Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकलॉकडाऊनचे नियम पाळत श्री निवृत्तीनाथांच्या समाधीला चंदनाची उटी

लॉकडाऊनचे नियम पाळत श्री निवृत्तीनाथांच्या समाधीला चंदनाची उटी

नाशिक | प्रतिनिधी

करोना काळातील लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत हरिनामाच्या जयघोषात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वारकरी पंथाचे आद्य प्रवर्तक श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधी व गर्भगृहातील अन्य देवतांच्या मुर्तींना सुगंधी चंदनाची ऊटी लावण्यात आली. सालाबादप्रमाणे याही वर्षी हा उत्सव भाविकांविनाच पार पडला…

- Advertisement -

भुतलावरील सजीव सृष्टी प्रमाणे देवालाही वैशाखाचा दाह सुसह्य व्हावा या भक्तीभावनेतुन चैत्र वद्य एकादशीला श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी व मंदिराच्या गर्भगृहातील विठ्ठल, रुक्मीणी, आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या मुर्तीना चंदनाच्या उटीचे पारंपारीक पध्दतीने लेपन करण्यात येते. सुमारे दिडशे वर्षांपुर्वी एका वारकरी महिलेने ही परंपरा सुरू केली होती ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे.

या निमित्त दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात होते. सात दिवस शेकडो महिलांनी ओवी अभंग गात दगडाच्या सहाणीवर चंदन घासुन उटी तयार करतात. लहान मुले व पुरुष देखील या कार्यात सहभाग घेतात. एकादशी पर्यंत चारही देवतांना पुर्णपणे लेपन होईल एवढी चंदनाची उटी तयार होते.

या चंदन लेपात कापूर किसनी, वाळा, केशर, चंदन, अत्तर, गुलाब पाणी, कस्तुरी पावडर, जवादू या औषधी वनस्पतींचा समावेश केला जातो. यानिमित्तानं लाखो वारकरी नाथांच्या दर्शनासाठी येत असतात, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.

उटीच्या वारीनिमित्त हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ असे धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. मात्र, लॉकडाऊन आणि करोनाचा उद्रेक यामुळे धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

देवांना नवीन पोशाख करून साजशृंगार करण्यात आला असून नैवेद्य अर्पण करुन आरती करण्यात आली. रात्री ११ वाजता समाधीची विधिवत पुजा करुन देवतांना लावलेली उटी उतरविण्यात येईल व शासकीय निर्देशानुसार मंदिर उघडल्यानंतर भाविकांना प्रसादरूपी वाटण्यात येईल.

पूजक जयंत महाराज गोसावी, योगेश गोसावी, सचिदानंद गोसावी, प्रशासक कृष्णा सोनवणे, ऍड भाऊसाहेब गंभीरे यावेळी उपस्थित होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक भीमाशंकर ढोले आणि पोलीस निरीक्षक रणदिवे यांचेही सहकार्य लाभले.

- Advertisment -

ताज्या बातम्या