Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीगोंदा : 59 ग्रामपंचायतीसाठी 2 हजार 163 अर्ज दाखल

श्रीगोंदा : 59 ग्रामपंचायतीसाठी 2 हजार 163 अर्ज दाखल

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) –

तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होऊन ऑनलाइन अर्ज व दाखल करण्यासाठी 59 गावाच्या भावी कारभार्‍यांनी

- Advertisement -

श्रीगोंदा तहसील कार्यालयाजवळ यात्रेसारखी गर्दी केली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास दि. 23 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम दिनांक 30 डिसेंबरपर्यंत असल्याने एकूण 2 हजार 163 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले. तर तालुक्यातील ढोरजा व ढवळगाव ग्रामपंचायतच्या उमेदवारांनी प्रत्येक वार्डात एकच अर्ज भरल्याने या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील 59 ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी एकच गर्दी केली. त्यात ऑनलाइन प्रक्रिया ठप्प झाल्याने निवडणूक विभागाने ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची संधी देऊन दि. 30 रोजी अंतिम दुपारी 3 वाजेऐवजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत वाढविली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अर्ज नोंदणी चालू होती. राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे गाव असलेल्या वांगदारी गावात तब्बल 89 अर्ज दाखल झाले तर खालोखाल लिंपणगाव गावात 88 अर्ज दाखल झाले. तर ढवळगाव व ढोरजा गावांनी आदर्श घालून देत गावाची एकी दाखवत अनुक्रमे 9 व 11 अर्ज दाखल केले. प्रभागनिहाय 1 अर्ज दाखल झाल्याने या ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या आहेत. गुरुवारी (31 डिसेंबर) अर्जांची छाननी झाली. तर 4 जानेवारीला अर्ज मागे घेण्याचा दिनांक व उमेदवार यादी प्रसिद्ध होऊन उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. दि. 15 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत प्रत्यक्ष मतदान होणार आहे. मतमोजणी दि. 18 रोजी होऊन भावी कारभारी ठरणार आहेत.

3 दिवस आलेल्या सुट्यांमूळे शेवटच्या तीन दिवस राहिल्याने ऑनलाइन अर्ज भरताना इंटरनेट ठप्प पडून मेगा ब्लॉक झाला. त्यामुळे प्रशासनाला वेळ वाढवून ऑफलाईन अर्ज स्वीकारावे लागले. या कालावधीत भावी कारभार्‍यांची पॅनल जुळविताना दमछाक दिसून आली. रुसवे-फुगवे, भाऊबंधकी, एकमेकांचा काटा काढण्याच्या चर्चेने श्रीगोंदा शहराचे मनोरंजन झाले. महिला उमेदवारांची पोरं सांभाळतानाची कसरत, धावपळ दिसून आली. निवडणूक प्रशासनही गोंधळून गेले. त्यांना उमेदवारांना पाणी, बसण्यास जागा उपलब्ध करून देता आली नाही. काही उमेदवारांनी या निवडणुकीत एकमेकांची जीरवण्यासाठी चक्क जमिनी विकल्याची चर्चा चांगलीच श्रीगोंदा तालुक्यात रंगली.

- Advertisment -

ताज्या बातम्या