शिर्डीत रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी लाखो भक्त साईचरणी लीन

jalgaon-digital
4 Min Read

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्रीराम नवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी लाखो साईभक्त साईच्या चरणी लीन झाले. भक्तांच्या अलोट गर्दीमुळे शिर्डीतील हॉटेल, लॉजिंग व भक्तनिवास हाउसफुल्ल झाले. साईनामाच्या गजराने साईनगरी न्हावून निघाली. साई संस्थानकडून भक्तांना साईचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी विशेष सुविधा देण्यात आल्या.

रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी गुरुवारी अखंड पारायण समाप्तीनंतर साईसच्चरित ग्रंथाची व्दारकामाईतून गुरुस्थानमार्गे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी वीणा, वैद्यकीय संचालक ले.कर्नल डॉ.शैलेश ओक व संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांनी श्रींची प्रतिमा घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला.

याप्रसंगी संस्थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, मालती यार्लगड्डा, मिनाक्षी सालीमठ, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. रामनवमी उत्सवाच्या निमित्त अनेक ग्रामस्थ कोपरगाव येथून गोदावरी नदी पात्रातून गंगाजल घेऊन येतात. त्या गंगाजल आणणार्‍या कावडीचें पुजन संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा व त्यांची पत्नी मालती यार्लगड्डा, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व त्यांच्या पत्नी मिनाक्षी सालीमठ आणि प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केले.

समाधी मंदिरात श्रींची विधीवत पाद्यपुजा जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्यांची पत्नी मालती यार्लगड्डा, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, मिनाक्षी सालीमठ यांनी केली. यावेळी संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी आदी उपस्थित होते. तसेच श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी व्दारकामाई मंदिरातील दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गव्हाच्या पोत्याची पूजा संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा व मालती यार्लगड्डा आणि जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व त्यांच्या पत्नी मिनाक्षी सालीमठ यांनी केली.

लेंडीबागेत साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे पुजनही वरील सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रामनवमी उत्सवाच्या शुभमुहूर्तावर पुर्वीप्रमाणे दर्शन रांगेतील प्रत्येक साईभक्तास मोफत बुंदी प्रसाद पाकीट वितरण करण्याचा शुभारंभ संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा यांच्याहस्ते करण्यात आला. रामनवमी उत्सवानिमित्त अमेरिका येथील दानशुर साईभक्त श्रीमती शोभा पै यांच्या देणगीतुन समाधी मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

विक्रम नांदेडकर यांचे श्रीराम जन्मावर कीर्तन झाले. किर्तनानंतर संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा व मालती यार्लगड्डा आणि प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव व कावेरी जाधव यांच्या हस्ते श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान शिर्डीमध्ये सर्व पालख्या व हजारो साईपदयात्री तसेच विविध वाहनांमधून साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत. शिर्डी साईभक्तांनी व साई नामाने दुमदुमून गेली आहे. संस्थान सुरक्षा विभाग व पोलिसांनी ही चौख बंदोबस्त ठेवला आहे. पायी शिर्डीला येणार्‍या साई पदयात्रांसाठी रस्त्यामध्ये ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, चहा नाश्ता, फळे, सरबत, मोफत वाटण्यात येत आहेत. शिर्डीत रामनवमी उत्सवानिमित्त मोठ्या संख्येने साई भक्त पालखी घेऊन पायी तसेच वाणने दाखल झाले तसेच विविध राज्यातील साई भक्तांनी साई समाधी दर्शन घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे शिर्डीतील सर्वच हॉटेल व लॉजिंग तसेच साईबाबा संस्थानचे भक्ती निवास गर्दीने हाउसफुल झाले आहे. शिर्डी वाहनांच्या गर्दीमुळे सर्वच रस्ते भक्तांच्या गर्दीमुळे फुलून गेले होते.

रामनवमी उत्सवानिमित्त यात्रा उत्सव कमिटीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शुक्रवारी सायंकाळी 6 ते 11 साईनगर मैदान येथे महिलांसाठी फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून तसेच याच दिवशी 80 हजार बक्षीसाचे आयोजन करून कुस्ती हंगाम, व रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा. तसेच शनिवारी सायंकाळी बारा गावच्या बारा अप्सरा लावणी महोत्सव, श्वेता खरात, तेजा देवकर, सुनिता गायकवाड या तीन तारकांच्या धमाल गीतांचा कार्यक्रम आयोजित केला असून नागरिकांनी हे कार्यक्रम बघण्याचा आनंद घ्यावा असे आव्हान यात्रा कमिटीचे ताराचंद कोते व इतर सदस्यांनी यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *