श्री गजानन विजय ग्रंथ

jalgaon-digital
12 Min Read

मागील अध्यायात आपण देशमुख व पाटलातील दुफळी पाहिली.ती दुफळी मुक्कामाला येऊन बसल्याचं आपण पाहिलं. जिथं जिथं म्हणून ही दुफळी असते तिथं तिथं ती सगळ्या सुखांची होळी करून टाकते. क्षयरोग शरीराला जसा ग्रासून टाकतो, तसा दुफळी रोग समाजाला ग्रासून टाकतो.

सौ. वर्षा भानप

एकदा असे घडले की, खंडू पाटलासमोर देशमुखांचा एक नोकर उलटून बोलू लागला. पाटील हा गावातील अधिकारी माणूस, देशमुखांच्या पाठिंब्यावर मर्‍या महार हा नोकर खंडू पाटलांना उणे उत्तर देऊ लागला. त्यावर खंडू म्हणाले, ही तुझी काही बोलायची रीत बरोबर नाही. गरिबानं आपली पायरी कधी सोडू नये. उणी उत्तरे बोलण्याचा अधिकार केवळ देशमुखाना आहे हे लक्षात घे. मर्‍या महार ऐकेना. उलट खंडूची आणखीच चेष्टा करु लागला त्यामुळे खंडू पाटील रागावले. बाचाबाचीचे कारण अगदी क्षुल्लक होते. पाटलांना काही कागदपत्र ठाण्यात पोहोचवायचे होते, ते काम करण्यासाठी पाटील त्याला सांगत होते की, तू असाच अकोल्याला जा आणि तहशिलीत हे टपाल पोहोचून ये. तो म्हणाला, मी तुमचं टपाल नेणार नाही. तुम्ही कायम देशमुखांच्या माणसालाच आपली कामे सांगत असता.

तुमची काम करायला मी काही बांधील नाही. तुमच्या हुकमाला मी शिमग्याच्या बोंबा समजतो. असं म्हणून त्यानं तोंडावर हात ठेवून काही हावभाव सुद्धा विपरीत केले व मारण्यासारखा अविर्भाव केला. ते पाहून चिडलेल्या खंडू पाटलाने हातातल्या भरीव वेळूच्या काठीने त्याच्या हातावर प्रहार केला. त्यामुळे जोराचा मार लागून गड्याचा हात मोडला व तो बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला त्या गड्याच्या नातेवाईकांनी त्याला उचलून देशमुखांच्या घरी घेऊन गेले. त्याचा हात मोडलेला पाहून देशमुखांना आनंद झाला व म्हणाले की, वा ! छान गोष्ट झाली. आपल्याला बदला घेण्याची पर्वणी चालून आली ही संधी सोडायला नको.

गड्याला तात्काळ कचेरीत नेऊन तिथल्या अधिकार्‍याला खोटं नाटं काहीतरी सांगून त्याचे कान भरले. अधिकार्‍याने त्या गड्याची तक्रार आपल्या रजिस्टरमध्ये नोंदवून घेतली. पाटलांना पकडून आणायचा हुकूम केला. त्याबरोबर शेगावात सगळीकडे उद्या पाटलांना बेड्या पडणार या एकाच विषयाची चर्चा सुरू झाली. खंडूलाही ते समजलं व त्यामुळे त्याचे धाबे दणाणून गेले. ते घाबरून अत्यंत चिंतातुर झाले. मनात म्हणायला लागले, ज्या शेगांवात मी आजवर वाघासारखा वावरत होतो त्याच्यावरच देवा हा दुर्धर प्रसंग आणला. इज्जतदार मनुष्याला आपला अपमान मरणाहून भयंकर वाटतो.

खंडू पाटील हताश झाला. एवढ्यात त्यांना गजानन महाराजांना साकडं घालायचा विचार आला. गजानन महाराजांशिवाय या संकटाचे निरसन करणारा आता या वर्‍हाडात कुणीही नाही. खंडू पाटील रात्री समर्थांकडे आले. आल्याआल्या त्यांनी समर्थांच्या चरणी डोके ठेवून म्हणाले की,महाराज माझ्यावर फार कठीण प्रसंग आला आहे. सरकारी कामासाठी, मी हातातल्या काठीने एका गड्याला वेळूच्या काठीने मारलं हे खरं आहे पण त्यामुळं देशमुख मंडळींना माझा काटा काढायची संधीच मिळाली आहे. ते आता ह्या निमित्ताने माझे वाटोळे करतील हे निश्चितच आहे.

आता त्याची परिणती म्हणून उद्या मला कैद व्हायची वेळ आली आहे महाराज ! आता तुमच्याशिवाय मला कोण वाचवेल? उद्या सरकारी अधिकारी येतील व माझ्या पायात बेडी ठोकून ते मला येथून घेऊन जातील. त्यापेक्षा गुरुराया ही घ्या माझी तलवार व माझा गळा कापून टाका कारण आता माझ्या अब्रूचे धिंडवडे निघणार आहेत. अब्रुदार माणसाला माणसाची बेइज्जती हेच मरण आहे देवा ! माझा अपराध तो किती ? पण त्या खड्याएव्हढ्या अपराधाचा आज डोंगर झाला .

तेव्हा समर्था माझी अब्रू वाचवा हो असं म्हणून पाटील रडू लागला. खंडू पाटील रडतोय हे बघितल्यावर त्याचं सांत्वन करण्यासाठी समर्थांनी दोन्ही हातांनी त्याला कवटाळलं. त्याला आपल्या मिठीत घेऊन हृदयाशी धरून ते म्हणाले, अरे ! जो काम करतो ना, त्याच्यावर अशी संकटं नेहमी येतातच तेव्हा तू काहीही काळजी करू नकोस. स्वार्थदृष्टी बळावली की हे असंच होतं. अरे हे तत्व आहे. जा, भिऊ नकोस. देशमुखाने कितीही जरी जोर लावला तरी तुला उद्या बेड्या पडणार नाहीत. तेच खरे झाले. पाटील निर्दोष सुटले. संतांनी जे वदले ते कधी असत्य होईल का? सर्व पाटील मंडळी महाराजांची दिवसेंदिवस जास्तच सेवा करू लागली. खंडू पाटलांनी प्रेमाने विनंती करून त्यांना आपल्या घरी रहायला नेले.

गावाच्या जवळच उत्तरेला एक मळा होता. लिंबाच्या झाडांच्या थंडगार सावलीत एक शंकराचे देऊळ होते. हा कृष्णाजी पाटलाच्या मालकीचा मळा होता. कृष्णाजी हा खंडूचा सगळ्यात धाकटा भाऊ होता. एके दिवशी महाराज मळ्यात येऊन शंकराच्या देवळाजवळच्या लिंबाच्या झाडाच्या सावलीत कट्ट्यावर येऊन बसले. ते कृष्णाजीला म्हणाले, मी काही दिवस तुझ्या मळ्यात या शंकराजवळ राहातो. भोलानाथ सर्व देवांचा राजराजेश्वर आहे. तो तुझ्या मळ्यांत रमलाय म्हणून मीही विचार केला की येथे राहू. इथं मला सावली करून दे. हे वाक्य ऐकल्यावर कृष्णाजीने लगेच सहा पत्रे आणून ओट्यावर छप्पर करून दिले. समर्थांनी तेथे राहायला सुरुवात केली तेव्हा मळ्याला राजक्षेत्राचं स्वरूप आलं.

जिथं राजा राहतो तिथे आपोआपच राजधानी होते. महाराजांचे बरोबर भास्कर पाटील व तुकाराम कोकाटे हे दोघे निरंतर सेवा करायला राहिले होते. महाराज मळ्यात असताना एक विचित्र गोष्ट घडली. त्याठिकाणी दहा वीस गोसावी आले. समर्थांचा बोलबाला त्यांनी अगोदरच ऐकलेला असल्याने तेही मळ्यात येऊन राहिले. गोसावी कृष्णा पाटलांना म्हणाले , आम्ही तिर्थवासी असून भागीरथीला घेऊन रामेश्वरला निघालो आहोत. गंगोत्री,जम्नोत्री, केदारनाथ, हिंगलाज, गिरनार इत्यादी अनेक क्षेत्रे पायी फिरून पहिली आहेत.

ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहोत. आमचे महाराजही आमच्याबरोबर आहेत. ते फार मोठे साधू असून श्रीहरिसुद्धा त्यांचा गुलाम आहे. तुझ्या पूर्वपुण्याईने ही मूर्ती तुझ्या घरी आली आहे तेव्हा आम्हाला शिरापुरीचें जेवण व लागेल तेवढा गांजा दे. आम्ही तीन दिवस राहून चौथ्या दिवशी येथून जाणार आहोत. तेव्हा आनंदानं ही पर्वणी साधून घे. एवढं सांगून सुद्धा कृष्णा पाटील यांना ते गोसावी साशंक वाटले. ते गोसावी म्हणाले, तू त्या वेड्या, पिशा ,नंग्याला मळ्यात पोसलास मात्र आम्हाला काही देण्यास मागे पुढे पाहत आहेस ? तू गाढवाला पोसतोस आणि गायीला लाथा मारतोस ही काय बरे आहे याचा तूच विचार कर म्हणजे तुला कळेल. अरे आम्ही गोसावी आहोत. सर्व वेदांत आमच्या मुखोद्गत आहेत. तुला जर हे पाहायचं असेल तर ते ऐकायला मळ्यांत ये म्हणजे तुला कळेल.

ते गोसाव्याना म्हणाले, उद्यां घालीन शिरापुरीचं जेवण. आज भाकरी आहेत त्याच घेऊन जा आणि गांजाचं म्हणाल तर मळ्यात चालता बोलता कंठनीळ बसला आहे तेव्हा तुम्हाला हवा तेवढा गांजा तेथे मिळेल. गोसाव्यांना सपाटून भूक लागली होती. त्यामुळे त्यांनी पदरात पडलेल्या चुन भाकरी ताब्यात घेतल्या आणि मळ्यात येऊन विहिरीच्या काठावर जेवायला बसले. जेवणे झाल्यावर समर्थांच्या समोरच एका छपरात गोसावी आपापली कडासने लावून बसले. त्यांचा ब्रह्मगिरी नावाचा महंत सायंकाळी भगवद् गीता वाचू लागला. सर्व गोसावी ऐकत बसले होते. गांवातूनही काही लोक पोथी ऐकायला आले होते. नैनं छिन्दन्ति हा श्लोक निरुपणासाठी घेतला होता. पण ब्रह्मगिरीला कोणताही स्वानुभव नसल्याने तो दांभिकपणे सगळं सांगत होता. गावकर्‍यांनी त्याचे निरूपण ऐकलं पण त्यांना ते अजिबात आवडलं नाही.ते म्हणाले, हा नुसता शब्दच्छल करत बसला आहे . श्री गजानन महाराज सुद्धा गोसाव्याचं प्रवचन ऐकत समोरच बसले होते. प्रवचन संपल्यावर सर्वजण त्यांचं दर्शन घ्यावं म्हणून पत्र्याच्या छपरात येऊन बसले. लोक आपसात म्हणत होते कि , तिथं निरूपण झालं खरं पण स्वानुभवाचा पुरुष हा येथे छपरात बसलाय. गोसावी समोरच बसलेला असल्याने त्याला लोक काय बोलतात ते ऐकायला जातच होते. लोकांचं बोलणं ऐकल्यावर त्याला त्यांचा काही रागही आला.

सर्व गोसावी गांजा प्यायला पत्र्याच्या छपरात येऊन बसले. गांजाची चिलीम सुरू झाली. इकडे श्रीमहाराज पलंगावर बसले होते आणि भास्कर त्यांना चिलीम भरून प्यायला देत होते. तेवढ्यात अचानकपणे त्या चिलिमीच्या विस्तवाची ठिणगी पलंगावर पडली पण हे कुणाच्या लक्षातही आलं नाही. काही वेळाने पलंग पेटून त्यातून धूर निघू लागला. हळूहळू आग चहूकडे पसरली आणि सगळीकडून आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. तो प्रकार पाहून भास्कर म्हणाले , सद्गुरुनाथा, लवकर पलंगावरून खाली उत्तरा. पलंगाची लाकडे सागाची असल्यानं ती पाणी टाकल्याशिवाय विझणार नाही. त्यावर महाराज म्हणाले,भास्करा, पाणी आणून आग अजिबात विझवू नको. असं म्हणून ते ब्रह्मगिरी गोसाव्याला म्हणाले , अहो महाराज ब्रह्मगिरी या आणि पलंगावर बसा. तुम्हाला भगवद् गीता सर्वतोपरी अवगत आहेच. आता त्याच्या परीक्षेची वेळ ईश्वराने तात्काळ आणली. हे ऐकून ब्रह्मगिरी घाबरला आणि जळत्या पलंगावर बसायला मनाई करू लागला.

महाराज म्हणाले , ब्रह्मा न जाळी अनळ याचं प्रत्यंतर दाखवा नैनं छिन्दन्ति श्लोकावर एक प्रहरभर व्याख्यान केलंत आता का घाबरलास ?असं म्हणून ते भास्करांना म्हणाले, जा लवकर व ब्रह्मगिरींना हाताला धरून आदरानं येथे घेऊन ये. महाराजांची आज्ञा ऐकताच भास्कर धावले आणि ब्रह्मगिरीचा उजवा हात त्यांनी धरला. भास्कर मुळातच धिप्पाड आणि सशक्त होते. त्यामुळं गोसावी त्यांच्यापुढं लटपटू लागला. इकडे पलंग चौफेर बाजूनी पेटला. ज्वाळा निघू लागल्या महाराज जराही न हालता पलंगावर स्थिर बसले होते. भागवत पुराणामध्ये श्री व्यासांनी सांगितले आहे कि कयाधूसुत श्रीप्रल्हादाला अग्नीत उभा केला होता. त्याचंच प्रत्यंतर कृष्णाजीच्या मळ्यात श्रीगजानन महाराजांनी दाखवलं.

ब्रह्मगिरी भास्करांना विनवीत होता व म्हणत होता की, मला पलंगापाशी घेऊन जाऊ नका. महाराजांचा अधिकार मी ओळखला नव्हता. पण भास्करांनी त्याचं मुळीच ऐकलं नाही. त्याला त्यांनी फरफर ओढत आणून श्रींच्या समोर उभा केला. अहो महाराज, नैनं दहति पावक, हे खरे करुन दाखवा. असं समर्थांनी म्हटल्याबरोबर गोसावी घाबरला व तो भीत भीत म्हणाला , अहो मी पोटभर्‍या संत आहे . शिरापुरी खाण्यासाठी मी गोसावी झालो. शांतीधामा , माझ्या अपराधाची क्षमा करा. गीताशास्त्र शिकवण्याचा उगीचच खटाटोप करत होतो. तुम्हाला वेडा म्हणालो , त्याचा आता पश्चाताप होतो. मी तुम्हाला दाती तृण धरून शरण आलोय. तेव्हा मला अभय द्या.

शेगांवचे लोक हा सर्व प्रकार पहात होतेच. त्यांनी समर्थांना विनवणी केली. आपणाला अग्नीपासून भय नाही हे खरं असलं , तरी महाराज आमच्याकरीता खाली उतरा. तुम्हाला अशा स्थितीत पाहून आम्हांला धडकी भरते. म्हणून ज्ञानजेठी आमच्यासाठी खाली उतरा. गोसावी आधीच खजील झाला होता. तो काहीच बोलला नाही. लोकांच्या विनंतीला मान देऊन गजानन महाराज खाली उतरले. त्याबरोबर पलंग कोसळून पडला. तो जवळजवळ सगळा जळालेलाच होता. जो थोडासा भाग उरला होता तो लोकांनी विझवला आणि घडलेल्या प्रसंगाची साक्ष म्हणून ठेऊन दिला.

निराभिमानी झालेल्या ब्रह्मगिरीने महाराजांचे चरण पकडले. मध्यरात्री ब्रह्मगिरीला महाराजांनी बोध केला. म्हणाले, आजपासून तू या चेष्टेला सोडून दे. ज्यांनी राख लावलेली आहे त्यानं इतर आवरणं दूर ठेवावीत. स्वतः अनुभव घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट इतरांना सांगू नये. जगात नुसत्या शब्दपांडित्यानं थैमान घातलं व त्यानंच आपल्या संस्कृतीचा संपूर्ण घात झाला. गोसावी मच्छिंद्र जालंदर, गोरख, ज्ञानेश्वर यांचा अधिकार किती म्हणून सांगू? श्रीशंकराचार्य स्वानुभवाचा पहाड होते तर प्रपंचात राहून ब्रह्मस्थिति एकनाथांनी अनुभविली. ब्रह्मचारी स्वामी समर्थही ब्रह्मसाक्षात्कारी होऊन गेले. या सर्वांची चरित्रे मनात आण आणि उगीच शिरापुरी खाण्यासाठी भूमीवर भटकत फिरू नकोस. त्यापासून तुला काहीच मिळणार नाही. असा बोध ऐकून ब्रह्मगिरी विरक्त झाला आणि पहाटेच कुणालाही न भेटता शिष्यांसह निघून गेला.

येथे श्री संत कवी दासगणू विरचित गजानन विजय ग्रंथाचा हा आठवा अध्याय समाप्त होत असून ह्या अध्यायाच्या सामर्थ्याने भाविकांना संसाररूपी समुद्रातून तारून नेवो अशी इच्छा व्यक्त करून संत श्री दासगणु महाराज आठवा अध्याय सुफळ संपूर्ण करतात.

मो. 9420747573

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *