Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवारांनी का घेतली पंतप्रधानांची भेट?; नवाब मलिकांनी सांगितलं कारण

शरद पवारांनी का घेतली पंतप्रधानांची भेट?; नवाब मलिकांनी सांगितलं कारण

मुंबई l Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची नवी दिल्लीत भेट झाली आहे. मोदी आणि पवार यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. शरद पवार यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटीवरून उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (NCP Spokeperson Nawab Malik) यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलंय.

- Advertisement -

शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण!

नवाब मलिक म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदींकडे शरद पवारांनी भेटीसाठी वेळ मागितली होती. मोदींनी भेटीसाठी वेळ दिल्यानंतर आज दोन्ही नेते भेटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांना या भेटीची कल्पना होती. काही दिवसांपूर्वीच शरद पवार मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेटले होते. याशिवाय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनादेखील पवार आणि मोदींच्या भेटीची कल्पना होती.’ अशी माहिती मलिक यांनी दिली.

तसेच, ‘मोदी आणि पवार यांच्यामध्ये बँकिंग क्षेत्राबद्दल महत्त्वाची चर्चा झाली. बँक रजिस्ट्री कायद्यात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे सहकारी बँकेच्या अधिकारांवर गदा आली आहे. बँकांचे अधिकार मर्यादित झाले आहेत. कायद्यात सुधारणा केल्यानंतर काही विसंगती आहेत. त्या गोष्टी शरद पवारांनी मोदींना सांगितल्या आणि लक्ष घालण्याचं आवाहन केलं. ही भेट अचानक झालेली नाही. भेट ठरलेली होती. या भेटीबद्दल संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न काहींकडून सुरू आहे,’ असं मलिक म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रात सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात पहिल्या टर्ममध्ये सातत्याने भेटी व्हायच्या. मात्र, दुसऱ्या टर्ममध्ये भेटी कमी झाल्या होत्या. आता ही मोठ्या कालावधीनंतर झालेली भेट आहे. याआधी जूनमध्ये उद्धव ठाकरे आणि मोदींची भेट झाली होती. त्यानंतर आता शरद पवार आणि मोदींची भेट झालीय. काल महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत होते. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या