साईबाबा समाधीच्या मातीची जाहिरातबाजी करून फसवणूक करणार्‍याविरुद्ध पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी

jalgaon-digital
3 Min Read

शिर्डी ग्रामस्थांची निवेदनाद्वारे पोलीस उपअधीक्षकांकडे मागणी

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – साईबाबांच्या समाधीची माती आपल्याला घरपोच मिळेल अशाप्रकारे सोशल मीडियावर जाहिरातबाजी करत एका अज्ञात इसमाने साईभक्तांना दिशाभूल करून फसवणूक करण्याचा प्रकार निदर्शनास आल्याने शिर्डी ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करून गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी निवेदनपत्राद्वारे करण्यात आली आहे.

शिर्डी ग्रामस्थांनी मंगळवार दि. 24 रोजी शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिर्डीत ग्रामस्थांची नुकतीच ग्रामसभा पार पडली. यामध्ये साईभक्त आणि त्यांची सुरक्षा केंद्रस्थानी ठेवून भाविकांच्या फसवणुकीबाबत अनेकांनी खंत व्यक्त केली आहे. परंतु दिल्ली येथील साईभक्तांनी शिर्डी ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिले की, सोशल मीडियावर एका अज्ञात इसमाने साईबाबांच्या समाधीची माती घरपोच देण्याची जाहिरात दिली आहे.

या जाहिरातीमध्ये व्हॉट्सअ‍ॅप नंबर देऊन भाविकांना बनविण्यात येत आहे. तसेच माती सदृश वस्तू प्लॅस्टिक पाकिटामध्ये पाठविण्यात येत आहे. या नंबरबाबत अधिक तपास केला असता ही व्यक्ती नागपूर शहरातील आनंद रोड बेझोनबाग येथील असल्याचा कळाले. दरम्यान या प्रकारामुळे देश-विदेशांतील साई भक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून अनेक भाविकांची फसवणूक होत आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. वाकचौरे यांनी तत्परता दाखवत सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी आपली यंत्रणा सतर्क केली असून लवकरच हा आरोपी जेरबंद होईल, असे ग्रामस्थांना आश्वासन दिले.

साईबाबा संस्थान ट्रस्ट या नावाने देशविदेशांत अनेक संस्था कार्यान्वित असून साईभक्तांची आर्थिक फसवणूक करीत आहेत. त्यामुळे साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डीतील एकमात्र अधिकृत संस्थान असून या संस्थानला मोठा फटका बसत आहे. असे असताना आजपर्यंत कोणत्याही अधिकार्‍यांनी तसेच विश्वस्तांनी याविषयीही कठोर निर्णय न घेतल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. यावर वेळीच पायबंद घातला नाही तर देशव्यापी आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान सदर व्यक्तीवर शिर्डी पोलीस ठाण्याच्यावतीने कठोर कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

यावेळी शिवसेना नेते कमलाकर कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, नितीन कोते, नगरसेवक सुजित गोंदकर, गटनेते अशोक गोंदकर, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, मनसेचे दत्तात्रय कोते, सुनील गोंदकर, रवींद्र कोते, सुनील बारहाते, हरिराम राहाणे, चंद्रकांत गायकवाड, महेश महाले, राजेंद्र सोमवंशी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कारवाईबाबत प्रशासन गप्प का?
याबाबतची माहिती सदर इसमाने साईबाबा संस्थानला दिली आहे. तरीसुद्धा संस्थान प्रशासन कारवाई न करता गप्प का असा सवाल साईनिर्माण ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा साईभक्त विजय कोते यांनी उपस्थित केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *