Tuesday, April 23, 2024
Homeनगररस्ता देता की हेलिकॉप्टरसाठी अनुदान; सेवानिवृत्त जवानाने थेट मुख्यमंत्री शिंदेंनाच धाडलं पत्र

रस्ता देता की हेलिकॉप्टरसाठी अनुदान; सेवानिवृत्त जवानाने थेट मुख्यमंत्री शिंदेंनाच धाडलं पत्र

शेवगाव | प्रतिनिधी

तालुक्यातील सालवडगाव येथील रहिवासी, सेवा निवृत्त लष्करी जवान दत्तू भापकर या यांनी आपल्या वस्तीवर जाण्या येण्यासाठी रस्ता नसल्याच्या कारणाने आता प्रशासनाने हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी सरकारी अनुदान उपलब्ध करून देण्याचे मागणी करणारे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.

- Advertisement -

सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या सेवानिवृत्ती नंतरचे जीवन आनंद व सुखा समाधानाने जावे अशी सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांची इच्छा असते. मात्र तालुक्यातील सेवानिवृत्त लष्करी जवान दत्तू भापकर यांना वेगळ्या प्रकारची अनुभूती पाहण्यास मिळाली आहे. ते सालवडगाव येथील हनुमान वस्तीवर राहतात. मात्र या वस्तीवर जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही. त्यामुळे या वस्तीवरील कुटुंबियांना विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे.

वस्तीवरील साधारण १५ ते २० मुले वस्तीवरून गावात शाळेसाठी जातात मात्र या मुलांना कसरत करून शाळेसाठी जाण्यायेण्याची वेळ आल्याची तक्रार आहे. तसेच वस्तीवरील कोणीही रात्री अपरात्री आजारी पडले तर त्याला दवाखान्यात उपचारासाठी नेणे अत्यंत अवघड बनले आहे. वस्तीवरील एका वयोवृद्धाचे नुकतेच निधन झाले. यावेळी सुरु असलेल्या पावसामुळे तालुक्याच्या गावावरून आणलेले वयोवृद्धाचे प्रेत वस्तीवरील नागरिकांना अक्षरश: तीन ते चार किलो मीटरचे अंतर चक्क पाठीवरून संबधितांच्या राहत्या घरी न्यावे लागले.

केवळ रस्त्या उपलब्ध नसल्याने अशा एक नी अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. सध्या रस्त्यावर तसेच वस्तीकाठच्या नदी बंधा-यांना मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने आपल्याला घरी येण्या जाण्यासाठी रहदारीचा रस्ता उपलब्ध नसल्याने रस्ता काढून मिळावा यासाठी अनेकदा महसूल प्रशासनाकडे दाद मागितली असतांना आपल्या मागणीचा विचार करण्यास कुणाही जबाबदाराला वेळ नसल्याने हेलिकॉप्टरचा पर्याय सोपा असल्याने आता राज्य प्रशासनाकडून हेलिकॉप्टर खरेदीसाठी मदत व मार्गदर्शन मिळण्यासाठी सेवा निवृत्त लष्करी जवान भापकर यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे लक्ष वेधले असून आता त्यांच्या या उपरोधक मागणीबाबत संबधित विभागाकडून कोणत्या प्रकारची कार्यवाही होणार याकडे संबधित सेवानिवृत्त लष्करी जवान भापकर यांच्यासह त्यांचे कुटुंबीय व परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या