शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार; कालिका मंदिर ट्रस्ट, क्रीडा साधनाचा उपक्रम

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या खेळाडूंना जाहीर झालेल्या शिवछत्रपती पुरस्काराबद्दल या खेळाडूंचा कालिका मंदिर ट्रस्ट आणि क्रीडा साधनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सन 2018-19 साठी नाशिकच्या सहा खेळाडूंना महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.

यामध्ये जलतरणातील डायव्हिंग या प्रकारात जागतिक, आशियायी आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करणारा सिद्धार्थ परदेशी, अ‍ॅथलेटिक्समध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक प्राप्त केलेला किसान तडवी, कॅनॉइंग-कायकिंग या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळविणारा सुलतान देशमुख, रोईंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळविणारे सूर्यभान गडाख आणि जागृती शहारे, दिव्यांग असूनही जलतरणात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळविणारी सायली पोहोरे या सहा खेळाडूंचा यात समावेश आहे. या सर्वांचा नाशिकच्या कालिका देवी मंदिर ट्रस्ट आणि क्रीडा साधना यांच्या वतीने कालिका मंदिराच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील, नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, आदी उपस्थित होते. यावेळी क्रीडा उपसंचालक कांबळे म्हणाले की, खेळाडूंनी या पुरस्कारापासून प्रेरणा घेऊन यापेक्षाही मोठे अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न असे पुरस्कार मिळविण्यासाठी आपले योगदान द्यावे असे सांगितले. नाईक म्हणाले की, खेळाडूंनी खेळांमध्ये चांगली प्रगती करावी यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ घेऊन नाशिकच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा, आशियायी स्पर्धा आणि थेट ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *