Thursday, April 25, 2024
Homeनगरशिर्डी विमानतळाकडे जाणार्‍या रस्त्यावर असलेल्या होर्डींगवरील साईबाबांच्या प्रतिमांची दुरवस्था

शिर्डी विमानतळाकडे जाणार्‍या रस्त्यावर असलेल्या होर्डींगवरील साईबाबांच्या प्रतिमांची दुरवस्था

कोर्‍हाळे |वार्ताहर|Korhale

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे ये-जा करणार्‍या साईभक्तांच्या माहितीस्तव लावलेल्या होर्डिंगवर साईबाबांच्या प्रतिमांची दुरवस्था झाली असून ही बाब अनेक साईभक्तांच्या श्रद्धेला व भावनेला ठेच पोहोचवणारी आहे. दुरवस्था झालेल्या ठिकाणी बाबांची नवीन प्रतिमा बसवावी, अशी मागणी साईभक्तांमधून होत आहे.

- Advertisement -

त्या फलकांच्या अर्ध्या भागामध्ये गावाचे नावे, जोड रस्ते, विविध मार्ग दाखवण्यात आले आहे. तर उर्वरित भागात साईबाबांचे विविध फोटो लावण्यात आले आहेत; परंतु विमानतळ मार्गावर सुरुवातीच्या काळात लावण्यात आलेल्या या फोटोंचा संबंधित विभागाला दुरुस्तीचा विसर पडल्याने या प्रतिमावर ऊन, वारा, पाऊस यांचा परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली दिसत आहे. शिर्डी विमानतळावर मंत्रीगण, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, राजकीय पुढारी, स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते यांचा या मार्गाने नेहमी वावर असतो; परंतु या सर्वांच्या निदर्शनातून ही बाब कशी सुटते याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

साईबाबांवर अपार श्रद्धा असणार्‍या साईभक्तांच्या नजरेस फोटोंची दुरवस्था झाल्याची बाब पडल्यानंतर सुधारणा होणे व याविषयी जागरूकता आणण्यासाठी त्यांनी माध्यमांशी संपर्क साधला. मात्र संबंधित विभागाने याबाबत डोळ्यावर पट्टी का बांधली आहे, असा सवाल साईभक्तांमधून उपस्थित होत आहे. साईबाबांच्या श्रद्धेचा व पावित्र्याचा विचार करता झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला आता तरी जाग येईल का? संबंधित ठिकाणी प्रतिमा बदलल्या जातील का? हा प्रश्न पडला आहे. तरी संबंधित विभागाने तातडीने या बोर्डवरील साईबाबांची प्रतिमा चांगल्याप्रकारे रेखाटावीत, हीच अपेक्षा सर्वसामान्य साईभक्तांमधून होत आहे.

या होर्डिंगवर लावलेली साईबाबांची प्रतिमा वर्षानुवर्षे तशीच न ठेवता संबंधित विभागाने त्या प्रत्येक वर्षी बदलाव्यात, जेणेकरून साईभक्तांच्या भावना जपल्या जाऊन दुरवस्था होणार नाही याची काळजी घ्यावी.

– कानिफ गुंजाळ, अध्यक्ष, साईबाबा विमानतळ टॅक्सी वाहतूक संघटना

- Advertisment -

ताज्या बातम्या