Thursday, April 25, 2024
Homeनगरसंगमनेरातील करोना सेंटरमध्ये बेडच्या टंचाईमुळे रुग्णांच्या नातेवाईकांची पळापळ

संगमनेरातील करोना सेंटरमध्ये बेडच्या टंचाईमुळे रुग्णांच्या नातेवाईकांची पळापळ

संगमनेर (शहर प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यात करोनोचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. करोना बाधितांची संख्या दररोज वाढत असताना संगमनेरमध्ये बेडची टंचाई भासत आहे. रूग्णांसाठी बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची पळापळ होताना दिसत आहे. यामुळे त्यांच्याकडून संताप व्यक्त होत आहे. संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून करोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागातही करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहे. हे रुग्ण उपचारासाठी संगमनेरातील कोविड सेंटर मध्ये येत आहेत. या रुग्णासोबतच तालुक्याच्या बाहेरीलही रुग्ण मोठ्या संख्येने संगमनेर शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहे. यामुळे शहरातील रुग्णालयावर मोठा भार पडत आहे.

- Advertisement -

गेल्या तीन दिवसापासून शहरातील करोना सेंटर मध्ये बेडच उपलब्ध नसल्याने उपचार घ्यायचे कुठे असा प्रश्‍न रुग्णांचे नातेवाईक समोर निर्माण झाला आहे. संगमनेर तालुक्यात एकूण 28 कोविड सेंटर निर्माण करण्यात आले आहे. या सेंटर मध्ये एकूण बेडची संख्या 879 आहे. यामध्ये 138 ऑक्सिजन बेड तर 38 व्हेंटिलेटर बेड आहेत. 28 सेंटर शिवाय इतर ठिकाणीही नवीन सेंटर तयार करण्यात येत आहे. संगमनेर शहरातील रुग्णालय हाउसफुल झाल्याने एकाही रूग्णालयात बेड शिल्लक राहिलेला नाही. संगमनेर तालुक्यातील रुग्णांना प्राधान्य द्यावे अशी सूचना प्रांताधिकार्‍यांनी एका बैठकीत केली होती. मात्र एकाही रुग्णालयात ही सूचना पाळले जात नसल्याचे दिसत आहे. प्रशासनाला अशी सूचना देता येत नाही असे तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले.

संगमनेर तालुक्यातील रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल असे तहसीलदार निकम यांनी सांगितले.

संगमनेर तालुक्यासाठी थेट विशाखापट्टनमहुन ऑक्सिजनचे दोन टँकर बोलाविण्यात आले आहे. यामुळे ऑक्सिजनचा प्रश्‍न सुटणार आहे मात्र रुग्णालयात बेड येत नसल्याने रुग्णांना ठेवायचे कुठे व त्यांना ऑक्सिजन लावायचा कसा असा? संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाईकांना मधून विचारला जात आहे. प्रशासनाने याबाबत त्वरीत पावले उचलावीत व रुग्णांची गैरसोय दूर करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या