Wednesday, April 24, 2024
Homeजळगावजिल्ह्यात आजपासून दोन दिवस सकाळी 7 ते 12 पर्यंत दुकाने खुली राहणार...

जिल्ह्यात आजपासून दोन दिवस सकाळी 7 ते 12 पर्यंत दुकाने खुली राहणार !

जळगाव – Jalgaon :

रमजान ईद व अक्षय्यतृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना खरेदीसाठी वेळ मिळावा म्हणून दि.12 ते 14 मेदरम्यान सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत कोविड नियमांचे पालन करून किराणा दुकान, ड्रायफ्रूटस्, भाजीपाला, फळे, अंडी, चिकन, मटन, बेकरी, दूध विक्री व आदी दुकाने खुली ठेवण्यास जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी एका आदेशाद्वारे रात्री उशिरा परवानगी दिली आहे.

- Advertisement -

मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात वरील सणांच्या अनुषंगाने सुमोटो याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींनी रमजान ईद व अक्षय्यतृतीयेनिमित्त शासनाने घातलेल्या निर्बंधामध्ये सूट मिळावी म्हणून जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली होती.

त्यानुसार दि.13 मे रोजी रमजान ईद व दि.14 मे रोजी अक्षय्यतृतीया असल्याने जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये न्यायालयाकडील दि.26 एप्रिल 2021 च्या निर्देशास आधिन राहून हा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार सदर सणांनिमित्त एकाचठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून नागरिकांनी आपापल्या प्रभागातील / वॉर्डातील दुकानांमधूनच शक्यतोवर खरेदी करावी, होम डिलिव्हरीसाठी प्राधान्य द्यावे, दुकानदारांनी एकावेळेस पाचपेक्षा जास्त ग्राहकांना परवानगी देऊ नये, सोशल डिस्टसिंगचे पालन करण्याच्या सूचना द्याव्यात, असे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

सकाळी 7 ते 12 दुकाने खुली ठेवण्याची परवानगी फक्त दि.14 मेपर्यंतच देण्यात आली असल्याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या