक भार हलका होतो. साधक झोपला की, समाज झोपतो. म्हणून साधू जागृत असला पाहिजे. संत महिपती भगवंताच्या नामस्मरणात सदैव मग्न आहे. प्रचिती म्हणून अखंड वीण्याची धून ऐकू येते. त्यांच्या कृपाशिर्वादाने पठार परिसराला सदैव सुख – शांती लाभते. म्हणून परिसरातील भाविक समाधी सोहळ्यात हिरीरीने सहभाग घेतात.

आज श्रावण वद्य द्वादशी, महिपतींचा व सेना महाराजांचा निर्वाण दिन! त्यानिमित्ताने सकाळच्या सत्रात महंत ज्ञानेश्वर माऊली कदम यांची कीर्तन सेवा पुण्यतिथीनिमित्त होईल तर रात्री धर्मभूषण एकनाथ महाराज सदगीर यांची कीर्तन सेवा होईल. दि.25 ऑगस्ट रोजी कदम माऊली यांचे काल्याचे कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होईल.

महिपतींच्या पुण्यतिथीनिमित्त ताहाराबाद पंचक्रोशीत घरोघरी पुरणपोळीचे जेवण बनवून महिपतींच्या मंदिरात आणले जाते. कीर्तन सेवा होऊन भाविक महाप्रसादाचा आनंद लुटतात. तब्बल 5 हजार भाविक पुरणपोळी मिष्ठान्नाचा आस्वाद घेतात!

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *