Saturday, April 27, 2024
Homeनगरशिर्डीतील 1500 व्यावसायिकांच्या आरटीपीसीआर, अँटिजेन चाचण्या

शिर्डीतील 1500 व्यावसायिकांच्या आरटीपीसीआर, अँटिजेन चाचण्या

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन शिर्डी नगरपंचायतच्यावतीने शिर्डी शहरातील दीड हजार व्यावसायिकांची आरटीपिसीआर व अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 57 रुग्ण करोनाबाधित आढळून आले असून यात शिर्डी शहरातील 43 रुग्णांचा समावेश असल्याची माहिती शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली.

- Advertisement -

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आंतरराष्ट्रीय शिर्डी शहरात देशविदेशातून लाखो भाविकांनी हजेरी लावली आहे. करोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन शिर्डी नगरपंचायतच्यावतीने दि.01 जानेवारी ते 10 जानेवारी यादरम्यान शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, दुकानदार, व्यावसायीक यांची आरटीपिसीआर तसेच अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या आहे.नगरपंचायत तसेच खाजगी लॅबमधील चाचण्यांमध्ये शिर्डी शहरासह 37 रुग्ण करोनाबाधित आढळून आले होते.यामध्ये शिर्डी शहरातील 25 रुग्णांचा समावेश होता. तर दि. 10 रोजी शहरातील व्यावसायीकांच्या केलेल्या आरटीपिसीआर चाचणी तपासणीमध्ये शिर्डी शहरातील 18 रुग्ण नव्याने बाधित झाले असल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाने दिली आहे.

त्यामुळे आता ही संख्या 43 वर जाऊन पोहचली आहे. कोव्हिडच्या तिसर्‍या लाटेची शक्यता अधिक असल्याने राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी शहरातील हॉटेल, लॉजींग, दुकानदार यांच्यासाठी सकाळी 08 ते रात्री 10 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.तर पहाटे 05 ते रात्री 11 वाजेपर्यंत पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, रात्री 11 ते पहाटे 05 पर्यंत कुणीही विनाकारण बाहेर पडू नये असा आदेश जारी करण्यात आला आहे. शिर्डी शहरातील दुकानदार तसेच भाविक यांनी तोंडाला मास्कचा वापर करावा, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे.

शिर्डी शहरात पहिल्या डोससाठी 78 टक्के नागरिकांनी लसिकरण केले असून दुसर्‍या डोससाठी उर्वरित नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे जेणेकरून तिसर्‍या लाटेचा त्रास होणार नाही, असे आवाहन शिर्डी नगरपंचायतच्यावतीने मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी केले आहे. शिर्डी नगरपंचायतच्यावतीने शहरात विनामास्क वावरणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. शहरातील रस्त्यावर तसेच उपनगरात सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी, असेही नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या