Saturday, April 27, 2024
Homeनगरआठ दिवस उलटूनही हेलिकॉप्टर प्रकरणी गुन्हा दाखल नाही

आठ दिवस उलटूनही हेलिकॉप्टर प्रकरणी गुन्हा दाखल नाही

शिर्डी (शहर प्रतिनिधी) –

जगाच्या नकाशावर एकमेव सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर सुरक्षेच्यादृष्टीने अतिशय संवेदनशील

- Advertisement -

असून दैनिक सार्वमतने वृत्त प्रसारित करताच मंदीराच्या सभोवताली ड्रोन उडविणार्‍या व्यक्तीवर शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र आठ दिवस उलटूनही हेलिकॉप्टर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी मंदिर प्रशासन आणि पोलीस टाळाटाळ का करतयं? मंदिराची सुरक्षा व्यवस्था कूचकामी आहे की राजकीय दबावतंत्राचा वापर होत आहे, असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला असून साईमंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या शिर्डीतील साईबाबांच्या मंदिर परिसरातील द्वारकामाईसमोर एका व्यक्तीकडून मागील आठवड्यात शुक्रवारी ड्रोन उडविण्यात आले होते. या ड्रोनचे सीसीटीव्ही फुटेज मंदिर प्रशासनाने जमा करून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मंदिर सुरक्षेच्या संवेदनशील विषयाकडे अधिकारी दोन दिवस उलटून देखील कारवाईचा बडगा उचलत नसल्याने याविषयी दैनिक सार्वमतने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर ड्रोन उडविणार्‍या अज्ञात व्यक्तीविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

एक दिवस अगोदर मंदिराच्या कळसावरून घिरट्या घातल्याची घटना घडली. मंदिर कळसावरून जवळून कोणत्याही वस्तू उडविण्यात येऊ नये यासाठी नियमावली तयार केली आहे, असे असताना घिरट्या घालणार्‍या हेलीकॉप्टरचे रहस्य कायम असून अजूनही कोणत्याही प्रकारचा गुन्हा अथवा कारवाई करण्यात आली नसून जर ड्रोनवाला विरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो तर हेलिकॉप्टरवर का नाही? कायद्याच्या चौकटीत सर्वांना एकसारखे धरायला पाहिजे. या निळ्या रंगाच्या हेलिकॉप्टरमध्ये एका राजकीय पक्षाचा बडा नेता असल्याचे समजते. ड्रोनवाला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेने काय साध्य केले. ड्रोनवाला पसार झाला आहे की त्याला अभय देण्यात आले? अशी चर्चा शहरात सुरू आहे.

संवेदनशील मंदिराच्या सुरक्षेसाठी शेकडो पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तरीदेखील हेलिकॉप्टरमधील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कूचकामी ठरली असल्याचे साईभक्तांनी व ग्रामस्थांनी बोलून दाखवले. हेलिकॉप्टरवर कारवाई टाळण्यासाठी कोणाचा दबाव येत आहे? मंदिर सुरक्षेशी हा धोकादायक खेळ आता कोणत्या वळणावर येतो याकडे लाखो साईभक्तांचे लक्ष वेधून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या