Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यातील अपात्र 31 ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुका घ्याव्यात - शिणगारे

श्रीरामपूर तालुक्यातील अपात्र 31 ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुका घ्याव्यात – शिणगारे

शिरसगाव |वार्ताहर| Shirsgav

श्रीरामपूर तालुक्यातील 31 ग्रामपंचायत सदस्यांनी निवडून आल्यावर वर्षभरात जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने

- Advertisement -

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी त्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. अशा अपात्र ग्रामपंचयत सदस्य व लोकनियुक्त सरपंच यांच्या निवडणुका त्वरित मुदतीच्या आत घ्याव्यात, अशी मागणी हरिगाव ग्रामपंचायत सदस्य सुनील शिणगारे यांनी केली आहे.

त्यामध्ये हरिगाव ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच अस्मिता दीपक नवगिरे व ग्रामपंचायत सदस्य सागर सोनवणे, उषा कांबळे हे तीन जण अपात्र झाले आहेत. लोकनियुक्त सरपंच नवगिरे यांना 643 मते मिळून निवडून आल्या होत्या. सरपंच पदासाठी 9 उमेदवार उभे होते. सागर सोनावणे प्रभाग 5 मधून बिनविरोध निवडून आले होते.

अनु.जाती स्त्री राखीवमध्ये उषा कांबळे निवडून आल्या होत्या. रिक्त झालेल्या जागेसाठी 3 महिन्यांच्या आत पोटनिवडणुका घेणे हे आवश्यक असल्याने प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. सरपंच या पदाचा कार्यभार उपसरपंच बाळासाहेब पवार हरिगाव यांचेकडे 24 सप्टेंबरपासून होता. नुकतेच हरिगाव ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी एम. बी. शेळके यांचे निधन झाले आहे.

सरपंच व ग्रामसेवक नसल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. सरपंच अस्मिता नवगिरे यांच्या काळात विविध विकास कामे झाली. हरिगाव ग्रामपंचायतीचे नेतृत्व माजी आ.भानुदास मुरकुटे, मा. आ. भाऊसाहेब कांबळे, सभापती दीपक पटारे, मा.चेअरमन सुरेश गलांडे यांनी निवडणूक काळात केले होते. तर ससाणे गटाचे नेतृत्व एकटेच सुनील शिणगारे करीत होते. 11 जागा या गटाला मिळाल्या होत्या. तर ससाणे गटाला दोन जागा मिळाल्या होत्या.

पैकी सत्ताधारी गटाचे तीन सदस्य अपात्र ठरले. आता इतर मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांसोबत या पोटनिवडणुका होतात की यासाठी 3 महिने मुदतीत पोटनिवडणुका होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याचे उपसरपंच बाळासाहेब पवार यांचा पदाचा राजीनामा घेऊन पंचायत समिती सभापतींकडे 7 डिसेंबरला सादर केला असून नवीन ग्रा.पं.सदस्य उपसरपंचपदी नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या