शिंगणापुरात देवस्थानने तेलविक्री स्टॉल सुरू केल्याने व्यावसायिकांना फटका

jalgaon-digital
2 Min Read

शनीशिंगणापूर |वार्ताहर| Shanishignapur

पारंपरिक रुढीनुसार तेलाला महत्त्व असून शिंगणापुरात तेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच आता देवस्थाने प्रवेशद्वारातच तेलविक्री सुरू केल्याने त्याचा फटका बाहेरील दुकानदारांना बसला आहे. दरम्यान यासंदर्भात मंत्री शंकरराव गडाख यांची लवकरच भेट घेणार आहे.

देवस्थानला उत्पन्न मिळावे म्हणून व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्याकरिता लिलाव पद्धत वापरून व्यवसाय करण्यास परवानगी जाते. परंतु तेच व्यवसाय जर देवस्थानने केले तर बाहेरील धंद्यांना आर्थिक फटका बसतो. परिणामी व्यवसाय परवडण्यासारखी परिस्थिती राहत नाही. काही व्यवसायिक रितसर दरमहा ठराविक रक्कम देत आहेत. त्यांना एक नियम आणि दुसर्‍याला एक नियम असा भेदभाव केला जात असल्याने व्यावसायिक हे गार्‍हाणे ना. गडाख यांच्याकडे मांडणार आहेत.

देवस्थानने सुट्टे तेल विक्री करण्यास बंदी घातली आहे. तो नियम धाब्यावर बसवून काही व्यावसायिक रिकाम्या बाटलीत तेल भरून मोठ्या प्रमाणात विक्री करतात आणि भाविकांची मोठी लूट करतात. असा प्रकार सर्रास चालू आहे.काहींना बंद बाटलीतून तेल विक्रीसाठी सक्ती केली आहे आणि दुसरीकडे सुट्टे तेल बाटलीत भरून विकले जाते. नियम पालन करणार्‍यांवर अन्याय होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

देवस्थानचे मंदिरालगत एक तेल विक्री स्टॉल असून आता प्रवेशद्वारा जवळच आणखी एक दुसरा स्टॉल थाटल्याने बाहेरील तेल विक्री घटली असून देवस्थानने प्रवेशद्वाराजवळील असलेला तेल विक्री स्टॉल बंद करावा, अशी मागणी केली जात आहे.

देवस्थान पूर्वीपासून तेल विक्री करत आहे. भाविकांची गैसोय होऊ नये म्हणून देवस्थानने तेलविक्रीचा व्यवसाय चालू ठेवला आहे.

– जी. के. दरंदले कार्यकारी अधिकारी, शनैश्वर देवस्थान

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *