Saturday, April 27, 2024
Homeनगरशिर्डी अतिक्रमण मोहीम महिनाभर सुरु राहणार

शिर्डी अतिक्रमण मोहीम महिनाभर सुरु राहणार

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी शहरातील साईमंदीर परिसरातील साईकॉम्प्लेक्स व पालखी मार्गावरील शासकीय जागेवरील अतिक्रमणे काढण्यास सुरवात करण्यात आली आहे. दरम्यान या मोहिमेचे सर्व नागरिकांकडून जोरदार स्वागत केले जात आहे. सदरची अतिक्रमणे हटविल्याने साईमंदीर परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असल्याच्या प्रतिक्रिया साईभक्तांनी व्यक्त केल्या.

- Advertisement -

शिर्डी नगरपरिषदेने शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी कठोर पाऊले उचलली आहे. आजतागायत ट्रक भरून सामान जप्त केले आहे. मोठ्या प्रमाणावर नगर परिषदेच्या मालकीच्या साई कॉम्प्लेक्स, गंगवाल मार्केट गल्ली, प्रवेशद्वार क्रमांक चार, पालखी मार्ग, शहरातील नवीन पिंपळवाडी रोड, द्वारकामाई समोरच्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढल्याने देशविदेशातून शिर्डीत येणार्‍या लाखो भाविकांना चालण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. या मोहिमेचे साईभक्त तसेच व्यवसाईकांनी स्वागत केले आहे. तसेच प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानात दरफलक बंधनकारक आहे. अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी श्री. डोईफोडे यांनी सांगितले.

शिर्डी शहराचा विकास झपाट्याने होत असून राज्याचे महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर शिर्डी स्वच्छ शिर्डी करून देशात शिर्डी शहराला प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी शिर्डी नगरपरिषदेने त्यादृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले आहे. नगर परिषदेच्या मालकीच्या गाळ्यासमोर भाडेकरूंनी पुन्हा नवीन अतिक्रमण धारकांना जागा दिल्यास संबधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी सांगितलेे.

विनाकारण साईभक्तांना त्रास देऊ नये.नगरपरिषदेचा हेतू स्वच्छ असून प्रत्येक अतिक्रमण धारक दुसर्‍याकडे बोट दाखवून त्याचे अतिक्रमण काढा मग मी काढतो अशी मागणी करत आहे. प्रत्येकाने अगोदर स्वतःचे अतिक्रमण काढावे मग दुसर्‍याकडे बोट दाखवावे अशी नगरपरिषदेची भूमिका आहे. कुठलाही भेदभाव न करता कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता शिर्डी नगरपरिषदेच्या माध्यमातून यापुढे महिनाभर या विशेष मोहिमेच्या माध्यमातून अतिक्रमण धारकांवर कारवाई करणार आहे.

– काकासाहेब डोईफोडे, मुख्याधिकारी शिर्डी नगरपरिषद

- Advertisment -

ताज्या बातम्या