आदिवासी विकास विभागाकडून ‘शिक्षण सेतू अभियान’

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आदिवासी विकास विभागाने ‘शिक्षण सेतू अभियान’ सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून दुर्गम-अतिदुर्गम भागातील प्रत्येक घरापर्यंत ज्ञानगंगा पोहोचविली जाणार आहे.

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमधून नियमित शिक्षण केव्हा सुरू होईल? याविषयी अनिश्चितता आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड न पडू देता ते पूर्वीप्रमाणेच निरंतर राहावे, यासाठी आश्रमशाळा नियमित सुरू होईपर्यंत ‘शिक्षण सेतू अभियान’ राबविण्यात येणार आहे. या कालावधीत ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जाणार आहे.

या अभियानाच्या माध्यमातून शाळा बंद असतानासुध्दा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून भौतिक स्वरूपात शिक्षकांमार्फत त्यांच्यापर्यंत शैक्षणिक साहित्य व गाव पातळीवर सेवा पुरविल्या जाणार आहेत. जेथे शिक्षकांमार्फत सेवा पुरविणे शक्य नाही, केवळ तिथे शिक्षणमित्राच्या सहाय्याने सेवा पुरविल्या जाणार आहेत. तर शासकीय आश्रमशाळेतील व एकलव्य निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना डीबीटी तत्काळ अदा करण्यात येणार आहे.

शिक्षण सेतू अभियानच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चार विशेष समित्या गठीत करण्यात येणार आहेत. त्यामध्ये आदिवासी आयुक्त स्तरावर कार्यकारी समिती, प्रकल्प अधिकारी स्तरावर संनियंत्रण समिती, मुख्याध्यापक स्तरावर अंमलबजावणी समिती, तर आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्तरावर मानांकन समितीचा समावेश आहे. दरम्यान, प्रत्येक अपर आयुक्तालय स्तरावर युट्यूब वाहिनी सुरू करण्यात येणार आहे. त्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना धडे दिले जाणार आहेत.

पोषण आहार मिळणार

शिक्षण सेतू अभियानच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहार मिळण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहे. शासकीय आश्रमशाळेतील व एकलव्य निवासी शाळेतील निवासी विद्यार्थ्यांपर्यंत प्रतिमाह निश्चित देय पोषण आहार पोहोचविला जाणार आहे. त्यामुळे त्यांची उपासमार टळणार आहे.

करोनामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी अनलॉक लर्निंगच्या माध्यमातून दुर्गम-अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्याला काही मर्यादा आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर अपेक्षित उपाययोजना करत यंदा शिक्षण सेतू अभियान राबविण्यात येत आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

हिरालाल सोनवणे, आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *