Saturday, April 27, 2024
Homeनगरमंत्री विखेंमुळे जिल्हा बँकेने ‘गणेश’ला कर्ज नाकारले

मंत्री विखेंमुळे जिल्हा बँकेने ‘गणेश’ला कर्ज नाकारले

राहाता |प्रतिनिधी| Rahata

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सांगण्यावरूनच जिल्हा बँकेने श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याला कर्ज नाकारले आहे. त्यामुळे विखे पाटील यांच्या दहशतीला सहकार खात्याने बळी पडू नये आणि गणेश कारखान्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी विनंती श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना केली.

- Advertisement -

सहकार मंत्री वळसे पाटील यांची भेट घेऊन संचालक मंडळाने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याने गणेश कारखान्याच्या विरोधात जे गैरप्रकार सुरू केले आहे त्यांचा पाढा वाचला. यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, कारखान्याचे उपाध्यक्ष विजय दंडवते, डॉ. एकनाथ गोंदकर, संचालक बाबासाहेब डांगे, संपत हिंगे, गंगाधर डांगे, महेंद्र गोर्डे, नानासाहेब नळे, बाळासाहेब चोळके, विष्णुपंत शेळके, अनिल गाढवे, मधुकर सातव, अनिल टिळेकर, आलेश कापसे उपस्थित होते.

कारखान्याचे उपाध्यक्ष दंडवते म्हणाले, गणेशचे मार्गदर्शक बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे हे अत्यंत चांगल्या भावनेने पाठीशी उभे आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील गणेश सुरू करण्यासाठी पाठीशी राहू असा शब्द निवडणूक झाल्यावर दिला होता. मात्र तो शब्द फिरवत मार्गात काटे निर्माण करण्याचे काम सुरू आहे. श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज प्रकरणाला जिल्हा बँकेने मंजुरी दिली.

त्यानंतर पद्मश्री विखेे पाटील सहकारी साखर कारखान्याने बँकेला पत्र देऊन गणेशला कर्ज देऊ नये असे सांगितले. गणेश कारखान्याकडून अव्वाच्या सव्वा रकमेची मागणी केली. नुकतेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याने गणेश कारखान्याला पत्र देऊन पन्नास कोटी रुपये घेणे असल्याचे कळविले. हे सर्व आकडे खोटे असून गणेश कारखान्याला कर्ज मिळू नये यासाठी चाललेला हा आटापिटा आहे, असा आरोप दंडवते यांनी केला.

डॉ. गोंदकर म्हणाले, गणेश कारखाना सुरू व्हावा ही सभासदांची इच्छा आहे. गणेश च्या निवडणुकीत आम्ही विखे पाटील यांच्या दहशतीचे झाकण उडवले. अजूनही ते गणेशच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहे. आज जिल्हा बँक राजकारणाचा भाग झाली आहे. एका बाजूने गणेश कारखान्याला कर्ज मंजूर करायचे आणि दुसरीकडून अटींचा खोडा घालायचा आणि गणेशला कर्ज द्यायचे नाही, असा स्पष्ट हेतू बँकेचा दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या