Saturday, April 27, 2024
Homeनगरमेंढपाळांच्या बालकांचे सर्वेक्षण होणार

मेंढपाळांच्या बालकांचे सर्वेक्षण होणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यात वेठबिगार व बाल कामगार यांच्यावर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी व भविष्यात त्यांच्यावर अत्याचार होणार नाही, यासाठी जिल्ह्यातील मेंढपाळांकडे असलेल्या बालकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी पथक स्थापन करुन सामाजिक संस्थेच्या मदतीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

- Advertisement -

नगर जिल्ह्यातील संगमनेर व पारनेर तालुक्यातील काही मेंढपाळांनी बालकांना मेंढी व दोन हजार रुपयांत विकत घेऊन वारंवार त्यांच्यावर अत्याचार करून, त्यांच्या क्षमतेच्या पलिकडे त्यांच्याकडून मजूरी करुन घेत असल्याच्या घटनेची पोलिसांनी दखल घेऊन आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन अल्पवयीन व बेठबिगार बालकांची सुटका केली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय वेठबिगार समितीची आढावा बैठक मंगळवार (दि.13) जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीत वेठबिगार व बाल कामगार यांच्यावर होणारा अत्याचार थांबविण्यासाठी व भविष्यात त्यांच्यावर अत्याचार होणार नाही, यासाठी जिल्ह्यातील मेंढपाळांकडे असलेल्या बालकांचे सर्वेक्षण करण्यासाठी पथक स्थापन करुन सामाजिक संस्थेच्या मदतीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

कोणत्याही गावात किंवा शहरात बाल कामगार व वेठबिगार आढळून आल्यास, नागरिकांनी संबंधीत पोलिस ठाण्यात तक्रार करावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय वेठबिगार समितीच्या अध्यक्षा पल्लवी निर्मळ यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या