Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीसंतकवी महिपती महाराजांच्या 232 व्या समाधी सोहळ्यास उद्यापासून प्रारंभ

श्रीसंतकवी महिपती महाराजांच्या 232 व्या समाधी सोहळ्यास उद्यापासून प्रारंभ

ताहाराबाद |वार्ताहर| Taharabad

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रतिपंढरी श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे संतकवी महिपती महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त 232 वा समाधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व भक्तीविजय ग्रंथाचे पारायण होणार आहे. संतकवी महिपती महाराजांचा समाधी सोहळा श्रावण वद्य श्रीकृष्ण अष्टमी, गुरुवार दि.18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या पर्वणीत संपन्न होत आहे. यानिमित्ताने श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

- Advertisement -

आषाढ वद्य नवमी ते अमावस्येपर्यंत संतकवी महिपती महाराज पांडुरंगाच्या सेवेत मग्न होऊन श्रावण वद्य द्वादशीला (इ.स.1790) मध्ये गुरुवारी मध्यान्ही पांडुरंगाच्या चरणी अनंतात विलीन झाले. महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधी सोहळा होणार आहे.

पहाटे काकडा भजन, अभिषेक, सकाळी ग्रामप्रदक्षिणा, नंतर भक्तीविजय ग्रंथाचे पारायण, दुपारी 12 वा. आरती व नैवेद्य, दुपारी 4वा. संतचरित्र कथा, सायंकाळी हरिपाठ व शास्त्रशुद्ध पावली, रात्री 7 ते 9 वा. महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे कीर्तन तसेच रात्री जागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. महंत बाळकृष्ण महाराज कांबळे व महंत ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याची परंपरा अखंडपणे चालू आहे.

संत महिपतींच्या समाधी मंदिर प्रांगणात भव्य-दिव्य प्रहरा मंडपाचे, भटारखाण्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रहरा मंडपातील विद्युत रोषणाईचे आकर्षण, किर्तनात 200 टाळकरी, सुरुची भोजन, संतचरित्र कथेची श्रवणभक्ती, नामवंत किर्तनकारांचे कीर्तन ही या सोहळ्याची वैशिष्ट्ये ठरणार आहेत. दि.18ऑगस्ट रोजी गोकुळष्टमीला रात्री 10 वा. बाळकृष्ण महाराज कांबळे यांचे कीर्तन होणार आहे.

दि.19 ऑगस्ट रोजी रात्री 7 ते 9 सुनील महाराज झांबरे यांचे कीर्तन, दि.20 ऑगस्ट रोजी सुनील महाराज शिंदे यांचे कीर्तन, दि.21 ऑगस्ट रोजी दिनकर महाराज अंचवले यांचे कीर्तन, दि.22 ऑगस्ट रोजी श्रावण महाराज आहिरे यांचे कीर्तन, दि.23 ऑगस्ट रोजी एकादशीनिमित्त सकाळी 10 वा. श्रीराम महाराज झिंजुर्के व रात्री संजय महाराज वेळूकर यांचे कीर्तन, दि.24 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. पुण्यतिथीनिमित्त ज्ञानेश्वर माऊली कदम व रात्री एकनाथ महाराज सदगीर यांचे कीर्तन, दि.25 ऑगस्ट रोजी काल्याचे कीर्तन ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे होऊन महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.

श्रावण वद्य द्वादशीला 50 हजार पुरणपोळींचे आयोजन करण्यात आले आहे. शके 1738 च्या सुमारास सरदार मल्हारराव होळकर यांनी महिपतींच्या समाधी सोहळ्याला प्रारंभ केला. आनंदराव सटवाजी शेकदार यांनी महिपतींचे समाधी वृंदावन बांधले. श्रावण वद्य द्वादशीला श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे संतकवी महिपतींचे देहावसान व नांदूर खंदरमाळ येथील महिपतींचे शिष्य धोंडीभाऊ यांचे देहावसान एकाच वेळी झाले, हे विशेष!

- Advertisment -

ताज्या बातम्या