Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारतळोद्यातील व्यापारी गाळ्यांची घरपट्टी व पाणीपट्टी न घेण्याबाबत सत्ताधार्‍यांचे गौडबंगाल काय ?

तळोद्यातील व्यापारी गाळ्यांची घरपट्टी व पाणीपट्टी न घेण्याबाबत सत्ताधार्‍यांचे गौडबंगाल काय ?

मोदलपाडा/ सोमावल / वार्ताहर- nandurbar

तळोदा (Taloda) शहरातील व्यापारी संकुलातील २०० च्यावर व्यापारी गाळ्यांना नगरपालिकेकडून अनेक वर्षांपासून घरपट्टी व पाणीपट्टी लावण्यात आलेली नाही. त्यामुळे पालिकेचे लाखों रुपयाचे उत्पन्न बुडत आहे. या व्यापारी गाळ्यांना घरपट्टी व पाणीपट्टी न लावण्यामागील पालिका सत्ताधार्‍यांचे गौडबंगाल काय आहे असा घणाघाती आरोप शिवसेनेचे शहर प्रमुख जितेंद्र दुबे यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी पालिकेच्या विविध कामांचा बाबतीत त्यांनी पोलखोल केली.

- Advertisement -

तळोदा येथे पत्रकार परिषद सकाळी १० वा . बोलावण्यात आली होती. यावेळी श्री दुबे पुढे म्हणाले की, तळोदा शहरात मोठमोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स (Shopping complex) उभे आहेत .यातील दुकानदारांनी पालिकेकडे घरपट्टी व पाणीपट्टी पालिकेने सुरू करावी यासाठी अर्ज देवूनही पालिकेकडून या दुकानदारांना घरपट्टी व पाणीपट्टी का लावण्यात येत नाही ?

असा सवाल त्यांनी उपस्थित केला . शहरात हद्दवाढीतील नवीन वसाहतीतील कच्चा पक्क्या घराला अव्वाचा सव्वा घरपट्ट्या पालिकेकडून लावण्यात आली आहे . तर शहरात २० वर्षांपासून उभे असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील दुकानांवर इतके वर्ष घरपट्टी व पाणीपट्टी न लावण्याची मेहरबानी का ?

पालिकेचे पाथदिव्यावरील इलेक्ट्रिक बील कमी व्हावे यासाठी २०१७- १८ या वर्षात इलेक्ट्रिक पोल वर लाखों रुपये खर्च करुन सेन्सर डिव्हाईस मशीन बसविण्यात आले होते . त्यावेळी हे डिव्हाईस बसविल्यानंतर पालिकेचा इलेक्ट्रिक खर्च अर्ध्यावर येईल असे सांगण्यात आले होते . परंतु आज पालिकेचा इलेक्ट्रिक खर्चात शून्य टक्के बिलात फरक पडला नाही .या डिव्हाईस बसविण्यावरील खर्च २० ते २२ लाख वाया गेलेत .

तळोदा शहरात आमदार,खासदार निधीतून हायमस्ट एलईडी लाईट (Highest LED light) दिलीत . प्रत्येक पोलवर ४ मोठी एलईडी लाईट लावण्यात आली होती . परंतु सद्या स्थितीत शहरातील ह्या पोलवर कुठे एक तर कुठे दोन असे एलईडी लाईट आहेत . मग एलईडी लाईट गायब झालीत कशी ? ठेकेदार किंवा पालिकेने हे एलईडी लाईट काढली नाहीत तर ही लाईट चोरीला गेलीत तर याबाबतीत पालिकेच्या अधिकार्‍यांनी पोलिसात फिर्याद का दिली नाही ?

पालिकेकडून दरवर्षी शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येते यावर लाखों रुपये खर्चही करण्यात येतो . परंतू या वृक्षाचा संवर्धन पालिकेकडून होतांना दिसत नाही . मागील ३ -४ वर्षात लावण्यात आलेली वृक्षांपैकी ३० टक्केही वृक्ष जिवंत नाहीत . २०१८ मध्ये पालिकेने सात फुट उंचीची वृक्ष लावली होती . त्या वृक्षांची स्थिती सर्वश्रुत आहे . याला जबाबदार असणार्‍या अधिकारी व कर्मचारी यावर कार्यवाही का करण्यात येत नाही ? यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे .

पालिकेकडून वृक्षांची लागवड करण्यात येते . या वृक्षांचा सुरक्षिततेसाठी टीगार्ड लावून देखावा करण्यात येतो .परंतू पालिकेकडून प्रत्यक्षात टीगार्ड खरेदी करण्यात येत नाहीत . या बाबत आमच्या मनातील शंका दूर करावी .असे सांगत पालिकेच्या एकूणच कारभारावर श्री दुबे यांनी आरोपांची सरबत्ती पत्रकार परिषदेत केली . यावेळी पत्रकार परिषदेला आनंद सोनार, संजय पटेल, जगदीश परदेशी, सूरज माळी, कल्पेश माळी, जयेश सुर्यवंशी, श्रावण तिजविज, विनोद वंजारी, आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या