Wednesday, April 24, 2024
Homeब्लॉगप्रकाशमय दिशेने...

प्रकाशमय दिशेने…

आपण या खोटया प्रज्ञेसाठी सारा प्रवास करीत असतो, कारण ती प्रज्ञा म्हणजे प्रतिष्ठा असते. त्या प्रतिष्ठेकरीता मी जास्त अभ्यास करतो. अधिक कष्ट घेतो. अधिक मार्क मिळवितो तेव्हा लोक पाठीवर कौतूकाची थाप टाकतात.

सत्काराचा सोहळे रंगतात..प्रतिष्ठेचा आलेख उंचावतो पण खरच त्यातून आपण प्रज्ञावान होतो का.. ? अनेकदा हा प्रवास बाहयांगाने झालेला दिसतो , पण अंतरंगाने प्रवास घडतो का ? मार्क हा परिणाम आहे हे खरेच, पण त्या मार्कांचा प्रवास घडतांना ज्या विचारातून त्याचा आलेख उंचावला आहे, मार्कांनी आकार घेतला आहे. त्या विचारांने अंतकरणात, मस्तकात किती बदल झाला हे पाहाणे महत्वाचे आहे. अन्यथा मार्कांचा आलेख उंचावणे घडत राहील आणि व्यक्ती मुळतः जशी आहे तशीच ती राहते.

- Advertisement -

त्याच्यात कोणताही बदल घडत नाही. माणूस प्रज्ञावान होण्याचा प्रयत्न करतो याचा अर्थ अगोदर प्रज्ञावान नसतो किंवा असला तरी त्याचे प्रमाण कमी असते , किंवा मूर्ख आहोत याची त्याला जाणीव असते. शिक्षणाने प्रत्येक व्यक्तिला आपण काय आहोत याची जाणीव करून दिली तरी खूप वेगाने सामाजिक व व्यक्तिगत परिवर्तनांची वाट चालणे होईल.अनेकदा व्यक्तीला आपण कोण आहोत याची जाणीव न होणे हेच शिक्षणाचे अपय़श आहे.

शिक्षणाचा उपयोग बाहयांगाचा शोध घेण्यासाठी नाहीच.शिक्षणाने व्यक्तीला स्वतःच्या आत डोकावून स्वतःचा शोध घेण्यासाठी मदत होण्याची गरज आहे. प्रज्ञेचा शोध आपण जेव्हा घेण्याचा प्रयत्न करतो, प्रज्ञा उंचावण्यासाठी प्रयत्न होतो तेव्हा खरच व्यक्तिच्या आत जे काही आहे ते फुलणे,बहरणे घडते का ? तसे न घडता केवळ बाहय लादलेल्या माहितीच्या आधारे केवळ शिक्षण प्रक्रियेतून मार्क वाढतात आणि तोच प्रज्ञेचा शोध म्हणून आपण मिरवत असू तर तो केवळ देखावा ठरेल.

शिक्षणातून माणूस कसा आहे ,त्याच्या आत काय आहे याचा शोध लागला तरच आपल्याला काय व्हायचे आहे याचा प्रवास सुरू करता येणार आहे.कोठे आहोत हे लक्षात आले तरच जेथे जायचे आहे तेथील अंतराचा शोध घेता येईल.अनेकदा स्वतःचा शोध न लागल्यांने आपण बाहय प्रतिसादाने आपला प्रवास सुरू करतो ..त्या प्रवासाने चालणे होते मात्र व्यक्तिचा विकास घडत नाही.

एखादा विद्यार्थी आतून उत्तम चित्रकार असतो.त्याची अंतरिक प्रज्ञा कलेत उंचावलेली असते आणि बाहय आवाज त्याला वैद्यकिय क्षेत्रात खुणावत असतो. त्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या जीवनात त्याला प्रज्ञेचा शोध लागला आहे असे कसे म्हणता येईल ? त्यात तो कदाचित बाहयांगे यशस्वी झालेला दिसेल पण त्यात त्याला समाधान,आंनद मिळणार नाही. आतला आवाज ऐकणे,त्या दिशेने प्रवास सुरू ठेवणे… वृध्दींगत करणे ही प्रज्ञा..पण बाहयांगाने आपण चालत राहीलो तर फक्त चालत राहातो , पण जीवन य़शाच्या शिखरावर पोहचता येत नाही.

खरेतर प्रत्येक व्यक्ती एका क्षेत्रात एका उंचीवर असते. आता हेच पाहाना क्रिकेट खेळात सचिन तेंडूलकर,गायनात लता मंगेशकर, वक्तृत्वात प्राचार्य शिवाजारीव भोसले , प्राचार्य राम शेवाळकर ही माणंस आपआपल्या क्षेत्रात अंत्यत उंचावर आहेत.

तीच त्यांची खरी उंची असते.त्यांना आपल्या उंचीचा मार्ग सापडला आहे. मात्र अनेकदा आहे त्या उंचीचा शोध न लागता आपण विनाकारण धावाधाव करीत असतो. आपण कोणाच्या तरी सारखे बनण्याच्या नादात पाठलाग करतो आणि थकतो..तेव्हा बराच काळ पुढे गेलेला असतो. त्या प्रवासात आपल्याला ज्याचे अनुकरण करायचे आहे त्याचे कोणतेही गुण अंगी बळावत नाही आणि वेळ वाया जातो..मग पुन्हा हा प्रवास थांबतो आणि नंतर पुन्हा नवा प्रवास सुरू होतो.

आहे त्याचा विचार नाही आणि नाही त्याची ओळख नाही अशी परीस्थिती होते. त्यामुळे आहे त्याचा विकास होत नाही आणि नाही ते प्राप्त नाही .खरेतर प्रत्येकात असलेल्या प्रज्ञेचा शोध घेऊन तो प्रवास सुरू ठेवला तर शिखरावर सहजपणे चढता येते. मात्र आपण प्रज्ञा विकसित करण्याच्या नादात भोवतालच्या मोठयांना काय हवे ते जाणून भौतिक सुखांच्या मागे लागत त्या दिशेंने प्रवास सुरू ठेवतो..तो प्रवास झाल्यासारखा वाटतो पण ते दिशाहिन चालणे असते..कारण त्या चालण्यात आनंद असत नाही. स्वतःच्या विकासाची वाटही नसते.त्यामुळे थकवाही अधिक असतो आणि चालूनही यशाचा अनुभव घेता येत नाही.

खरेतर कृष्णमृर्ती म्हणाले त्या प्रमाणे प्रज्ञावंत कसे व्हावे ही समस्या नाही, तर मूर्खापणापासून मुक्त कसे व्हावे ही समस्या असते.शिक्षणाने नवे काही लादायचे नाही , तर आत जे काही आहे त्याचा केवळ विकास करायचा असतो.अनेकदा अंतरिक असलेल्या क्षमता आणि कल, अभिरूचीपेक्षा बाहयांगाने विकास घडविण्याचा प्रक्रिया घडत राहाते. आपल्याला काय येते आणि काय येत नाही हे कळणे ही खरी प्रज्ञा आहे. अनेकदा काय येते याचा विचार करीत राहातो. पण जे येते ते खरच पूर्णत्व असते का? एखादा विषयात मार्क पडणे म्हणजे तो विषय येणे असा होत नाही. तो तर केवळ मार्कापुरता विचार असतो.

त्या पलिकडे जे असते ते खरे शिक्षण .म्हणून अनेकदा पदवी मिळविल्यानंतर आपण मागे वळून जेव्हा आपण पाहातो तेव्हा लक्षात काय राहिलेले असते..तर ज्याचे मार्क मिळाले ते लक्षात राहिलेले नसते, तर ज्याचे मार्क मिळाले नाही तेच आजीवन लक्षात राहाते. आपल्या आत जे मुळतः दडलेले असते त्याला जे पुरक शिकणे होते ते स्मरणात कायम राहाते.त्यात अभिरूची असते आणि जीवनाचा आंनददायी प्रवास दडलेला असतो.मात्र आपण परीक्षेत जे लिहिती आणि मार्क मिळवितो ते लक्षात राहात नाही याचे कारण ते शिक्षणे म्हणजे अंतरिक प्रज्ञेचे दर्शन नव्हे.

त्यामुळे परीक्षेच्या अंगाने जे येते ते खरच शिकण असत का ? प्रज्ञेचे दर्शन असते का ? अर्थाच जे येते ते पूर्णत्व नसते मात्र त्याचेही वास्तव स्विकारण्याची हिम्मत होत नाही.मग केवळ खोटे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न होत राहातो.त्या खोटयात काहीच नसते हे स्वतःच्याही लक्षात राहात नाही. कारण जे येते असे वाटते त्यातही आपण पुरेशा उंचावर नसतो..कारण ते मूळतः आपल्या आत नसते तर ते बाहेरून लादलेले असते. त्यामुळे काय येत नाही याचा शोध लागला तर येत नसलेल्या गोष्टी आपल्याला सहजपणे प्राप्त करता येतात.

पण काय येत नाही हेही शिक्षणातून कळत नाही.खरेतर शिकण्याचा प्रवास काय येत नाही ते शिकण्यापुरता महत्वाचा ठरतो.एकदा एका विकसनशील देशाच्या सचिवांना प्रगत देशाच्या दौ-यावरती पाठवायचे ठरले.आपल्या देशाची होत असलेली प्रगती आणि प्रगत देशाची झालेली प्रगती यांची तुलनात्मक अभ्यास करायचा होता.सचिवांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट दौ-यावरती जाणार होता.

पण सचिवांना दौ-यावरती जाण्याची मूळतः इच्छा नव्हती.त्यामुळे त्यांनी राष्ट्रप्रमुखांना भेटून मला पाठवू नका अशी विनंती केली. राष्ट्रप्रमुखांनी का नको ? अशी विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की “ मला अनेक क्षेत्रातील कळत नाही.तुम्ही ज्या क्षेत्रांचा अभ्यास करण्यास सांगितले आहे.त्यातील अनेक बाबी मला खरच माहित नाही ” असे सांगितल्यावर राष्ट्र प्रमुखांनी त्यांना सांगितले, की “ तुम्हाला ज्या ज्या क्षेत्रातील जे काही कळत नाही त्या त्या गोष्टींची यादी करून मला द्या ”अखेर सचिवांनी आपल्याला काय कळत नाही त्या क्षेत्रातील मुद्यांसह यादी करून दुस-या दिवशी सादर केली. अंत्यत प्रामाणिकपणे त्यांनी ते मुददे नोंदविले होते.ती यादी पाहिल्यावर राष्ट्र प्रमुखांना खूपच आंनद झाला.

ते म्हणाले “ हे पहा सचिवजी,इतर सदस्य तुमच्या सोबत आहेत पण त्यातील अनेकांना आपल्याला काय येत नाही हेच माहित नाही. काय येते हेही सांगता येत नाही. किमान तुम्हाला नेमके पणाने काय येत नाही हे तरी ठाऊक आहे. त्यामुळे तुम्ही दौ-यावर जे तुम्हाला माहित नाही तेवढ्याच क्षेत्राचा अभ्यास करू या, बाकीचे काही करू नका..” खरंतर काय येत नाही हे कळाले, की शिकण्याचा प्रवास सुरू करता येतो.

काय येत नाही त्याची जाणीव शिक्षणातून होणे खूप महत्वाचे आहे.येत नसल्याला क्षेत्राचा अभ्यास करणे सहज शक्य असते. अन्यथा आपण प्रवास सुरू ठेवतो आणि काय शिकायचे असते तेच शिकणे राहून जाते. म्हणून शिकण्याचा प्रवास करतांना आतला आवाज ऐकूण निर्णय घेण्याची गरज आहे. कारण त्यातून जीवनाचा नाद ऐकू येत राहातो. आणि प्रकाशमय दिशेचा प्रवास सुरू होतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या