Sunday, May 5, 2024
Homeशब्दगंधश्रीकृष्ण भक्त मीराबाई

श्रीकृष्ण भक्त मीराबाई

भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची.

सुरेखा बोर्‍हाडे

श्री कृष्णाची परमभक्त असणार्‍या संत मीराबाईंनी सोळाव्या शतकात 1300 भजने, पदं लिहिली. मीराबाईंची भावभक्तीने परिपूर्ण आणि रसाळ अशी गीते जनमानसांच्या हृदयावर आजही विराजमान आहेत. मीराबाई राजपूत राजघराण्यातील राणी तर होत्या परंतु प्रसिद्ध संत कवयित्री म्हणून त्यांची ओळख आहे. लौकिक जगात वावरत असूनही त्यापलीकडच्या अलौकिक जगात संचार करणार्‍या मीराबाई होत्या.

- Advertisement -

वयाच्या सोळाव्या वर्षी पराक्रमी राणासांगा यांचा ज्येष्ठ पुत्र राजा भोज यांच्याबरोबर मीराबाईंचा विवाह झाला. परंतु रूढ अर्थाने मीराबाई कधीच वैवाहिक आणि पारंपरिक आयुष्यात रमल्या नाही. त्याकाळात कृष्णवरची त्यांची निस्सीम भक्ती त्यांच्या कुटुंबाला राजकुळाचाराच्या विरुद्ध वाटली. त्यांच्या मते राजघराण्याच्या अनेक प्रथांविरुद्ध त्या गेल्या आणि सामान्य लोकांमध्ये मिसळल्या म्हणून मीराबाईंवर अन्याय झाले. त्यांना कुटुंबातील रुढीपरंपरा यांचा सामना करावा लागला. एक स्त्री म्हणून मीराबाईंवर अनेक बंधने घातली गेली. हा त्यांचा संघर्ष भक्तिमार्गावरून चालताना तर होताच परंतु लौकिकातही त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. त्यासाठी त्यांचेे विचार, भक्तीच नव्हे तर प्रत्यक्ष त्यांना दडपवून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु ईश्वरभक्ती, निश्चय आणि करारीपणा या गुणांमुळे स्वतःचे अस्तित्व त्यांनी अबाधित राखले. स्री म्हणून कुटुंब-समाजात लादल्या गेलेल्या बंधनाविरुद्ध क्रांतीचे पाऊल मीराबाईंनी टाकले, असे म्हणावे लागेल. मुक्ती, कृती आणि भक्ती यांचा उत्तम संगम असलेले सगुण रूप म्हणजे संत मीराबाई!

मीराबाईंचा जन्म मेडताचे जहागीरदार रतनसिंह राठोड आणि त्यांची पत्नी वीर कुमारी यांच्या पोटी 1498 मध्ये झाला. मीराबाईंवर त्यांचे आजोबा राठोड राव दुदा यांचा बालपणापासून खूप प्रभाव होता. ते कृष्ण भक्त होते. घरामध्ये सर्वच वैष्णव भक्ती करत होते. त्यामुळे मीराबाईंवर कृष्ण भक्तीचे संस्कार घरातून झाले. कृष्णभक्तीत छोटी मीरा सुंदर भजन अगदी तालासुरात गायची. मिराचा आवाज मधूर होता. दिसायला त्या अतिशय सुंदर होत्या. छोटी पदे रचून त्या कृष्णासमोर म्हणत असत. श्रीकृष्णाला पती मानून जीवनभर एकनिष्ठ राहणार्‍या या अलौकिक भक्तीणीच्या बालपणाची कथा सर्वश्रूत आहे.

एक दिवस महालासमोरून नवरदेवाची वरात जात होती. त्या नवरदेवाला बघून छोट्या मीरेने उत्सुकतेने विचारले, माझा नवरदेव कोणता असेल? त्यावर आजी व आईने श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे बोट दाखवले. लहानग्या वयात मीराच्या मनात श्रीकृष्णावर भक्तीबरोबर प्रीती रुजू लागली. जसजशी मीरा मोठी होऊ लागली तशी त्यांची कान्हावर भक्ती दृढ होत गेली. श्रीकृष्णाशिवाय पती म्हणून त्या दुसर्‍या कुणाचाच विचार करू शकत नव्हत्या. परंतु जेव्हा त्यांचे लग्नाचे वय झाले तेव्हा जनरीतीनुसार मीराचे लग्न व्हावे असा आग्रह आजोबांनी धरल्यामुळे नाईलाजाने मीरा लग्नासाठी उभ्या राहिल्या. मेवाडचे राजा सांगा यांचा मोठा मुलगा भोजराजा यांच्याबरोबर मीराचा विवाह इसवी सन पंधराशे सोळामध्ये थाटामाटात झाला.

मीरा मेवाडमधील चित्तोडगडावर राणी म्हणून आल्या. परंतु मीरा भोज राजाबरोबर संसारात रमल्या नाही. मीराच्या माहेरी वैष्णव भक्ती केली जात होती. तर सासरी मेवाडला शैव पंथीय भक्ती म्हणजे शिवाची भक्ती केली जात असे. सासरी आल्यावर त्यांना शिवभक्ती आणि दुर्गापूजा करण्यासाठी आग्रह केला गेला. परंतु मीराबाई श्रीकृष्ण भक्तीतच लीन राहिल्या. त्यामुळे सासरचे मीरावर नाराज होते. पती भोज राजा यांनी मात्र मीराची श्रीकृष्णावरील निस्सीम भक्ती, निर्मळता, पवित्रता पाहून पत्नीसाठी श्रीकृष्णाचे मंदिर बांधून घेतले. 1521 मध्ये मुघल शासक बाबर आणि महाराणा सांगा यांच्यात खानवा येथे युद्ध झाले. या युद्धात महाराणा सांगा यांचा पराभव झाला. त्यांचा मुलगा भोजराज याचा मृत्यू झाला. पतीबरोबर मीराला सती जाण्यासाठी सांगण्यात आले. परंतु या गोष्टीला स्पष्ट नकार देत त्या म्हणाल्या, मी केवळ कृष्णालाच माझा पती मानते. त्या कृष्णभक्तीसाठी जिवंत राहिल्या.

मीरा रै रंग लाग्यो हरिको

और सब सा अटक परी।

गिरधर गास्या सती न होस्या

मारौ मन मोह्यो घन नामी ॥

त्याकाळी प्रखर अशा रुढी परंपरा विरुद्ध जाण्याचे धाडस मीराबाईंनी दाखवले.

पुढे मीराबाई श्रीकृष्ण भक्तीत पूर्णपणे बुडून गेल्या. संसाराचे मोहपाश तोडून त्या दिवस-रात्र मंदिरात कृष्णभक्तीत लीन होऊन गात असत. नाचत असत. मंदिरात भक्तांबरोबर, संतांबरोबर त्या उठत बसत असत. त्यांच्याबरोबर भजन, कीर्तन करत असत. त्यामुळे राजपरिवाराला वाटे मीरा आपल्या कुळाला बट्टा लावत आहेत. त्यांनीे जनरीत सोडली. याकारणाने सासरच्यांनी अनेक प्रकारे श्रीकृष्ण भक्तीपासून दूर करण्यासाठी प्रयत्न केले. अन्याय केले. प्रसंगी ते त्यांच्या जीवावर उठले. याविषयी अनेक कथा आहेत. जेठ विक्रमादित्याने मीराबाईला मारण्यासाठी विषाचा प्याला दिला. तो त्यांनी कृष्ण प्रसाद म्हणून प्यायला. त्या विषाने मीराला काही झाले नाही. फुले म्हणून विषारी सर्पाची पेटी दिली. परंतु सापाची पुष्पमाला झाली. त्यांच्या भक्तीत अडथळे आणले. या सर्वातून मीरा आपल्या अनन्यसाधारण भक्तीमुळे तरून गेल्या.

या सर्व प्रकारामुळे मीराबाई मेवाड सोडून माहेरी मेडत्याला आल्या. 1536 मध्ये जोधपूरच्या मालदेव राजा यांनी मीराबाईंचे काका विरमदेवाकडून मेडता जिंकून घेतला. या सर्व राजकीय घडामोडीत मीराबाई सर्वस्वाचा त्याग करून राजमहालातून बाहेर पडल्या. एक राजस्री म्हणून सासरी आणि मीराबाई वैभवात राहू शकत होत्या; परंतु लौकिक वैभव, आरामाची आसक्ती नव्हती, तर संसाराविषयी विरक्ती होती.

मध्ययुगीन काळात रुढी परंपरांचा पगडा समाज मनावर होता. चेहर्‍यावर हातभर घुंगट ओढून फिरणार्‍या स्त्रियांमधून फक्त मीराबाईंमध्येच एवढे धारिष्ट होते की त्या कृष्णभक्तीत लीन होऊन मंदिरात, रस्त्यावर भजन गात असत. नाचत असत.

पग घुंगरू बांध मीरा नाचे रे।

मै तो अपने नारायण की आपहिं हो गई दासी रे

लोग कहें मीरा भई बावरी,सासू कहे कूल नासी रे।

पग घुंगरू बांध मीरा नाची रे।

भक्तीबरोबरच ठाम विचार, ठाम निर्धारचे बळ मीराबाईंमध्ये होते. रुढीपरंपरा, अनिष्ट प्रथा, चालीरिती, बंदिस्तपणा या सर्व गोष्टींना विरोध करत मुक्तपणे साधना करत जनसामान्यांमध्ये जगणे त्याकाळात मीराबाईंसाठी अवघड होते. परंतु हे सर्व मीराबाईंनीे धारिष्ट्याने केले. राजस्थान, गुजरात येथील ठिकठिकाणीच्या मंदिरांत जाऊन त्यांनी सुरेल आवाजात भजने गायली. या मार्गात त्यांना संत रोहिदास, वल्लभ संप्रदायाचे विठ्ठलनाथ, संत तुलसीदास, संत जीव गोस्वामी अशा अनेक गुरूंचा, संतांचा सहवास लाभला, मार्गदर्शन लाभले. 1547 मध्ये द्वारका येथील मंदिरात भजन गातांना मीराबाईंची प्राणज्योत श्रीकृष्णाच्या मूर्तीमध्ये विलीन झाली.

मीराबाईंनी नरसीजी का मायरा, गीतगोविंद की टीका, राग गोविंद, मीराबाई की मल्हार, पदावली अशा अनेक रचना निर्मिल्या. मीराबाईंच्या पदांत अत्यंत भावोत्कटता आहे. या रचनांमध्ये विविध काव्यप्रकार आढळतात. अलंकारांचा वापर आहे. या रचनांमध्ये मीराबाईंची स्रीसुलभ आर्तता, भावोत्कटता, आध्यात्मिकता आणि यातील सखोल अनुभूतीची काव्यदृष्टी अधिक श्रेष्ठ आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या