Thursday, April 25, 2024
Homeजळगावशिवाजीनगर हुडकोत पाठलाग करुन दोन चोरट्यांना पकडले

शिवाजीनगर हुडकोत पाठलाग करुन दोन चोरट्यांना पकडले

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

शहरातील शिवाजीनगरात हुडकोत कुटुंबिय वरच्या खोलीत झोपलेले असतांना खालचे बंद घर चार चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी कडी कोयंडा व कुलूप तोडल्यानंतर कुटुंबियांना जाग आल्याने कुटुंबातील बाप लेकांनी चोरट्यांचा प्रयत्न हाणून पाडला व पाठलाग करुन दोन चोरट्यांना पकडले.

- Advertisement -

इतर दोन जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. किरण अनिल बाविस्कर व 16 वर्षीय अल्पवयी मुलगा दोन्ही रा. गेंदालाल मिल अशी पकडण्यात आलेल्या चोरट्यांची नावे असून त्यांना शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. 21 रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास हा थरार घडला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर हुडकोत मेहमूदखान चाँदखान पठाण वय 52 यांचे दुमजली घर असून ते कुटुंबासह वास्तव्यास आहेत. 21 रोजी रात्री 11.30 वाजेच्या जेवणानंतर सर्व कुटुंबिय सुमारास जिन्याचे दुसर्‍या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. तर नदीम हा गच्चीवर गेला. यादरम्यान चोरट्यांनी खालच्या घराचे कुलूप व कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

नदीम याला पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घराच्या खालच्या मजल्यावर आवाज आला. त्याने याबाबत वडील मेहमूद खान यांना कळविले. यानंतर मेहमूद खान हे मुलगा नईम यांच्यासोबत नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी खाली उतरत असतांना त्यांना जिन्यात दोन जण बसलेले दिसले. लाईट सुरु करताच इतर दोन जण पळाले. त्यांच्यासोबत पाठोपाठ घरात घुसलेले दोन जण पळतांना दिसले.

तुम्हाला सकाळी बघून घेवू पकडल्यावर चोरट्यांची धमकी

मेहमूद खान व मुलगा नईम यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. 100 मीटर अंतरावर पळतांना दोघे चोरटे खाली पडले. खाली पडताच खान व त्यांचा मुलगा नईम यांनी दोघांना पकडले. यावेळी चोरटे व खान यांच्यात झटापटही झाली. आम्हाला सोडा, नाही तर सकाळी जैनाबादचे मुले घेवून येवू आणि तुम्हाला बघून घेवू अशी धमकी पकडलेल्या चोरट्यांनी दिली.

दोघांना पकडून ठेवत खान यांनी शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. यानंतर रात्र गस्तीवरील पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठत दोघांन ताब्यात घेतले. चौकशी केली असता किरण अनिल बाविस्कर व सिध्दार्थ राजू तायडे अशी दोघांची नावे असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान खान यांनी घरात पाहणी केली असता, घराचा कुलूप व कोयंडा चोरट्यांनी तोडलेला होता. घरात पाहणी केली असता, कुठलाही ऐवज चोरीस गेले नसल्याचे दिसून आले. याप्रकरणी मेहमूद खान यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ हे करीत आहेत.

जामीनावर सुटताच चोरीचा प्रयत्न

संशयित हे शहर पोलिसांच्या रेकार्डवरील गुन्हेगार आहेत. यात शहर पोलीस ठाण्यात चोरीच्याय एका गुन्ह्यात काही दिवसांपूर्वी शहर पोलिसांनी किरण अनिल बाविस्कर यास अटक केली होती. त्या गुन्ह्यात त्यास जामीन मिळाल्यावर त्याने मध्यरात्री शिवाजीनगर हुडकोत त्याच्या इतर साथीदारांबरोबरच घरफोडीचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. दरम्यान उर्वरीत दोघांचाही शहर पोलिसांकडून शोध सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या