शिर्डी नगरपंचायत निवडणुकीत 6 उमेदवार बिनविरोध

jalgaon-digital
3 Min Read

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी नगरपंचायत निवडणुकीत 17 वॉर्डातील चार जागेवर निवडणूक आयोगाने खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्याची घोषणा केली असून दि. 18 जानेवारी रोजी होणार्‍या निवडणुकीत चार जागेवर पाच अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले होते. यामध्ये एका उमेदवाराने अर्ज माघारी घेतल्यामुळे चार जागांसाठी चार उमेदवारांचे अर्ज दाखल होते.

काल दि.10 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख होती. मात्र यावेळी कोणीही अर्ज माघारी घेतले नसल्याची माहिती शिर्डी नगरपंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली. दरम्यान शिर्डी नगरपंचायतीच्या इतिहासात शिर्डी ग्रामस्थांच्या बहिष्कारानंतर नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेत आय. काँग्रेसचे सहा अपक्ष उमेदवार बिनविरोध झाले आहे.

दि. 21 डिसेंबर 2021 रोजी होणार्‍या शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी दि.1 डिसेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान बहिष्कार घातल्यानंतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरले नव्हते, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि.7 डिसेंबर रोजी शिर्डी शहरातील माजी नगरसेवक तथा काँग्रेस कमिटीचे शिर्डी उपशहराध्यक्ष सुरेश आरणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून वॉर्ड क्रमांक 13 मधून तर त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.अनिता सुरेश आरणे यांनी वॉर्ड क्रमांक 1 मधून अर्ज दाखल केल्यामुळे दि.22 डिसेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी बिनविरोध निकाल जाहीर करणे अपेक्षित होते. परंतु 17 वॉर्डातील प्रथम ओबीसी असलेल्या वॉर्ड नंबर 5 ,वॉर्ड नंबर 8 ,वॉर्ड नंबर 10 ,वॉर्ड नंबर 24 या चार जागेवरील आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती देऊन याठिकाणी खुला प्रवर्ग केला.

त्यामुळे निवडणूक आयोगाने या चार जागेसाठी दि. 18 जानेवारी 2022 रोजी निवडणूक घेण्याची घोषणा केली आहे.त्यानुसार या खुल्या प्रवर्गातील चार जागेवर नामनिर्देशन फाँर्म भरण्यासाठी दि.29 डिसेंबर 2021 ते 3 डिसेंबर 2022 दरम्यानचा कालावधी होता. यासाठी सर्वपक्षीय शिर्डी ग्रामस्थांनी बैठक घेऊन पून्हा बहिष्कार टाकला होता. परंतु अर्ज भरण्याची शेवटची अंतिम मुुुदत दि.3 जानेवारी असल्याने प्रभाग क्रमांक 5 मध्ये सुनिता राजेंद्र बर्डे आणि अर्चना अमृत गायके, प्रभाग क्रमांक 8 मध्ये युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रसाद प्रकाश शेळके, प्रभाग क्रमांक 10 मध्ये आरती संभाजी चौगुले, प्रभाग क्रमांक 14 मध्ये काँग्रेस कमिटीचे शिर्डी शहराध्यक्ष संभाजी नानासाहेब चौगुले आदी पाच अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले होते.या चार जागेवरील नामनिर्देशन फाँर्मची छाननी 4 जानेवारी रोजी झाली.

यामध्ये पाचही अर्ज वैध ठरले होते. दि.10 जानेवारीला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख होती.परंतु या पाच उमेदवारांपैकी वॉर्ड नंबर 5 मधून सुनिता राजेंद्र बर्डे यांनी आपला अर्ज माघारी घेतला होता. त्यामुळे निवडणूक रिंगणात चार जागेंसाठी चार उमेदवार उभे होते.काल चारही उमेदवारांनी आपले अर्ज माघारी न घेतल्याने हे उमेदवार बिनविरोध झाले असून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून अधिकृतरीत्या घोषणा करण्याची औपचारिक बाकी राहीली आहे.दरम्यान यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्राद्वारे कळविण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री शिंदे यांनी सांगितले. पहिले दोन आणी आताचे चार असे सहा नगरसेवक बिनविरोध झाले आहे. नगरपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर करण्यासाठी हालचाली सुरू आहे.मात्र तोपर्यंत आगामी काळात निवडणूक आयोग या सहा नगरसेवकांबाबत काय निर्णय घेतात याकडे लक्ष राहाणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *