साई संस्थानने दाखल केलेल्या गुन्ह्याची चौकशी करुन न्याय द्यावा

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानने एका खासगी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी बातम्या केल्याचा आकस मनात धरून उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मुख्य कार्यकारी

अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या आदेशानुसार एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे पत्रकार नितीन ओझा आणि मुकुल कुलकर्णी यांच्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याची योग्य ती चौकशी करून न्याय देण्यात यावा, अशी मागणी शिर्डी प्रेस क्लबचे अध्यक्ष हरिष दिमोटे यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

सोमवार दि. 1 फेब्रुवारी रोजी शिर्डी प्रेस क्लब तसेच पत्रकार संघाच्यावतीने प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांंनी शिर्डी येथील एबीपी माझाच्या पत्रकारावर गुन्हा दाखल केला असून आम्ही शिर्डी प्रेस इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रतिनिधी विनंती करतो की, साईबाबा संस्थान उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यानी एबीपी माझा या वृतवहिनीचे प्रतिनिधी नितीन ओझा, मुकुल कुलकर्णी यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याची आड घेवून खोटा गुन्हा दाखल केला आहे.

सदर गुन्हा हा सूड काढण्याच्या उद्देशाने दाखल केला असल्याने आपल्याकडे निवेदनाच्या माध्यमातून न्याय मागत आहोत. सदरचा गुन्हा हा धादांत खोटा आहे. साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने भक्त गैरसोयीच्या बातम्या केल्याचा आकस मनात धरुन मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे व उपकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यानी एकविचाराने खोटी फिर्याद सुमारे अडीच महिन्यानंतर दाखल केली आहे.

विशेष म्हणजे आजमितीला साईबाबा संस्थान आपल्या अध्यक्षतेखाली काम करत असताना या के. एच. बगाटे व रविंद्र ठाकरे दोन महसुली अधिकारी यांंनी आपल्या अपरोक्ष ही बेकायदेशीर फिर्याद नोंदविली आहे. यातून या अधिकार्‍यांंनी न्यायालयीन अधिकारात हस्तक्षेप करुन आपले अधिकार प्रशस्त असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. हा संदेश लोकात रूजविण्याचा हा प्रयत्न आहे. यांंना काही राजकिय पाठिंबा असल्याने हे अधिकारी असे धारीष्ठ करीत असल्याचा संदेश बगाटे व ठाकरे यांच्या कृतीतून समाजात पसरवला जात आहे.

आम्ही सर्व माध्यम प्रतिनिधी आपल्याला विनंती करतो की, या दोन्ही पूर्वग्रह व सूड बुद्धीने लोकसेवकांंची भूमिका निभावणारे कान्हुराज बगाटे व रविंद्र ठाकरे यानी केलेल्या बेकायदेशीर कारभाराची चौकशी करुन कडक कारवाई करावी. यासोबतच कान्हुराज बगाटे व रविंद्र ठाकरे यांंनी दखल केलेली खोटी फिर्याद मागे घेण्यासाठी आदेश देवून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. यावेळी शिर्डी प्रेस क्लबचे अध्यक्ष हरिष दिमोटे, पत्रकार सतिष वैजापूरकर, मनोज गाडेकर, प्रशांत शर्मा, सुनील दवंगे, राजकुमार जाधव, किशोर पाटणी, हेमंत शेजवळ, रवींद्र महाले, सचिन बनसोडे, किरण सोनवणे, मोबीन खान आदिसह पत्रकार बांधव उपस्थित होते.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *