नववर्षात धावणार ‘शिवाई’ ई-बस

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

एसटी महामंडळाच्या ई-बसला मार्गावर धावण्यासाठी जानेवारी म्हणजेच नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात पुण्यातून सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद व नाशिक या मार्गांवर बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण अद्याप चार्जिंग स्टेशन उभारणीच्या कामामुळे हा अवधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारच्या फेम इंडिया योजनेतील दुसर्‍या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासाठी 240 ई-बसला मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी 100 ई-बस एसटी महामंडळाला मिळणार आहे. मागील वर्षीही या योजनेमध्ये एसटीला 50 बस मिळाल्या आहेत.

या बस प्रमुख शहरांना जोडण्यासाठी वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जून महिन्यामध्ये ‘शिवाई’ असे ई-बसचे नामकरण करण्यात आले. त्यानंतर मुंबई-पुणे मार्गावर या बसची चाचणीही घेण्यात आली. पण त्याला मंजुरी मिळण्यास विलंब लागला. तर हिरवा कंदील मिळाल्यानंतर दीड-दोन महिन्यांतच लॉकडाऊन जाहीर झाल्याने बससेवाच ठप्प झाली.

पहिल्या टप्प्यातील 50 बसपैकी 25 बस पुण्याला मिळणार होत्या. तर उर्वरीत सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद व नाशिकला देण्यात येणार होत्या. या बस मार्गावर धावण्यासाठी पाचही ठिकाणी चार्जिंग स्टेशनची उभारणी करणे आवश्यक आहे.

नाशिक येथील एसटीच्या विभागीय कार्यालयाच्या आवारात स्टेशन उभारण्याचे नियोजन आहे. लॉकडाऊनपुर्वी त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पण लॉकडाऊनमध्ये काम झाले नाही. याठिकाणी महावितरणकडून उच्चदाब क्षमतेची भुमिगत वीजवाहिनी टाकून दिली जाणार आहे. या कामांसह चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी किमान दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *