तेजस्वी शिवशाहिरी सुर्याचा अस्त- कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या गड-कोट- किल्ल्यांचा इतिहास जीवंतपणे जाणता राजाच्या माध्यमातून निर्माण करण्यात बाबासाहेब पुरंदरे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या निधनाने निष्ठावंत शिवशाहिरीचा सूर्य अस्ताला गेला, अशा शब्दांत माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समुहाच्यावतींने श्रध्दांजली वाहिली. सहकारमहर्षि कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे नाशिक येथे तत्कालीन खासदार स्व. वसंतराव पवार यांच्या निवासस्थानी आले असता माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी त्यांच्याशी इतिहासकाळातील मनमोकळ्या गप्पा करत त्याबाबतची माहिती घेतली. इतिहासकालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीची दुरुस्ती करण्यासाठी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समुहाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारबरोबरच पुरातत्व खात्याशी मोठा पाठपुरावा केला होता. इतिहास संशोधक ग. ह. खरे यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी तरुणपणापासून भारत इतिहास संशोधक मंडळाच्या अभ्यासाने मराठी मनाची मरगळ दूर केली.

इतिहास कालीन माहितीचे थेट संकलन करून कित्येक ग्रंथ निर्मिती केली. शिवकालीन इतिहास काय आहे, त्याकाळातील युध्दनिती, शस्त्र, गड कोट किल्ल्याबरोबरच सुरक्षा व्यवस्थापन, शिवशाहीतील स्मरणात राहणार्‍या व्यक्तीरेखा आणि त्यांची पात्रे आदींचा मूर्तीमंत, अभ्यासू नेतृत्वाचा अस्त झाला असेही ते म्हणाले. राजा शिवछत्रपती पुस्तकाच्या 16 आवृत्त्या त्यांनी प्रसिध्द केल्या होत्या.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *