ग्रामीण भागातही रेमडेसीव्हरसाठी नातलगांची धावपळ

jalgaon-digital
3 Min Read

दिंडोरी | संदीप गुंजाळ

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे करोना बाधित रुग्णांनी सरकारी दवाखाने तुडुंब भरून चालल्याने शासनाने काही खाजगी दवाखान्यांना शासनमान्यता देवून कोव्हिड रूग्णांवर उपचार सुरू केले.

खाजगी रूग्णालयांना शासन मान्यता नाव दिले, परंतु त्यांना आवश्यक रेमडेसिवरच्या औषधांचा पुरवठा मात्र न केल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना ते उपलब्ध करून घेण्यासाठी मोठी तारांबळ होत असून शासन मान्यता बोर्ड लावून बसलेले दवाखान्याचे संचालक मात्र रुग्णांच्या नातेवाइकांनाच रेमडिसीवरची उपलब्धता करून घेण्याचा सल्ला देत असल्याचे अजब चित्र समोर दिसत आहे.

जर नातेवाईकांनाच औषधांचा पुरवठा करून घ्यायचे असल्यास शासन मान्यता म्हणून बोर्ड लावलेले हे दवाखाने कशासाठी? असा सवाल रुग्णांचे नातेवाईक विचारु पाहत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून अवघ्या जिल्ह्यात करोनाने कहर माजवला आहे. सर्व रुग्णालये तुडुंब भरतांना दिसत असून रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी तारांबळ उडत आहे.

या पार्श्वभूमीवर सरकारी दवाखान्यांवर जास्त भार येत असल्याने काही खाजगी रुग्णालयांना शासन मान्य कोव्हिड केअर सेंटर म्हणून मान्यता देण्यात आली. परंतु यात फक्त शासनाला कागदोपत्री दिलासा मिळाला असला तरीही रूग्णांची मात्र सर्रासपणे लुट सुरू आहे.

शासनमान्य असल्याने इथं आवश्यक सर्व औषधांची उपलब्धता असेल म्हणून रूग्णांना दाखल केले जाते, परंतु रेमडिसीवरसाठी नातेवाईकांना कामाला लावले जाते. तसेच तुमच्याकडून होत नसेल तर तुमच्या रूग्णाला घेवून जा असा सल्लाही खाजगी पण शासनमान्य कोव्हिड केअर सेंटर दवाखान्यातील डॉक्टर देत आहेत.

एरव्ही रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा म्हणणारे डॉक्टर अशी वागणूक रूग्णांच्या नातेवाईकांना देत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. रूग्णसेवेपेक्षा सदर रूग्णांच्या नावाखाली मेवा खायचे काम चालू आहे. अवघ्या राज्यात करोनाला थोपवण्यासाठी अडचण येत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असतानाच खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांची रूग्ण नातेवाईकांसोबतची वागणूक अतिशय निंदनीय बघावयास मिळत आहे.

फक्त शासनमान्य देवून मोकळे होण्यापेक्षा ते रूग्णालय आवश्यक त्या सेवा योग्य पद्धतीने पुरवते की नाही तसेच रूग्णांची सेवा चालू की लुट याचीही संबंधित अधिकारी यांनी चौकशी करणे आवश्यक आहे. आणि अशा उद्धट वागणूक देणाऱ्यांना शासकीय हिसका दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या महामारीत शासनमान्य म्हणून घेणाऱ्या खाजगी दवाखान्यांत रेमडिसीवरची जबाबदारी नातेवाईकांवर देणे, रेमडेसिवर अभावी रूग्णाचे बरे वाईट झाल्यास हॉस्पिटल जबाबदार नसल्याबाबत नातेवाईकांकडून लिहून घेणे व त्याचबरोबर उद्धट वागणूक मिळत असून याला कोणी वाली आहे की नाही.? विधानसभा अध्यक्ष नामदार झिरवाळांनी यावर ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.

– शैलाताई उफाडे, नगरसेविका, दिंडोरी

रेमडेसीवरचा आज तुटवडा आहेच परंतु त्याची जबाबदारी रूग्ण नातेवाईकांना देणे हे अनुचित आहे. संबंधित दवाखान्याने याची तजवीज करावी. कोणत्याही दवाखान्यातील डॉक्टरांकडून उद्धट वागणूक कींवा चुकीचे वर्तन घडले असल्यास संबंधितांनी थेट माझ्याशी संपर्क साधत लेखी तक्रार करावी. संबंधितावर आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

– डॉ.विलास पाटील, अधिक्षक दिंडोरी ग्रामीण रुग्णालय

Share This Article