Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedकर्जतची सुप्रसिद्ध शिपी आमटी

कर्जतची सुप्रसिद्ध शिपी आमटी

स्वाती पाटील

साहित्य : एक वाटी तूरडाळ, पाव वाटी मूगडाळ, पाव वाटी उडीद डाळ,तीन मोठे कांदे, साधारण पाव किलो खोबरे,एक टोमॅटो,आलं ,लसूण, कोथिंबीर ,कढीपत्ता , गरम मसाला पावडर,मटण मसाला, संडे मसाला, कांदा लसूण मसाला,धना पावडर, जिरा पावडर,लाल मिरची पावडर,काळे तिखट, कसूरी मेथी, तेल, मीठ, मोहरी,पाणी इत्यादी…

- Advertisement -

कृती : प्रथम सर्व डाळी एकत्र करून कूकरमध्ये चांगल्या शिजवून घ्याव्यात.उभे चिरलेले कांदे व खोबर्‍याचे तुकडे तव्यावर थोडेसे तेल घालून चांगले लालसर भाजून घ्यावेत. हे भाजन कोथिंबीर घालून मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यावे. त्यानंतर टोमॅटोची पेस्ट बनवून घ्यावी. तसेच आले लसूण कढीपत्ता यांची सुद्धा पेस्ट बनवून घ्यावी.

त्यानंतर शिजलेल्या डाळी व्यवस्थित घोटून घ्याव्यात व अडीच ते तीन लिटर पाणी गरम करून घ्यावे. आता फोडणीसाठी कढईत भरपूर तेल गरम करून त्यात मोहरी तडतडल्यावर कढीपत्त्याची पाने आले-लसूण पेस्ट घालावी. ही पेस्ट लालसर झाली की त्यात कांदा आणि खोबर्‍याची पेस्ट घालून चांगले म्हणजे अगदी तेल सुटेपर्यंत परतत रहावे.

फोडणीचा खमंग वास यायला लागला की, त्यात क्रमाक्रमाने लाल तिखट, कसुरी मेथी पावडर, गरम मसाला पावडर, काळे तिखट, संडे मसाला, कांदा लसूण मसाला, धना पावडर हे सगळे साधारणपणे प्रत्येकी एक ते दीड टेबलस्पून घालून तेलात चांगले परतत रहावे, ही फोडणी चांगली झणझणीत हवी. त्यानंतर त्यात टोमॅटोची पेस्ट घालावी. चांगले परतून झाल्यावर गरम केलेले निम्मे पाणी ह्या फोडणीत घालून एक उकळी येऊ द्यावी.

राहिलेले गरम पाणी शिजलेल्या डाळीमध्ये घालवून चांगले एकत्र करून उकळत्या आमटीमध्ये थोडेथोडे टाकत राहावे. आमटी जास्त घट्ट होत असेल तर त्यात आणखी पाणी घालावे. शेवटी योग्य प्रमाणात मीठ घालून आमटीला एक उकळी आली की साधारण दहा मिनिटे मंद आचेवर ही शिपी आमटी तयार होऊ द्यावी.

शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. अशी ही गरमागरम शिपी आमटी चपाती आणि भाताबरोबर छान लागते. पण त्याच्या जोडीला ताटात कांदा,टोमॅटो, काकडी, पापड, लिंबू,भाजके शेंगदाणे हे सगळे असावेच लागते.

(कर्जतची सुप्रसिद्ध शिपी आमटी)

सणवार ,उत्सव, घरगुती, सामाजिक कार्यक्रमांमध्ये इथे सर्रासपणे जेवणासाठी शिपी आमटीचा बेत केला जातो.)

– ,कर्जत अहमदनगर मोबा.7218127439

- Advertisment -

ताज्या बातम्या