शिर्डीतील गुन्हेगारी विरोधात ग्रामस्थ एकत्र येणार

jalgaon-digital
3 Min Read

शुक्रवारी सर्वपक्षीय ग्रामसभेचे आयोजन; पोलिसांविरुद्ध आक्रमक भूमिका घेणार

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – जगाला सबका मालिक एक हा संदेश देणार्‍या साईबाबांच्या शिर्डीत आणि परिसरात होत असलेल्या पाकिटमारी, लूटमार या घटनांबरोबरच शिर्डीतून भाविकांचे होत असलेल्या मिसिंगबाबत औरंगाबाद खंडपीठाने पोलीस प्रशासनाला खडसावल्याने शिर्डी पोलीस खरबडून जागे झाले असतानाच सर्वपक्षीय शिर्डीकरही पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक झाले आहेत. यापुढे शिर्डीत गुन्हेगारांना थारा देणार्‍यांची गय केली जाणार नाही.

गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे आणि साईभक्तांची लूटमार करणार्‍यांविरोधात पक्ष-गट तट बाजूला ठेवून गावाचा निर्णय गावानेच करायचा. नेत्यांचे आदेश आणि राजकीय विचारांना थारा द्यायचा नाही. शिर्डी पोलीस प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे शिर्डीची बदनामी होत असल्याने त्या विरोधात एकत्रित लढ़ा उभारण्यासाठी येत्या शुक्रवारी शिर्डी ग्रामस्थांची सर्वपक्षीय ग्रामसभेचे आयोजन करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला.

जगाच्या विविध भागांतून दररोज लाखोंच्या संख्येने साईभक्त शिर्डीत येतात. शिर्डीपासून 100 किलोमीटर अंतरापासूनच नाशिक, पुणे, औरंगाबाद या मार्गावर पोलिसांकडून त्यांच्या लुटीला प्रारंभ होतो. शिर्डीत भाविक दाखल झाल्यानंतरही वाहतूक पोलीस, कमिशन एजंट, हार फूल, प्रसाद आदींकडून साईभक्तांची खुलेआम लूट होते. साईबाबांच्या दर्शनासाठी कमिशन एजंटांकडून खोटे पासेस देऊन दिशाभूल केली जाते. हा सारा प्रकार लक्षात येऊनही दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न साईभक्तांना पड़तो. शिर्डी पोलिसांकडे तक्रारी घेऊन साईभक्त गेलाच तर त्याला अधिक मनस्तापाचाच सामना करावा लागतो. मतांचे राजकारण सुध्दा शिर्डीच्या या गुन्हेगारी जगताला जबाबदार असल्याचे समोर आले आहे.

गेल्या वर्षभरात शिर्डीत आलेल्या भाविकांच्या मिसिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने औरंगाबाद खंडपीठाने हे मिसिंग मानवी अवयवांची तस्करी करण्यासाठी तर नाही ना असा सवाल करत या प्रकारणाची सखोल चौकशी करण्याचे पोलीस प्रशासनाला आदेश दिल्याने पोलीस प्रशासन खरबडून जागे झाले आहे.

पोलीस प्रशासनामुळे गुन्हेगारीत वाढ होत असल्याच्या प्रकारामुळे शिर्डीतील सर्व पक्षीय ग्रामस्थांनीही संताप व्यक्त करून यापुढे शिर्डीतील पाकीटमारी, अवैध व्यवसाय, साईभक्तांची लूटमार या प्रकारात यापुढे कोणताही थारा दिला जाणार नाही. याची साईबाबांना स्मरून उपस्थित सर्वपक्षीय प्रमुख ग्रामस्थांनी शपथ घेतली. या वाढत असलेल्या गुन्हेगारीबाबत निर्णय घेण्यासाठी येत्या शुक्रवारी सर्वपक्षीय ग्रामस्थांची ग्रामसभा घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.

ज्ञानेश्वर गोंदकर यांच्या निवासस्थानी झालेल्या या सर्वपक्षीय बैठ्ठकीत नगरसेवक सुजित गोंदकर, रवींद्र गोंदकर, मंगेश त्रिभुवन, दीपक वारुळे, अशोक कोते, प्रमोद गोंदकर, भाजपचे शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, नीलेश कोते, नितीन कोते, विजय जगताप, रमेश गोंदकर, विजय कोते, रज्जाकभाई शेख आदींनी आपल्या भाषणात शिर्डीत गुन्हेगारी आणि त्याला असलेले पोलिसांचे अभय या विरोधात आक्रमक भूमिका मांडली.

शिर्डीतील वाहातूक शाखेकडून खुलेआम साईभक्तांची लूट होत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वपक्षीय ग्रामस्थांनी भेटून पोलिसांविरोधात कारवाईची मागणी करणार आहोत. वर्षभरात 80 लोक ग़ायब होतात. शिर्डीसाठी ही घटना लाजीरवाणी आहे. ग्रामसभेत निर्णय घेऊन शिर्डी ग्रामस्थ व महिला एकत्रित पोलिसांना जाब विचारण्यासाठी मोर्चा नेण्यात येईल.
-कमलाकर कोते, शिवसेना नेते

गुंडप्रवृत्तीच्या लोकांमुळे शिर्डीची बदनामी होत असल्याने या गुंडगिरीचा समूळ नायनाट करण्यासाठी पक्षीय विचार बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. अवैध व्यवसाय अथवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना यापुढे कोणीही अंधारात अथवा उजेडात समर्थन देऊ नये. साईभक्त आणि शिर्डीकरांच्या सुरक्षिततेसाठी एकत्रितपणे लढ़ा उभारावा लागेल.
-कैलासबापू कोते, माजी नगराध्यक्ष, शिर्डी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *